प्रक्रिया # ३
“शत्रूकडे असे काय जास्त होते आणि आमच्याकडे असे काय कमी होते?
इथे सह्याद्री होता, सातपुडा होता, समुद्र होता, समृद्ध संपत्ती होती, बलाढ्य मनगटे आणि धाडसी छाताडे होती, तरीही पराभव? का?
कारण कमी पडले अचूक नेतृत्व. कमी पडला भोवतालच्या जगाचा आणि शत्रूपक्षाचा अभ्यास.
आम्ही नरसिंहांच्या, श्रीकृषणांच्या आणि श्रीरामांच्या फक्त पूजा आणि आरत्या केल्या. अभ्यास आणि अनुकरण कधी केलेच नाही.
या आक्रमकांचा धर्म, राजनीती, महत्वाकांक्षा, अस्मिता आम्ही कधी अभ्यासलीच नाही, म्हणून ती कळलीच नाही. अन् ती पुढे कधीही कळणारही नव्हती.
याच चुका पुढे शेकडो वर्षे करीत राहणार आहोत हे विधिलिखित होते”.
– राजा शिवछत्रपति, बाबासाहेब पुरंदरे. (देवगिरी सारखा अभेद्य किल्ला असून केवळ १५ दिवसांत आपला पराभव झाला हयाबद्दल)
सिंधू-गंगा नदी खोऱ्यात शेती सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली, आपल्याकडे, महाराष्ट्रात मात्र दोन हजार वर्षांपूर्वी. असे का? ह्यावरून आमची चर्चा सुरू झाली ती शिवाजी महाराजांपर्यन्त पोहोचली.
महाराष्ट्राचा बराचसा भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. सह्याद्री आणि हे पठार, ह्यामुळे ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही ओळख महाराष्ट्राला मिळालेली आहे.
इथे शेती करायची म्हणजे हा खडक फोडून. त्यासाठी दगड आणि लाकूड अपुरे. त्यामुळे लोखंडाचा शोध लागेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात शेती शक्य होऊ शकली नाही का? नदीच्या कडेचे गाळाचे पट्टे सोडले तर शेतीला फार वाव मिळू शकला नाही.
तेच तिकडे परिस्थिती अगदी वेगळी. टेथीस समुद्रातला गाळ वर उचचला जाऊन निर्माण झालेला हिमालय. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या दर वर्षी भरपूर गाळ वाहून आणतात. गंगा-सिंधूचे खोरे म्हणजे त्या गाळाच्या थरांनी बनलेला प्रदेश. धान्य फेकले तरी उगवेल अशी परिस्थिती.
त्यामुळेच ह्या प्रदेशाने आक्रमणेही खूप झेलली.
ह्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांशी लढा द्यायला तंत्र शिवाजी महाराजांनी बरोब्बर ओळखले – डोंगरिकिल्ले आणि गनिमी कावा.
मैदानी , सपाट प्रदेशात visibility असते. कितीतरी लांबच्या गोष्टी दृष्टीपथात असतात. डोंगरात, दोन पावलांवर दबा धरून बसलेला शत्रू दिसत नाही. डोंगराळ प्रदेशाची सवय नसलेल्या शत्रूशी लढायला ह्या दोन गोष्टींचा अभ्यास आणि वापर शिवाजी महाराजांनी प्रभावीपणे केला.
स्वराज्याची पहिली मोठी लढाई म्हणजे फत्तेखानाविरूद्ध, पुरंदरवरून लढलेली. हा उल्लेख केल्यावर मुलं जी खुलली. काय शस्त्र वापरले त्यांनी? मोठ्ठाले दगड वरून शत्रूवर चक्क सोडून दिले. एक दगड खाली येताना आणखी दगड घेऊन यायचा. ह्या माऱ्यानेच शत्रू अर्धा बेजार झाला. वरून एवढे प्रचंड दगड असताना प्रचंड सेना आणि शस्त्रे असून उपयोग काय?
किती कल्पकता. आपल्याकडे आहेत त्या संसाधनांचा प्रभावी उपयोग, आणि त्यासाठी शत्रूचा, भूगोलाचा अभ्यास हेच शिवाजी महाराजांच्या आणि शहाजी राजांच्या चारित्रातून पदोपदी दिसतं.
ह्या लढाईवरून बाजी पासलकरांचा विषय निघाला. स्वराज्याचे पहिले सेनापती. आदल्याच दिवशी पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांबद्दल बोललो होतो. वरसगाव धरणाच्या जलशयाचे नाव, ‘वीर बाजी पासलकर’ जलाशय तर पानशेतचा आहे ‘तानाजी सागर’ हे सांगितले.
सचिन म्हणाला, ‘भूगोलापासून सुरुवात केली की सगळे विषय येतातच आणि त्यांचा परस्पर संबंध ही छान कळतो” अगदी खरं आहे ते.
@अदिती देवधर