प्रक्रिया # ४
निसर्गात सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. हे नुसतं न सांगता ‘Web of Life’ ह्या खेळातून प्रत्यक्ष बघता येतं. आज तो खेळ खेळलो.
हा खेळ धर्मराजने मला शिकवला होता. एका वर्कशॉपमध्ये मागे हा खेळ मी घेतला होता. जुईली त्यावेळी बरोबर होती. वर्कशॉपनंतर ती माझी कार्डस घेऊन गेली आणि त्यात सुधारणा करून मला सेट आणून दिला.
सूर्य, पाऊस, समुद्र, नदी, जंगल, मासे, प्राणी, पक्षी, अशी वेगवेगळी कार्डस आहेत. प्रत्येकाने एकेक कार्ड घ्यायचे. सुतळीचा एक गुंडा घ्यायचा आणि सुरुवात करायची. समजा सूर्य कार्ड असल्यापासून सुरुवात केली, तर त्या व्यक्तीने सुतळीचे टोक आपल्याकडे धरून ठेवून दुसऱ्या व्यक्तीकडे गुंडा द्यायचा. हे करताना, त्या व्यक्तीच्या कार्डवर असलेल्या गोष्टीशी सूर्याचा काय संबंध आहे हे सांगायचे. मग त्या व्यक्तीने, सुतळी आपल्या बोटाभोवती गुंडाळून मग गुंडा असाच पुढे द्यायचा आणि त्या व्यक्तीच्या कार्डवर असलेल्या गोष्टीशी आपल्या कार्डवरच्या गोष्टीचा संबंध सांगायचा. असे कितीही राऊंडस करता येतात.
अशा तऱ्हेने हळूहळू जाळे तयार होते, निसर्गात जसे असते तसे. एकेकाला त्याच्या हातातली सुतळी सोडायला सांगायची. मग ते जाळे सुटत जाते. निसर्गातून ही एक गोष्ट नष्ट झाली तर बाकी साखळी कशी तुटत जाते हे प्रत्यक्ष दिसते.
अर्थात मुलांबरोबर खेळताना बरेच मजेशीर अनुभव येतात. खेळताना मुलांना अधून मधून सुतळी जास्ती इंट्रेस्टिंग वाटत होती. मग एकाने ती सोडायची बाकीच्यानी ती द्यायच्या निमित्ताने आपली जागा सोडायची असे चालू होते. मग मी आणि शाल्मली गाडी परत खेळाकडे आणत होतो.
सुतळी घट्ट धरून ठेवा म्हणल्यावर काही आज्ञाधारक मुलांनी तिचे बोटाभोवती इतके घट्ट वेढे दिले की बोट दुखायला लागले. खेळ थांबवून आधी ते सोडवावे लागले.
अशा गमती-जमती होत खेळ संपला. मग तोच धागा पकडून ‘apex predator’ बद्दल चर्चा केली. Yellow Stone National Parkमध्ये लांडगे परत आणले आणि त्यामुळे संपूर्ण परिसंस्थेवर कसा सकारात्मक परिणाम झाला ह्याबद्दलची क्लिप बघितली.
मग तसेच प्रचंड वेगाने फोफावलेल्या जलपर्णीकडे चर्चा गेली. ती एवढी का वाढते, तिच्यावर नियंत्रण ठेवणारा predator इथे का नाही ह्याबद्दल बोललो, जलपर्णी भारतात कशी आली आणि पसरली ते.
मागे धर्मराजने वनपिंगळ्याबद्दल लिहिलेला लेख वाचला होता. त्यात त्याने एक वाक्य लिहिले होते, ‘वनपिंगळा वाचला तर जंगल वाचेल’. जंगल वाचलं तर वनपिंगळा वाचेल हे ठीक. पण हे उलटं कसं, असं त्याला मी विचारलं होतं. शिवाय ‘वाघ वाचला तर जंगल वाचेल’ हेही वाचलं होतं पण कळलं नव्हतं. तेव्हा त्याने ‘trophic pyramid’ ही संकल्पना समजावून सांगितली होती.
पिरॅमिडचा खालचा थर म्हणजे producers- वृक्ष, झुडुपे, गवत इ. त्याच्यावरचा थर म्हणजे primary consumers. Producers ज्यांचे भक्ष आहेत असे. मग वर secondary आणि वर tertiary consumers.
अशा तऱ्हेने सगळ्यात वर असतो तो Apex Predator. एक Apex Predator जगायचा असेल तर खाली हा एवढा पाया उपलब्ध पाहिजे. त्यामुळेच वनविभागाचा फोकस apex predator आहे, वाघ वाचला तर जंगल वाचेल हे त्यामुळेच.
आज मुलांशी apex predator बद्दल चर्चा करताना धर्मराजने सांगितलेलं सगळं आठवत होतं.
WOTR ह्या संस्थेत मी सॉफ्टवेअर कन्सलटंट म्हणून काम करत होते. गणितात पदयोत्तर शिक्षण आणि नंतर आयटी मध्ये काम. Ecology ह्या विषयाशी, किंबहुना निसर्गाशीच खूप असा संबंध आला नव्हता. ऑफिसमध्ये गिरीश आणि धर्मराज ह्या दोन अवलियांशी ओळख झाली आणि ही अशी ज्ञानवृद्धी रोज होऊ लागली. इतक्या नवीन गोष्टी दोघांकडून कळायचा.
मग Ecological Societyच्या कोर्सला प्रवेश घेतला ते त्यामुळेच. तिथे गोळे सर, गोळे मॅडम, महाजन सर आणि सगळ्यांकडून इतकं शिकायला मिळालं.
ह्या सगळ्यांनी इतकं मुक्त हस्ते ज्ञान दिलंय. त्यातलं काही अंश जरी मी तितक्या ताकदीने पुढे पोहोचवू शकले तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन.
@अदिती देवधर
#PrakriyaColearningSpace