मुलांना शिकवण्याची एवढी घाई कशाला? लोकमतमध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख.

जरा कळ काढा!
-भाऊसाहेब चासकर

काही काळ शिक्षणाची प्रक्रिया कदाचित बंद पडणार या भीतीने जो तो या ना त्या मार्गाने मुलांच्या डोक्यात शहाणपण ओतायच्या मागे नुसता धावत सुटलाय.काहीही करून मुलांना शिक्षण ‘भरवायची’ ही इतकी घाई कशाला?

कोरोना विषाणूने सर्वच क्षेत्रात अनिश्चितता निर्माण करून ठेवली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांमधला गोंधळ दिवसेंदिवस वाढतो आहे. नेहमीप्रमाणो 15 जूनला शाळा सुरू होणार नाहीत, हे जवळजवळ स्पष्ट झालंय. मग शाळा कधी सुरू होतील? कुठल्या, किती शाळा सुरू होतील? मुलं शाळेत येतील का? किती येतील? असे अनेक प्रश्न आहेत. कोरोनामुळे शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शासन यंत्रणा यांच्यात एकमत होणं कठीण दिसतंय. गेले अडीच महिने झालेत मुलं घरात आहेत. त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यातल्या ऊर्जेलाही विधायक वळण कसं द्यायचं हा एक मोठाच प्रश्न आहे.
आणि काही काळ शिक्षणाची प्रक्रिया कदाचित बंद पडणार या भीतीने जो तो या ना त्या मार्गाने मुलांच्या डोक्यात शहाणपण ओतायच्या मागे नुसता धावत सुटलाय.

गेल्या अडीच महिन्यांपासून घरबंद असल्यामुळे जीव गुदमरलेल्या मुलांसाठी ऑनलाईन लेक्चर्स ठेवली जाताहेत. आधीच अवघड जाणाऱ्या गणित विषयातली कठीण उदाहरणं सोडवायला सांगितली जाताहेत. भलीमोठाली होमवर्क दिले जाताहेत. नामांकित शाळांचे सध्याच्या शाळाबंद शिक्षणात असे प्रयोग सुरू आहेत. आणि पालकही हे अत्यंत कौतुकाने सांगताहेत. म्हणजे पालकांनाही मुलांना गुंतवून ठेवणारे हे प्रयोग आवडत असले पाहिजेत. किंबहुना काहीही करुन मुलांना शिकवून सोडायचा पालकाग्रहच असतो. लहान मुलांवर केली जाणारी ही शिक्षणाभ्यास सक्ती मला अमानुष आणि हिंसक कृती वाटते. मुलं दुबळी असतात, त्यांना आवाज नसतो. ती विरोध करू शकत नाहीत. लहान मुलांच्या मनावर याचे आघात होत नसतील? याचा विचार करायला फुरसत आहे कोणाकडे?

मुलांचं हित, किंवा भलंबुरं केवळ आम्हाला कळतं, अशी पालकांची मनोभूमिका मुलांच्या वाढ-विकासासाठी अत्यंत घातक आहे. तशीही भारतातल्या मुलांना जन्मत: पी.सी.(पेरेंटल कस्टडी) मिळालेली असतेच. खरं म्हणजे पृथ्वीवर हयात असलेल्या मानवी समुदायाच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी अत्यंत खडतर आपत्ती आलीय. मुलं त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात कठोर काळामधून जात आहेत. तेव्हा संस्थाचालक आणि पालकांनो, जरा धीर धरा, कळ काढा. या ऑनलाईनमुळे शालेय शिक्षणाचा आभास निर्माण करता येईल. मात्र शिक्षण घडेलच असं अजिबात नाही!

स्वस्थ, आनंदी मन म्हणजेच भावनिक, मानसिक सुरक्षितता ही शिक्षणासाठीची पूर्वअट असते. खेळ नाही, मित्रांच्या गाठीभेटी नाहीत, कोविडची भीती मनात रुतून बसलीय. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मनात एका अस्वस्थेने घर केले आहे. आनंदी वृत्तीचा निर्देशांक घसरलाय. कोविडग्लानी आल्याने मरगळलेल्या दुष्टचक्रात डिजिटल माध्यमामधून शिक्षण कसं होईल? मुख्य म्हणजे शिक्षण ही आनंददायी आणि अर्थपूर्ण कृती असते, तशी असली पाहिजे. यासाठी शाळा भरायला हवी, शिक्षक-विद्यार्थी प्रत्यक्ष भेट व्हायला हवी. म्हणूनच सध्या जे काही सुरू आहे, त्याचं घाईघाईने स्वागत करायची भूमिका घेऊ नका. थोडी कळ काढा, एवढंच सुचवायचं आहे.

पालकांनो, सध्या एवढंच करा!

* अडीच महिने झालेत मुलं घरात आहेत. ग्रामीण भागातली मुलं घराबाहेर तरी पडू शकतात. शहरांतल्या मुलांना ही मुभा नाहीये. घरात कोंडल्यामुळं गुदमरलेल्या मुलांनाही मोकळा श्वास घ्यायचाय. त्रासात आणि ताणात असलेल्या मुलांना मस्त हुंदडायचंय, मनसोक्त खेळायचंय. मुलांमधल्या प्रचंड उर्जेला वळण देता येत नसल्यानं मुलं आणि पालक अशा दोघांचीही मोठी गोची झालीय. या काळात कमाल संयम ठेवायला लागेल.

* टाळेबंदी हळूहळू शिथिल होतेय. शहरी पालक कामावर जाऊ लागलेत. पाळणाघरं बंद आहेत. नोकरी वाचवायची आहे आणि मुलांचंही बघायचंय, अशा कात्रीत सापडलेल्या पालकांच्या जीवाची घालमेल साहजिक आहे. यातून शाळा सुरू करा, असा आग्रह सुरू होतो. पण परिस्थिती निवळून शाळा सुरू होण्याची वाट बघायला हवी.

* मोठ्यांच्या मनात मोठी भीती आहे. लहान मुलांना सांगता येत नसलं तरी त्यांच्या मनाला कोविडजन्य भीती कुरतडत असणार. अशा वेळेस मुलांसोबत सतत बोलत राहायला हवं.

* मुलांचं मन कशात तरी गुंतवून, त्यांना सक्रीय ठेवायला हवं. वाचन, भाषिक खेळ, गप्पागोष्टी, मातीकाम, कागदकाम, चिकटवही, कात्रणवही, कोलाज, चित्र, गायन, वादन, नृत्य यांसारख्या अन्य पर्यायांचा विचार करता येईल.

* केवळ आदेश, उपदेश करणं शक्यतो टाळावं. मुलांनी वाचावं, असं वाटत असल्…