#Scoolpreparation
#शाळेचीतयारी

अशी करा शाळेची आणि शैक्षणिक वर्षाची तयारी –
👔🎒👟🎨📚

मे संपत आलेला आणि जूनची चाहूल म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात…

अर्थातच शाळेच्या पूर्वतयारीची ही वेळ. हल्ली दोन्ही पालक नोकरी/ उद्योग यात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांना मदतीला घेऊन नीट नियोजन करा आणि शाळेची तयारी एन्जॉय करा… तयारी आधीपासून करून ठेवली तर एनवेळची धावपळ वाचते. 🥳🥳

१. शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी करा.

📍 वह्या – पुस्तके
शाळा देणार की तुम्ही आणणार त्यानुसार शाळेच्या संपर्कात रहा. बरेचसे पालक सरळ मुलांवर ढकलून देतात याने आम्हाला सांगितलेच नाही म्हणून.
पुस्तके, वर्कबुक कोणत्या प्रकाशनाची, वह्या किती लागणार, कोणत्या आकाराच्या, त्याची नीट माहिती घ्या.
दणकट बांधणीच्या वह्या घ्या.

📍कव्हर्स – वह्या पुस्तकांच्या संख्येनुसार आकारानुसार खाकी कव्हर्स चा रोल मिळतो तो आणता येईल. वेळ ठरवून मुलांसोबत बसून कव्हर्स घाला.

📍नावाचे स्टिकर्स – खूप वेगवेगळे, लिहायला पुरेशी जागा असलेले आणि गम चांगला असलेले आणा.

📍कम्पास बॉक्स/ पाऊच –
असा अनुभव आहे की मुलांकडे सुंदर रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारांचे पाऊच असतात पण वेळेला त्यात एकही लागणारी गोष्ट सापडत नाही. तेव्हा
भौमितिक साहित्यासाठी दणकट कम्पास बॉक्स घ्यावी आणि पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर ठेवायला आटोपशीर पाऊच वापरावा.

📍दप्तर –
पुस्तके वह्या यांची संख्या आणि आकार यांचा अंदाज घेऊन दप्तर निवडा, फार मोठ्या दप्तराचे वजन मुलांना सांभाळता येत नाही, आणि लहान दप्तरात वस्तू कोंबून बसवाव्या लागतात मग ते उसवते, फाटते..

📍 प्रोजेक्टचे साहित्य –
वर्षभर वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या स्केचपेन, रंग, सेलोटेप, ग्लुस्टिक, स्टेपलर, पंचिंग मशीन, पेपर कटर, कात्री, काही चार्ट पेपर, रंगीत टिंटेड पेपर, आखीव आणि कोरे फुलस्केप असे साहित्य आणून ठेवावे म्हणजे प्रोजेक्ट सबमिट करायच्या आदल्या रात्री दुकाने बंद झाल्यावर धावपळ होत नाही.

📍 गणवेश – रोजचा आणि स्पोर्ट्स साठीचा – ड्रेस आणि शूज, सॉक्स, हेअर बँड, रिबीन्स, स्वेटर इत्यादी.

शाळेच्या सूचनांनुसार आणावा, थोड्या वाढत्या मापाचा आणावा, मुलांची उंची झपाट्याने वाढण्याचे वय असते, अधे मध्ये काही वेळा मिळत नाही. ड्रेस आयता आणल्यास टेलर कडून डबल टीप मारून घ्यावी म्हणजे उसवण्याचा प्रश्न येत नाही.

📍पाण्याची बाटली –

पुरेशी लहान/ मोठी, योग्य वजनाची, दप्तरात मावेल अशी, सहज उघडता येणारी, न गळणारी असावी. शक्यतो तळाशी नाव लिहावे किंवा काही खूण करावी.

📍डबा –
पटकन उघडता येणारा, तेल बाहेर न येणारा, वजनाला हलका असावा. दोन तीन वेगवेगळ्या साईझ चे डबे असतील तर पदार्थाप्रमाणे योग्य डबा देता येतो.

📍रायटिंग पॅड – परीक्षा, प्रोजेक्ट साठी लागते, आणून ठेवलेले नसेल तर ऐनवेळी मिळेल ते मिळेल त्या किमतीत घ्यावे लागते.

📍रेनकोट, टोपी, स्कार्फ अशा सिझनल गोष्टी..

📍नॅपकिन/ रुमाल – मुलांबरोबर अवश्य द्यावेत, ते गणवेशबरोबर आधीच वेगळे आणून ठेवावेत.

२. या वस्तू ठेवण्यासाठी मुलांना एक जागा व्यवस्थित सुरुवातीपासून ठरवून द्या आणि वर्षभर ती कायम ठेवा, तुमच्या सोयीनुसार बदलू नका. काही कारणाने बदललीच तर वेळेत मुलांना सांगा.
मुलांचा अभ्यासातला निम्मा वेळ वस्तू शोधण्यात जातो😅

३. शाळेच्या फी भरण्याच्या तारखा नोंदवून ठेवा, वेळेच्या आत फी भरा.💰

४. शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांचे डोळे तपासून घ्या. स्क्रीन टाइम वाढला आहे खूप. नंबर नसेल तर उत्तमच, पण असेल तर वेळेत उपाय करता येतील.👀

५. मुले शाळेत कशी जाणार, स्वतः चालत/ सायकलवर/ तुम्ही सोडणार का/ व्हॅन/ रिक्षा/ स्कूल बस – त्यांच्या वेळा, पैसे, पिक अप, ड्रॉप पॉईंट याचे नियोजन करा.
मुले सायकल वर जाणार असतील तर सायकल वेळेत सर्व्हिसिंग करून तयार ठेवा.

६. मुलांना ट्युशन/ ग्राउंड/ हॉबिक्लास लावणार असलात तर शाळेच्या वेळा, सर्व अंतरे लक्षात घेऊन त्यांचेही वरील प्रमाणेच नियोजन करा.

७. हे सगळं आपण मुलांच्या जडण घडणीसाठी करत आहोत. मोठ्या मुलांना ( १०+) थोडे ताणायला हरकत नाही. लहानांना निष्कारण दमवू नका. त्यांना योग्य ताजा आहार, आणि पुरेशी विश्रांती मिळेल असे पहा.

८. मुलांना वेळापत्रक बनवायला आणि पाळायला मदत करा. घरचा अभ्यास ( शाळेने दिलेला होमवर्क) करण्यासाठी वेळ राखून ठेवा.

या प्रमाणे पूर्व तयारी केली आणि कोणत्या वस्तू कुठून कधी आणायच्या याचे नियोजन केले तर वेळ, पैसे, श्रम सर्वांचीच बचत होईल आणि काम छान पूर्ण झाल्याचा आनंद समाधान मिळेल. सुरुवातीपासूनच रुटीन नीट लागायला मदत होईल. 📇

Happy School Preparation…
तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेची तयारी कशी करत होतात किंवा करता? तुमच्याही टिप्स माहीत करून घ्यायला आवडतील 🤗😇

ज्योती केमकर