ध्येयवेड्याची कार्यपूर्ती

नोव्हेम्बर १९२१ मध्ये एडिम्बरो येथील स्टीव्हनसन क्लबमध्ये, स्टीव्हनसनच्या वार्षिक पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या लोकात रोझेलाईन मॅसन नामक भक्ताच्या मनात स्टीव्हनसनच्या आठवणी गोळा करून एक ग्रंथ प्रकाशित करावा असे आले. वर्षभरात तीनशे जणांकडे चिकाटीने संपर्क साधत व दीडशे जणांकडून आठवणी मिळवत त्याने ‘I can Remember Robert Louis Stevenson’ हा ग्रंथ प्रकाशित केला. स्टीव्हनसन हा एक लोकप्रिय कादंबरीकार होता आणि तो जाऊन २५ वर्षे होऊन गेली होती, हे लक्षात घेतले पाहिजे.
यावरून स्फूर्ती घेत सदाशिव विनायक बापट या लोकमान्यांच्या निकटवर्तीयाने, टिळक जाताच त्यांच्या आठवणी एकत्र करण्याचा चंग बांधला. काम सोपे नव्हते. त्यांनी केसरीतून लोकांना आवाहन केले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकमान्यांचा ‘राष्ट्रसूत्रधार’ असा नेहमी उल्लेख करणाऱ्या बापटांनी हार न मानता, आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू ठेवली.
प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा अनेकांना ते भेटले; वारंवार भेटले. कित्येकांनी त्यांचा अपमानही केला. ‘टिळक आठवणींचे बोअरिंग मशीन आले’, असे कुत्सित शेरे मारले. कित्येकांनी निव्वळ आळसापोटी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. #लोकमान्यटिळकयांच्याआठवणीआणि_आख्यायिका चे तीन खंड प्रकाशित करण्यासाठी त्यांनी १५६७ जणांना ५९९२ पत्रे व स्मरणपत्रे लिहिली. छापील मसुदा न पाठवता ही सर्व पत्रे स्वहस्ते लिहिली हे विशेष. केवळ ७०१ जणांनी आठवणी पाठवल्या. याला अनास्था म्हणावे की कामाची जाण नसणे म्हणावे? कित्येकांना भेटी देऊन त्यांनी बोलते केले व त्यांच्या आठवणी खंडात सामावून घेतल्या.
त्याबद्दल बापट सांगतात की,
“येथे एवढे सांगणे आवश्यक आहे की, या बाबतीत पक्षभेद, जातिभेद, किंवा दुसरे कोणतेही क्षुद्र विचार मनात न आणता सरकारच्या बाजूचे, मवाळ जहाल, ब्राह्मण, अब्राह्मण, सुधारक दूर्धारक, राष्ट्रीय, प्रागतिक, सहकारी, असहकारी, प्रतियोगी, स्वराज्यवादी वगैरे सर्व मतांचे लोकांस, तसेच हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती वगैरे जातींच्या स्त्री-पुरुषांस मी एकजात पत्राद्वारे व समक्ष विनंती केली; कारण लोHकमान्यांचे मन व कार्यक्षेत्र समुद्राप्रमाणेच विस्तीर्ण असल्यामुळे सर्वांशी त्यांचा संबंध आलेला होता; आणि न जाणो, एखाद्यास माहीत असलेली लोकमान्यांच्या थोरवीची गोष्ट आपल्या दोषैक पक्षपातामुळे त्यास न विचारल्याने ती अप्रसिद्ध ठेवल्याचे पाप आपणाला लागेल या भावनेने मी सरसकट सर्वांस विनविले.
सारांश, आठवणी मागितल्या गेलेल्या क्षेत्राची सीमा सांगायची झाल्यास एवढेच सांगतो की, इंग्लंडचे मुख्यप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड, सर व्हॅलेंटाईन चिरोल, लँसबरी, हॉर्निमन, अमेरिकेतील संडरलंड, लालाजी, सरलादेवी, श्रद्धानंद, मालवीय, अलीबंधू, अजमल खान सुरेंद्र, रवींद्र, पालारवींद, दास, नेहरू, चिंतामणी, जगद्गुरु शंकराचार्य, खापर्डे, मुंजे, अणे, भांडारकर, केळकर, परांजपे, नेने, बॅप्टीस्टा, जयकर, वाछा, पेटिट, सेटलवाड, गोकुळदास पारख्, मनमोहन रामजी, जिना, बमनजी, पटेल, महात्माजी, खाडिलकर, देशपांडे, कौजलगी, बेळवी, राजगोपाळ, विजयराघव, व्ही.पी.माधवराव, बेझंट, सर सुब्रमण्य, शास्त्री, रंगास्वामी, सत्यमूर्ति, सरोजिनी नायडू वगैरेंपासून तो थेट लोकमान्यांचा कारकून, त्यांचा खास स्वयंसेवक, त्यांचा लेखक, त्यांचे जवळ फार दिवस असलेला त्यांचा गडी, त्यांचे बरोबरचा आचारी, घरातील देवपूजा करणारा ब्राह्मण, त्यांचे मुलांचा खाजगी शिक्षक, त्यांचा नेहमीचा वृद्ध कोचमन, फार काय पण त्यास श्मश्रूचे वेळी कधीही दुखापत न केल्याबद्दल आपल्या हस्तकौशल्याची (!) तारीफ करणारा त्यांचा ठरीव कारागीर यांजकडूनही आठवणी मिळवण्याचा मी प्रयत्न केला आहे.”
हे वाचल्यावर त्यांनी घेतलेल्या कष्टाची कल्पना येईल.
या तीन खंडांना न.चिं. केळकर, मा. श्री.उर्फ बापूजी अणे आणि दादासाहेब खापर्डे यांच्या स्वतंत्र प्रस्तावना आहेत. तिसऱ्या खंडाला स्वा.सावरकरांची प्रस्तावना घ्यावी असा बापटांचा मानस होता. सावरकर त्यावेळी स्थानबद्धतेत राहून सामाजिक कार्यात व्यग्र असल्यामुळे त्यांच्याच सूचनेनुसार खापर्डेंची प्रस्तावना घेण्यात आली.
इतक्या कष्टाने सिद्ध झालेले हे खंड कोणत्याही टिळक अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचे आहेत. तब्बल ९४ वर्षांनी त्यांची नवी आवृत्ती प्रसिद्ध करून लोकमान्यांच्या १०१व्या पुण्यस्मृती वर्षात परम मित्रचे प्रकाशक माधव जोशी यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. उत्तम छपाई, दुर्मिळ छायाचित्रे आणि सुहास बहुलकर, उदय पळसुले देसाई व गोपाळराव देऊसकर यांची देखणी मुखपृष्ठे, यांनी नटलेले हे तीनही खंड नक्कीच संग्राह्य आहेत. पूर्वी हे ग्रंथ वाचले होते आणि आता प्रकाशकांनी अगत्याने पाठवल्यामुळे संग्रह अधिक समृद्ध झाला. गेली दोन वर्षे हे काम चालू होते. प्रकल्पाचे अर्थकारण, प्रकृती अस्वास्थ्य, कोविड अशा काही गोष्टींनी काम रेंगाळले पण चिकाटीने पूर्ण झाले, हे महत्वाचे!
[तीन खंड}

डॉ.सच्चिदानंद शेवडे

तीन खंड मूल्य २७००₹ पोस्टल चार्ज २००₹ एकूण २९००₹