गेमिंग करणार्या मुलांचे पालक भेटले की हमखास म्हणतात आमचा मुलगा/ मुलगी अगदी एडिक्ट झाली आहे..

मुलांच्या अति मोबाईल वापरासाठी किंवा स्क्रीन टाइमसाठी त्यांना दोषी ठरवू नका. त्यांच्या नावाने कटकट करण्याआधी ही सवय कुणी लावली ते आठवून बघा. दोष कुणाला द्यायचाच झाला तर स्वतःला द्यायला हवा. माझी मुलगी/मुलगा मोबाईल एडिक्ट आहे हे वाक्य चूक आहे. हे वाक्य असं वापरून पालक म्हणून आपण स्वतःची सुटका करून घेतो आपल्याही नकळत. काहीवेळा जे म्हणायचंय तेच शब्दप्रयोग आवश्यक आहे. पालक म्हणून आपण सोयीच्या गोष्टी करतो आणि मुलांना व्यसनाधीन म्हणतो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. बाजारात जाऊन महागडी गॅजेट्स, मोबाईल, टॅब मुलं विकत आणत नाहीत. आपण घेऊन देतो, त्याचं कौतुक असतं आपल्याला, आपल्या आर्थिक क्षमतेचा गर्व, अभिमान आणि काय काय ही असतं. सुप्त मानसिक अवस्थेत. परिणाम मुलांना सवयी लागतात.
दुसरं बऱ्याच पालकांना वाटतं मोबाईल काढून घ्यायचा तर इतर महागडे पर्याय दिले पाहिजेत. तर मुळीच नाही. उलट एक रुपया ही खर्च न करता मुलांना असंख्य गोष्टींमध्ये गुंतवता येऊ शकतं. त्यांना स्वयंपाक घरात मदतीला घ्या. पाटपाणी घ्यायला सांगा. त्यांना कपड्यांच्या घड्या करायला शिकवा. त्यांना भाज्या निवडायला शिकवा. त्यांच्याशी तुम्ही खेळा. घरातल्या आवरा आवरीत मदतीला घ्या. त्यांची खेळणी स्वच्छ करायला, आवरून ठेवायला सांगा.
किंवा काहीही पर्याय देऊ नका.
तुझा तू शोध असं सांगा.
मुलं मोबाईल मिळाला नाही, टिव्हीही मिळाला नाही तर त्यांचे म्हणून पर्याय शोधतात. त्यांना ते कसे शोधायचं हे माहीत असतं. काहीच सापडलं नाही तर इतर मुलांशी जास्तवेळ खेळतात. प्रॉब्लेम आपला म्हणजे पालकांचा असतो. आपल्याला सगळं भरवायला आवडतं. त्यांनी काय करायचं, कसं करायचं, निराळे पर्याय कसे निवडायचे, कुठले निवडायचे सगळं आपण ठरवतो आणि बरहुकूम मुलांना करायला लावतो. त्यापेक्षा पर्याय द्या, त्यांना आवडले तर ठीक नाही आवडले तर त्यांचे त्यांना शोधू द्या..
स्पून फिडिंग बंद करणं ही पालकांसाठी सगळ्यात कठीण गोष्ट असते. कारण त्याचं व्यसन असतं पालकांना.
मुलं एडिक्ट नसतात, पालक असतात, वेगवेगळ्या गोष्टींचे.
एक रुपयाही खर्च न करता, कुठलंही नवं खेळणं विकत न आणता मुलांना मोबाईल पासून दूर नेता येतं… जस्ट थिंक!

मुक्ता चैतन्य

#noscreenday #arunsadhufellowship #socialmedia #noscreenforkids