संवाद १ – “पहिल्या सत्रासाठी वडिलांनी येणे आवश्यक आहे”-इति आमची मदतनीस. “नाही शक्य त्यांना, ऑफिसमध्ये सुट्टी घ्यावी लागेल त्यांना, त्यांना आवडत नाही ते”- इति आई पालक
संवाद २ – “ अहो आजचे चौथे सत्र आहे, आज मी सांगितले होते की मला बाबांशी बोलायचे आहे. आले आहेत का ते?” इति मी (समुपदेशक). “ नाही जमलं त्यांना, ते नाही आले तर जमणार नाही का? मुलांना समस्या असतात , त्यांना ताण असतो वगैरेवर त्यांचा विश्वास नाही.” इति आई पालक
संवाद ३ –“मला वडिलांशी बोलता येईल का त्याच्या?” इति समुपदेशक. “ तो येणार नाही, त्याचा सौभाव लई तापट हाय. त्याला काय मदे घेऊ नका.” इति आजी पालक
संवाद ४- “तुम्ही किती वेळ देता मुलांना?”इति समुपदेशक. “ नाही जमत मला, आणि मुलांशी बोलायचं म्हणजे वेगळ काय करायचं ते सुचत नाही’” एक बाबा पालक.
वरील सर्व संवाद वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पालकांशी झालेला आहे. पण त्या संवादांचा लसावि काढला तर काय निघेल? की मुलांच्या कोणत्याही समस्येमध्ये बाबा लोकांना वेळ नाही, रस नाही, वेळ देण्याची तयारी नाही.
हे चित्र खरतर फार नवीन नाही. वर्षानुवर्षे मुलांच्या शाळेतील पालकसभांना ९० टक्के आई पालक आणि १० टक्के बाबापालक असणे अगदीच सामान्य आहे. मुलांच्या शिबिरांसाठी चौकशी करणे असो, त्यांना सेशन्सला सोडणे असो किंवा त्यांच्या निकालासाठी, सर्टिफिकेटसाठी रांगा लावणे असो, त्यांना क्लासेसना, बागेत, मैदानावर सोडायचे असो. जिथेतिथे आईने असणे आपण किती गृहीत धरले आहे. पण यामुळे मुलांच्या आयुष्यातील किती खास क्षण, गोष्टी आपण हरवून बसतोय याची बाबा पालकांना कल्पना पण नसेल.
पूर्वीच्या काळी आई आणि वडिलांच्या भूमिका अगदी सरळ सरळ विभागलेल्या होत्या. आर्थिक जबाबदारी वडिलांची आणि कुटुंब चालवण्याची आईची. पण जसजसे जग आधुनिक बनत गेले तसतसे दोघांच्याही भूमिकाही बदलत जाणे अपेक्षित होते. पण तसे ते होताना दिसत नाही. काही तुरळक आणि सुखद फरक सोडता बाबा पालक अजूनही आर्थिक जबाबदारीच्या पलीकडे जाताना दिसत नाही.
मुलामुलींचा सर्वांगीण विकास संतुलित व्हावा असे वाटत असेल तर आई आणि बाबा दोघांचाही समान वाटा त्यात असणे अगदी गरजेचे आहे. मुलांच्या विकासामध्ये वडिलांचा केवळ अप्रत्यक्ष सहभाग असून चालणार नाही तर प्रत्यक्ष सहभागही असायलाच हवा आणि तो मनापासून असायला हवा.
आई मुलांना प्रेम देते, त्यांची काळजी घेते, त्यांना चूक बरोबर पण शिकवते. पण वडील मुलांना धाडसी बनवतात, त्यांना व्यवहारी बनवू शकतात, पैशांची, व्यवहाराची ओळख करून देऊ शकतात. वडिलांच्या बरोबर मुले जास्त मोकळ्या मनाने धोका पत्करू शकतात.
पण घरामध्ये वडील केवळ अर्थार्जन करण्यापुरते आणि कुटुंब प्रमुख म्हणून घेण्यासाठी असतील तर त्यामुळे मुलांच्या विकासात एकांगीपणा निर्माण होतो. इस्रायलच्या संशोधक रूथ फिल्डमेन यांचं म्हणणं आहे की मुलांची काळजी घेतानाच्या काळात ज्या प्रकारचे हार्मोनल बदल आईमध्ये होतात तेच वडिलांमध्येही होतात. बाळाला सांभाळायची जबाबदारी आपलीदेखील आहे, हे जेव्हा त्यांचा मेंदू स्वीकारतो तेव्हा त्यांच्यामध्येही आईप्रमाणेच बाळाप्रती ओढ निर्माण होते.
काही संशोधनांमधून असे सिध्द झाले आहे की ० ते ५ वर्षांमध्ये ज्या मुलांचे वडील पालक त्यांच्या बरोबर खेळतात, त्यांना भरपूर वेळ देतात, त्यांची बुद्धिमत्ता चांगली विकसित होते. तसेच ज्या मुलामुलींच्या बरोबर त्यांच्या वडिलांचे भावनिक संबंध दृढ असतात ती मुलेमुली आयुष्याला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जातात. ज्या मुलांना वडिलांचा सहवास पुरेसा किंवा योग्य पद्धतीने मिळत नाही ती मुले एकलकोंडी, आत्मविश्वास नसलेली किंवा आक्रमक आणि हट्टी होण्याचे प्रमाण वाढते असेही संशोधनात आढळले आहे.
वडिलांनी वेळ देणे जसे गरजेचे आहे तसेच तो कसा देता येईल हे समजून घेणे पण गरजेचे आहे. वेळ देणे म्हणजे फक्त अभ्यासाची चौकशी करणे, जेवण झाले का ते विचारणे, मॉलमध्ये फिरायला नेणे, एवढेच नाहीये तर मुलांचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर indoor, outdoor खेळ खेळणे, एकत्र जेवण करणे, इंटरेस्ट असेल तर मुलांबरोबर जेवण बनवणे, अशा अनेक मार्गांनी तुम्ही मुलांबरोबर वेळ घालवू शकता. यातून बाबांचा मुलांबरोबर संवादही वाढत जातो. सुरवातीला संवाद साधायला हेतुपुरस्सर प्रयत्न करावे लागतील. मग हळूहळू अजून पर्याय सुचत जातील. जर हे प्रयत्न मूल अगदी लहान असल्यापासून केले तर मोठे होईपर्यंत मुलाच्या मनात आई एवढीच बाबाची प्रेमळ आणि संवाद्पूर्ण प्रतिमा तयार होते. या सगळ्यात महत्वाचे की वडिलांच्य…