प्रक्रिया डायरी #२

मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदी दुथडी भरून वहात आहे. त्यात आज आहे, १२ जुलै.

मुलांशी ’१२ जुलै १९६१ पानशेत प्रलय’ ह्याबद्दल आज गप्पा मारल्या. मुठा नदी, तिच्या दोन उपनद्या आणि पुण्याला पाणी पुरवठा करणारी चार धरणे ह्याबद्दल मागच्या आठवड्यातच बोललो होतो.

गोळे सर आणि सुलभा ब्रह्मे ह्यांच्या ‘पानशेत प्रलय’ ह्या अहवालाचा सुरुवातीचा भाग वाचला.

पानशेत धरण फुटले ह्याचा पुणे शहारासाठी काय अर्थ आहे? हे सांगण्यापेक्षा त्यांना नकाशा दाखवला. खडकवासला साखळी धरण योजना हा शब्द माहित नसला तरी पानशेत, वरसगाव, टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात जमा होते हे त्यांना नकाशावरून लक्षात आले. म्हणजे पानशेत धरण फुटले तेव्हा ते सगळे पाणी खडकवासला धरणात आले हे त्यांच्या लक्षात आले. तेथून पुणे शहारापर्यंत पाण्याचा प्रवास आपोआप लक्षात आला.

पानशेत पूराबद्दल सांगताना मागे एकदा घाणेकर सर म्हणाले होते की सकाळमध्ये १० जुलैला, ‘पानशेत धरणाला धोका आहे’ अशी छोटीशी बातमी होती. त्यावेळी बहुतांश लोकांची प्रतिक्रिया होती की, ‘त्या तिकडे पानशेत धरणाला धोका आहे, पुण्याला काय फरक पडतो’.

भूगोलाचे ज्ञान किती महत्वाचे आहे ह्याचे ह्यापेक्षा बोलके उदाहरण कोणते? 😊

पानशेतचा पूर ही नैसर्गिक आपत्ती होती का? की मानवनिर्मित होती ह्याबद्दलही चर्चा केली.

पूराचे फोटो बघताना, ओंकारेश्वर मंदिरातला नंदी पडलेला आहे, असा एक फोटो आला. पुढे घोरपडे घाटाचा फोटो आला तेव्हा सांगितले इथेही शंकराचे देऊळ होते, त्याचा नंदी तर वाहून गेला तो कधी सापडलाच नाही.

‘तो जाणार कुठे?, नदीपात्रातच पुढे कुठेतरी असणार.. तो आपण शोधू शकतो..’ इति सृजन-वेद. ही जोडगळी एकाच वयाची, सारख्याच उंचीची. दोघांचे मस्त जमते. कल्पनाही एकमेकांना पूरक सुचत असतात.

‘आपण घोरपडे घाटावरचा वाहून गेलेला नंदी शोधूया’ ही कल्पना धरून दोघं जे सुरू झाले. पूरात फा. फे अडकतो अशी एक गोष्ट आहे. मुलांना म्हणलं, ‘फा. फे नंदी शोधतो’ अशी गोष्ट लिहा.

माझा काका ‘Mathematical Modeling’ करतो. दोन्ही धरणांची क्षमता आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यादिवशी किती पाणी वाहून आले ह्याचा अंदाज आहे. हे काही घटक वापरून, घोरपडे घाटावरच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे अवशेष किती अंतर वहात गेले असतील ह्याचे मॉडेल करता येईल का, अशी त्याच्याबरोबर मी चर्चा केली होती. मुग्धा-सचिनला नंतर हे सांगितलं.

सृजन आणि वेदलाही तीच कल्पना सुचली पाहून मला तर वाटले ‘I found my tribe’ 😊, आता आणखी मजा येणार गप्पा मारायला आणि अशाच आणखी ‘अतरांग’ कल्पना रंगवायला.

#JeevitNadi, #PrakriyaColearningSpace
@अदिती देवधर