प्रक्रिया # ५

भूगोल शिकवायला सुरुवात केली की कुठे कुठे जातो, कुठल्या विषयांना स्पर्श करतो ह्याला काही बंधनच नसतं.

फेब्रुवारी-मार्च २०२२ च्या संदर्भ अंकातील मोबी-डक गोष्ट वाचली, जगाचा नकाशा समोर ठेवून. चीनहून एक मालवाहू जहाज अमेरिकेकडे २८८०० खेळणी घेऊन जात होते. पिवळी बदके, निळी कासवे, हिरवे बेडूक, अशी ती प्लॅस्टिकची bath toys होती, म्हणजे bath टब मध्ये पाण्यावर तरंगणारी खेळणी.

उत्तर पॅसिफिक महासागरात अचानक वादळ झालं आणि काही जहाजे बुडली. ह्या खेळणी घेऊन जाणाऱ्या जहाजालाही जलसमाधी मिळाली. २८,८०० खेळणी महासागरात पसरली.

प्लॅस्टिकची असल्याने त्यांचे विघटन होणार नव्हते.
समुद्रातील पाण्याचे प्रवाह, त्यांची दिशा हा अभ्यास क्लिष्ट आहे. उपग्रहांच्या साहाय्याने सुद्धा अजून आपल्याला हे पूर्ण कळलेलं नाही. हे त्या खेळण्यांमुळे शक्य झालं. शास्त्रज्ञानी किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांना ही खेळणी सापडली तर कळवा असे आवाहन केले.

पाण्यावर तरंगत तरंगत ही खेळणी अलास्का, हाँगकाँग येथे पोहोचलीच पण अटलांटिक महासागर आणि आर्टिक्ट समुद्रातही पोहोचली. आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाह कळायला खूप मदत झाली.

ह्यापूर्वी असा प्रयोग मुद्दाम केला होता. २००० बाटल्या समुद्रात सोडल्या होत्या आणि ज्यांना मिळतील त्यांनी कळवा असे आवाहन केले होते. केवळ ७० बाटल्यांचाच ठावा ठिकाणा मिळाला. काही बाटल्यांची टोपणे उघडली, काहीना छिद्र पडून त्या बुडल्या.

त्यापेक्षा अपघाताने समुद्रात पडलेल्या ह्या खेळण्यांनी जास्ती मदत केली सागरी अभ्यासात.

गोष्ट वाचताना आमचा भूगोलाचा अभ्यास आपोआप झाला. जहाज कोठून निघाले, कोठे चालले होते, अपघात कुठे झाला आणि खेळणी कुठे कुठे मिळाली हे सगळं जगाच्या नकाशावर छान बघता आलं.

गोष्ट संपली. शार्दूल विचारमग्न होता. “ताई, खेळणी अपघाताने पडली, पण त्या बाटल्या मुद्दाम सोडल्या, २००० पैकी ७० च परत आल्या. म्हणजे बाकीच्या समुद्रात आहे, हे प्रदूषणच नाही का?”, त्याचा प्रश्न.

त्या आधी काल सुरू केलेली trophic pyramid ची चर्चा केली. हे झाडाचे चित्र दाखवलं. झाडाशी कोणाकोणाचा संबंध आहे. मुलांकडूनच एकेक कनेक्शन मिळत गेलं.

झाडाच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधतात. शिंपी पक्षी पाने एकत्र शिवून घरटे बांधतो. झाडाची फळे पक्षी खातात. शिवाय त्या फळांवर इतरही विविध जीव, कीटक गुजराण करतात. फुलांवर मधमाशा तसेच शिंजीर सारखे पक्षी येतात. झाडाच्या ढोलीत घुबडासारखे पक्षी राहतात.

पक्षांची अंडी/ पिल्ले साप खातो. सापाला घुबड/ गरुड खातात.
असंख्य कीटक झाडावर असतात. पाने गळून खाली पडली की ती पचवणारे मातीतील कीटक आणि सूक्ष्मजीव. एवढे सगळे जाळे त्या एका झाडामुळे असते.
हे एक झाड तोडले तर काय होईल? आणि असेच होत राहिले तर त्या जाळ्याचे काय होईल?

मल्हार म्हणाला, वादळ आले आणि एक मोबाइल टॉवर पडला तर कसं आपलं कनेक्शन तुटेल, तसंच.

संदर्भ अंक: https://www.sandarbhsociety.org/pdf/Issue-134/WEEK-7-MOBY-DUCK-Issue-134-Feb-March-2022.pdf

Priyadarshini Karve संदर्भचे अंक सुंदर आहेत.

#PrakriyaColearningSpace