संस्कार

लहान मुलं, तारुण्यात येणारी मुलं किंवा अगदीच सर्वच वयोगटातील माणसं यांच्यावर भले किंवा चांगले संस्कार होण्यासाठी एकूणच देशभरात अनेक प्रकारच्या गोष्टींचा, प्रयोगांचा सततचा मारा चहुबाजूंनी सुरू असलेला दिसतो. मुळात संस्कार म्हणजे काय? तर ज्या गोष्टी चांगल्या, मानवी मुल्य जपणाऱ्या असतात त्या. लहान मुलांवर संस्कार चांगले व्हावेत याचा ठेका जणू तमाम पालक, शिक्षक, नातेवाईक यांच्याकडेच दिलेला असतो. आणि ते मग आपापल्या परिनं गोड बोलून, समज देऊन, प्रसंगी मारझोड करून पोरांना संस्कार शिकवण्याचा आटापिटाही करत राहतात. अगदीच दमछाक होईपर्यंत. तरीसुद्धा पोरांना जे करायचं ते करतही राहतात. मला नेहमी प्रश्न पडतो, एकूणच देशातल्या प्रत्येक नागरीकावर त्यांच्या लहानपणापासून अनेक चांगले संस्कार शिकवले गेलेले असताना सुद्धा देशात वाईटपणा, भ्रष्टाचार, चोऱ्या, व्याभिचार, बलात्कार, खुन, भांडणं यासारख्या वाईट गोष्टी सुरूच आहेत किंवा त्या थांबायचं नाव घेत नाहीत. कारण, काय असावं? तर अगदी साधं उत्तर आहे. संस्कार ही देण्याची नव्हे, घेण्याची गोष्ट आहे. मग भले ते तुम्ही समोरच्या माणसाला कशाही प्रकारे शिकवण्याचा किंवा लादण्याचा प्रयोग करा. समोरचा माणूस त्याला पाहिजे तसंच तो जगणार असतो. माझा बहुतेकदा पालकांशी संपर्क येतो. एक पालक तोंडात तंबाखू टाकत म्हणाले,
आमचं पोरगं नको म्हटलं, तरीसुद्धा अमूक अमूक एखादी वाईट गोष्ट करतंच. हल्ली तर गुटखाही खायला लागलंय. सगळे भले-बुरे उपाय करून झालेत. तुम्ही सांगा काय करावं?
मी चिडून म्हणालो, जी गोष्ट तुम्ही स्वतः इतक्या आवडीने खाता, तीच गोष्ट तुमच्या मुलानं खाल्ली तर त्यात वाईट ते काय? मुळात पालक म्हणून तुम्ही स्वतः किती संस्कारक्षम आहात याचा विचार कधी केलायं काय? त्यामुळे त्याला जे करायचंय ते करू द्या. बिघडला तर बिघडू द्या. तो आणि त्याचं कर्म.
साधी गोष्ट आहे. नेहमी खरे बोलावे हा सुविचार, मुल्य आपण सगळेच शाळेय वयापासून शिकलेलो आहोत. तरीसुद्धा आपण उभ्या आयुष्यात कितीवेळा खरे बोलतो? असा प्रश्न स्वतःलाच एकदा विचार पहा. म्हणजे लक्षात येईल दुसऱ्यांना संस्काराची भाषा शिकवणं योग्ययं कि अयोग्य? जे संस्कार आपणच कधी घेतले नाहीत ते आपल्या मुलांना शिकवण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि मुलांनी ते अंगीकारावेत याची अपेक्षा तरी कशी बाळगायची?
दिवसातून ४ वेळा तंबाखू खाणारा माणूस स्वतःच्या मुलांकडून र्निव्यसनी राहण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो? आपण आपल्या तारुण्यात दिसेल त्या पोरींवर लाईनी मारायच्या, एखादी पोरगी पटावी म्हणून जीवाची घालमेल करून घ्यायची आणि कधीतरी आपण म्हातारे झाल्यावर आपल्या ऐन तारुण्यात आलेल्या पोरांनी मात्र तसलं काही न करता सज्जनपणे जगायचं ही भलतीच अपेक्षा नाही काय? पोरांनी लाईनी मारल्या तर त्याला वाईट म्हणायचं. मात्र आपण केलं तर रितीप्रमाणे म्हणायचं. हा दुजाभाव कशाला?
म्हणून मला वाटतं, पोरांना संस्कार वगैरे शिकवण्याच्या फंदात न पडता, पालक, शिक्षक म्हणून आपणच आधी निट, सरळमार्गी जगण्याचा प्रयत्न करूत. आपापल्या तत्वांवर ठामपणा ठेवूत. पोरांना आपल्याकडे बघून जेवढं चांगलं घेता येईल तेवढं ते घेतील. बाकी गोष्टींना पर्याय नाही. कारण, घराबाहेरील जगातून देखिल पोरं काहीतरी भलं- बुरं शिकणारचं असतात. आईबाप म्हणून आपण पोरांच्या किती किती गोष्टींवर बंधनं आणणार?
आता मी माझ्या घरातील गमंत सांगतो. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही पुस्तकं वाचण्याचा नाद आहे. आमच्या घरात हजारांहून जास्त पुस्तकं आहेत. छोटं ग्रंथालय आहे. आम्हाला १० वर्षाचं एक पोरंगयं. तर आम्ही त्याला पुस्तकं वगैरे वाच असं आजतागायत सांगितलेलं नाही. नि सांगणारही नाही. पण प्रत्येक महिण्याला शे – दोनशेची लहान मुलांची पुस्तकं आम्ही बाजारातून नित्यनियमाने आणतही असतो. जमेल तसं त्याच्या समोर बसुन वाचत असतो. आता वाढत्या वयानुसार पोराला समजलंच की, आईबाप जे वाचतात ते आपणही वाचू तर वाचेल की तो. त्याकरीता त्याच्यावर जबरदस्ती कशाला?
शेवटी महत्वाचं सांगतो, मुलं वाढवताना त्यांचे पालक (पालनपोषण करणारेच)व्हा. जन्मदाते व्हायला गेलात की, मग सगळा मामला बिघडतो. मला काय म्हणायंचय, ते कळलं असेलच तुम्हाला? आँ???