#Aptitudetest
#Careerguidance
#Careercounseling

Aptitude test – कल किंवा अभिक्षमता चाचणी – का करायची किंवा करायची नाही?

❌✅⚓

साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत करिअरचे मोजके पर्याय लोकांना माहीत होते. इंजिनियर, डॉक्टर, वकील, रेल्वे, पोस्ट, नर्स, शिक्षिका, सरकारी किंवा खासगी नोकरी, कारखान्यात नोकरी इ.
👩‍🎓👩‍🏫👷🤵⛑️

ज्यांचा घरचा काही व्यापार, उद्योग धंदा, दुकान वगैरे असेल ते तोच पुढे चालू ठेवत. नाटक, सिनेमा किंवा खेळ ही लौकिकार्थाने ‘वाया गेलेल्यांची’ क्षेत्रे होती.
🎭☠️🤸⛹️

प्रसार माध्यमे मर्यादित असल्यामुळे कोणी काही वेगळं करत असेल तर ते सर्वसामान्यांना माहीत असण्याची शक्यताही कमी होती.

एकुणात कामाच्या बाबतीत वैयक्तिक आवडी निवडी सांभाळत बसायला फार कुणाला सवड नव्हती. मिळेल ते काम स्वीकारून लवकर पोटापाण्याची सोय बघणे, संसारात स्थिरस्थावर होणे, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणे या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या गरजा होत्या आणि प्राधान्यक्रमही होते.
🕰️🪜⚖️📚

सध्या मात्र अभ्यासक्रमांचे आणि करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यातले काही इतरांपेक्षा जास्त चमकदार दिसत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांचा ओढा अशा ठिकाणी असतो.
👑💎🌟

असे करिअर निवडायचे तर शिक्षणाचा कोर्स तसा निवडावा लागतो. त्यासाठी बौद्धिक क्षमता, वेळ, कष्ट, आर्थिक पाठबळ अशा अनेक गोष्टींची गरज असते. एवढं करून इच्छित ठिकाणी प्रवेश ( अभ्यासक्रम किंवा नोकरी) मिळाला तरी मुलं मनापासून समाधानी असतीलच असं दिसत नाही. सुरुवातीला अस्वस्थता, मग कुरबुर, चिडचिड, असमाधान, मानसिक अस्वास्थ्य असे चढत्या क्रमाने बदल दिसायला लागतात. अभ्यासक्रम, शाखा बदलणे, नोकऱ्या बदलणे, कामाचे क्षेत्र बदलणे अशी धरसोड वृत्ती दिसायला लागते. आता कामाची क्षेत्रे इतकी उपलब्ध आहेत की ‘ हे करून तर बघू’ असं म्हटलं तर पाऊण आयुष्य करून बघण्यात जाईल. अशात संपूर्ण घरदार वेठीला धरलं जातं. हळू हळू हे सामाजिक अस्वास्थ्याकडे जायला लागतं. मग इतकं करून काय फायदा?
🌖🌗🌘🌚

बऱ्याच ठिकाणी योग्य मार्ग वेळेत निवडून आनंदी, समाधानी असणारेही खूप आहेत, पण योग्य मार्गदर्शनाअभावी चाचपडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यात पुन्हा ग्रामीण आणि शहरी असा एक मोठा फरक आहे.
🎲🌞⛅

तर एखादं क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे का? एखादी गोष्ट आपल्याला कितीही आवडत असली, तरी ती दीर्घकाळ करण्याची क्षमता आपल्यात आहे का? कुठे योग्य संधी मिळेल हे aptitude टेस्टमुळे आपल्याला नक्कीच कळू शकतं. बाजारात अनेक aptitude टेस्ट उपलब्ध आहेत. त्या standardized असतील तर त्यांचे निष्कर्ष 80 ते 90 % बरोबर येतात.
🗝️🪞📊📈

बुद्धिमत्तेचे आणि स्वभावाचे कोणकोणते पैलू, थोडक्यात आपले निरनिराळे गुण किती प्रभावी आहेत ते अशा टेस्टमधून कळते. विशिष्ट क्षेत्रात काम करण्यासाठी विशिष्ट गुणांचा समुदाय आवश्यक असतो, तर काही गुण प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असतात. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरला पेशन्टशी, नातेवाईकांशी केव्हा, काय, कसे बोलावे किंवा बोलू नये याचे भान असावे लागते, तर वकिलांचे भाषा आणि तर्क यावर जबरदस्त प्रभुत्त्व असायला हवे. म्हणजे भाषा दोघांची चांगली हवी. इंजिनियरची तासनतास एखादे काम चिकाटीने करायची तयारी हवी, व्यवसायिकाकडे दूरदृष्टी, नफा तोटा समजणे आणि मोजता येणे, व्यवहार कळणे हे गुण असायला हवेत.
🤝👫👬👭

निर्णय क्षमता, नियोजन तर प्रत्येक क्षेत्रात लागते. अशी खूप उदाहरणे देता येतील. यातले काही गुण/ क्षमता- अनुभवाने, सरावाने वाढत असले तरी जन्मतः असलेले आणि दहावीपर्यंत शिकताना मिळालेल्या वातावरणानुसार आलेले गुण टेस्ट मधून नक्की कळतात.

🚦🚧🛑

अशा टेस्टचे रिपोर्ट समजावून सांगणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे करिअर काऊन्सेलर मात्र तज्ज्ञ आणि अनुभवी असावे लागतात.

ज्यांना दहावीनंतर कोणत्या शाखेत जायचे, बारावी नंतर उच्चशिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची, उच्च शिक्षण घेत असताना स्पेशलायझेशन कशात करायचे, शिक्षण भारतात घ्यायचे की परदेशात याबद्दल संभ्रम आहे, त्यांच्यासाठी aptitude टेस्ट आणि करिअर काऊन्सेलिंग ही सुविधा फार उपयोगी आहे.
🌍🏦🕋

थोडक्यात तुमचे गुणावगुण आणि शिक्षणाच्या/ करिअरच्या उपलब्ध संधी/ पर्याय यांचा सुयोग्य मेळ घालण्याचे काम aptitude टेस्ट आणि करिअर काऊन्सेलिंग चे आहे.
❌✅🎯

ज्यांचा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करायचा निर्धार पक्का आहे, त्यासाठी लागेल ते स्वबळावर शिकायचा, त्यासाठी लागेल तितके कष्ट करायचा निश्चय अतिशय दृढ आहे, जबरदस्त जिद्द आहे, हार न मानण्याची वृत्ती आहे, त्यांनी अजिबात aptitude टेस्ट करू नये. ते जातील त्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतील.😊

शिक्षणाचा आणि भविष्याचा मार्ग निवडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्वांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी आज गुढीपाडव्याच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा!!💐💐🚩🚩

ज्योती केमकर
संस्थापक, संचालक
अभ्यासिका लर्निंग अँड रिसोर्स सेंटर,
शिक्षिका, स्कूल सायकॉलॉजिस्ट, करीयर काऊन्सेलर, पुणे