घरच्या घरी (भाग चार)

– वर्षा सहस्रबुद्धे
Varsha Sahasrabuddhe

(ही लेखमाला द फर्स्ट थ्री इंस्टीट्यूट फॉर चाईल्ड डेव्हलपमेंट यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित केली जात आहे. जून २०२०)

“मी ना… बाबाच्या मदतीनी भिंतीचं कोळिष्टक काढलं. मला वाटलं ते सोप्पं असेल! …तर…आधी मी ते काढताना भिंतीलाच चिकटलं. मग मी काढायचा प्रयत्न केला तर ते अजूनच चिकटलं.” पूर्वी चौथीच्या बालभारतीत ‘मला माझ्या आईचा अभिमान वाटतो’ हा पाठ होता. त्याला जोडून, मुलांना घरी कोणतंही श्रमाचं काम करून त्याविषयी लिहून आणायला सांगितलं होतं. अंकितानी कोळिष्टक काढायचं काम केलं होतं. इतर मुलांपैकी कोणी स्वतःचं ताट घासलं होतं, कोणी केर काढला होता, कोणी स्वतःचे कपडे धुतले होते, कोणी ते झटकून वाळत घालायला शिकलं होतं.

सहजपणे दिनक्रमातली कामं करणारी गावांमधली, पाड्यांवरची, शहरी वस्त्यांमधली कितीतरी मुलं मला कामाच्या निमित्तानं भेटली आहेत. आपली कामं आपापली करायची असतात हे शहरी मध्यमवर्गातल्या मुलांनाही सहज शिकायला मिळेल अशी संधी या घरातल्या काळात आपसूकच निर्माण झाली आहे!

मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय घरांमध्ये रोजची बरीचशी कामं दुसऱ्याकडून करून घेतली जातात. भांडीवाल्या मावशी, केर काढणाऱ्या मावशी, स्वयंपाकाला येणाऱ्या काकू, जिना पुसणाऱ्या काकू, गाडी पुसून देणारे काका, कचरा नेणारे दादा अशा कितीतरी व्यक्ती आपला रोजचा दिवस सुंदर करत असतात.

आपण वापरतो त्या वस्तू, जागा स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवण्यासाठी आपणच काम करण्यातून एक प्रकारचं समाधान मिळतं. त्याचा अनुभव आपणही घ्यायला हवा आणि मुलांनाही मिळायला हवा. श्रमाची कामं करण्यातून शरीर-मनाला येणारा तजेला आणि नम्रपणाची, कृतज्ञतेची भावना ही नुसती वर्णन करून समजणारी गोष्टच नाही! ती प्रत्यक्ष अनुभवण्याचीच गोष्ट आहे!

बालवाडी आणि पहिलीच्या वयोगटासाठी:

आपापला कप, पाणी प्यायचं भांडं, ताट-वाटी धुवून ठेवायला मुलांना आवडतं. सुरुवातीला कदाचित थोडी सांडलवंड होईलही, पण तो अवकाश मुलांना द्यायला हवा. काहीही शिकताना आपलं काय चुकलं, काय दुरुस्त करयला हवं, काय बदलायला हवं हे आपलं आपण हेरता येणं, हा शिकण्याच्या कौशल्यामधला महत्त्वाचा भाग असतो. सांडलं, तर ते पुसून घायला हवं हे मुलांना समजेल आणि पुसून घ्यायलाही मुलांना आवडेल!
सगळ्यांनीच आपापली ताट-वाटी घासून टाकली तर भांडी घासणाऱ्याचं काम किती हलकं होऊन जातं!

घासलेली कोणती भांडी घरात कुठे ठेवायची असतात, हे मुलांनी आधी नक्की पाहिलेलं असणार. भांडी अडगवायला, जागेवर लावायला मुलांना मदतीला घ्या. वर्गीकरण आणि व्यवस्था लावण्याचं आणि रोज नेमानं काही काम करण्याचं हे कौशल्य पुढे अनेक प्रसंगी खूप उपयोगी पडणारं आहे.
पुढे मावशी यायला लागल्यावरही आपापलं ताट-वाटी धुण्याचा प्रघात जरूर चालूच ठेवा.

फरशी पुसायला या वयाच्या मुलांना अपार आवडतं! सुरुवात गॅलरी पुसण्यापासून करायची. फडकं पाण्यात बुचकळून ते हातानी पिळताना मुलांना थोडी मदत करा. एक टोक आपण आणि दुसरं टोक मुलानी धरून पिळताना, आणखी घट्ट पिळताना खरंच धमाल येते! फडक्यात पाणी थोडं जास्त झालं तरी, गॅलरी ते सामावून घेऊ शकते! काही दिवस गॅलरीत पुसापूस करून जरा हात बसला, की खोल्या पुसायला द्या.

कोणतंच काम “तू फरशी पूस” “तू भांडी घास” या पद्धतीनं करायला गेलं, तर त्यातली मजा निघून जाईल. “आपण … करूया” ही या वयाला लागू पडणारी कळीची भाषा आहे. मुलानं हट्ट करून ‘मी करते, मी करतो’ म्हटलं, तर मात्र जरूर त्याला एकट्याला ते करू द्या. एखादी छोटीशी गोष्ट जबाबदारीनं करण्यातून येणारा आत्मविश्वास कायम मुलांपाशी राहतो.

कपडे झटकायला मुलांना हाक मारा. उडणारे तुषार, सुरकुत्या जाऊन कपडा ताठ होतो, याकडे मुलांचं लक्ष वेधा. साडीसारखा लांबलचक कपडा वाळत घालताना कशा घड्या करून वाळत घालतात हे दाखवा. आणि अर्थातच वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालताना, ते जागेवर ठेवताना त्यांना मदतीला बोलवा.

दुसरी ते चौथीच्या वयोगटासाठी:

केर काढताना मुलांना मदतीला बोलवा. झाडू कसा धरायचा, केर न उडवता कसा गोळा करत न्यायचा, सुपलीमध्ये भरताना सुपली कशी धरायची याकडे मुलांचं लक्ष वेधा.

कचरा कमीतकमी तयार व्हावा, यासाठी, कायकाय पुन्हा वापरण्यासारखं आहे याबद्दल मुलांशी बोला. याविषयी बोलताना, तुमच्याकडच्या त्या दिवशीच्या विशिष्ट कचऱ्यातल्या वस्तूंविषयी त्यांना जे सुचेल त्याची दखल घ्या. त्या वस्तू स्वच्छ करून बाजूला ठेवा.

एरवी कपडे यंत्रात धुतले जात असतील, तर आपापले कपडे हातानी चोळून, ब्रशनी घासून धुवायचा अनुभव मुलांना घेऊदे. कुटुंबाच्या आठवड्याच…