हरवलेले पुणे

मूल्य ४००₹ टपाल ३०₹ एकूण ४३०₹

हरवलेल्या पुण्याची ही माहिती पुन्हा पुन्हा सांगणे फार जरुरीचे आहे ; कारण आता तर काळाच्या अनाकलनीय ओघात बरेच काही फार चटकन हरवून जात आहे . स्मरणशक्तीलासुद्धा मर्यादा असतात . जुन्या गोष्टी विस्मृतीत जायलाही फार वेळ लागत नाही .

त्याचप्रमाणे अक्षय्य टिकवण्यासाठी कोणत्याही गोष्टीला उजाळा हवाच , आपल्या पुणे शहराचा समृद्ध वारसाही सतत नव्या पिढीच्या नजरेसमोर असला पाहिजे , तरच त्यांना त्याची जाणीव राहील .

हा विषय इतिहासाच्या बासनात गुंडाळून ठेवण्याचा नव्हे किंवा संशोधकांच्या मनोरंजनाचा खेळ नव्हे . प्रत्येक पुणेकराच्या मनात तेवती राहणारी ही एक अस्मिता आहे . ती जपलीच पाहिजे .

नवीन पिढीला अप्रूप वाटणाऱ्या गोष्टी आजच त्यांच्या कानी जायला हव्यात ; कारण त्यांच्या आठवणी उद्याची शे – पाऊणशे वर्षे अखंडित राहणार आहेत .

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांचे मनोगत

शिक्षणाने आणि व्यवसायानेही आर्किटेक असलेले डॉक्टर अविनाश सोवनी आवड म्हणून इतिहास वाचू लागले आणि हौशी इतिहास संशोधक ही झाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा विषय म्हणून जुन्या वास्तु आणि नगररचना यांची निवड करावी, हे स्वाभाविकच होते. पुण्याची ओढ अशी विलक्षण आहे की, नोकरीच्या निमित्ताने दोन-चार वर्षाकरिता इथे आलेला माणूसही इथेच स्थायिक होऊन जातो. डॉक्टर सोवनी तर पुण्यातच जन्मलेले, वाढलेले. तेव्हा पुण्याची नगररचना आणि पुण्यातील जुन्या वास्तू — वाडे, देवळे, हौद, पूल, बागा– या सर्वांविषयी त्यांना ओढ, जिज्ञासा वाटत नसली तरच आश्चर्य.

डॉक्टर सोवनींच्या इतिहासाच्या आवडीचे ध्यासात केव्हा रूपांतर झाले, त्यांनाही कळले नाही. आणि मला वाटते, गेली वीस– पंचवीस वर्षे ते त्यांच्या हरवलेल्या पुण्यात रमून गेले आहेत. हरवलेले पुणे या लेखमालेच्या रूपाने त्यांचा अभ्यास वीस वर्षांपूर्वी शब्दबद्ध झाला आणि पाठोपाठ त्याचे पुस्तकातही रूपांतर झाले. या अभ्यासात त्यांनी पुणे नगर संशोधन वृत्ता सारख्या साधनग्रंथाचा, परंपरेने चालत आलेले आख्यायिकांचा आणि अगदी जरूर तेथे थोड्याफार कल्पनाशक्तीचा उपयोग केला आणि त्याला सुरेख रेखाटनांची जोड दिली. ते पुस्तक झाले तरी सोवनींची काही त्या ध्यासातून सुटका झाली नाही. त्यांची शोधयात्रा चालूच राहिली आणि आता त्यांनी पहिल्या आवृत्तीत जवळजवळ तेवढीच भर घालून ही दुसरी आवृत्ती तयार केली आहे.

स्थळे, बागा, पेठा,ओढ़े,पूल,देवळे अशा नाना विषयातील रंजक माहितीने भरलेले, रेखाटनांनी आणि सजविलेले आणि अनेक जुन्या आठवणी जागवणारे हे पुस्तक मला आवडले. मला वाटते सर्वच वाचकांना ते आवडेल.