आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, असंच प्रत्येकाला वाटत असतं. तर मग भाषा का अशी?
मेंदूशी मैत्री
शब्दांच्या नकारात्मक जोडण्या
काही घरांत मुलांना उद्देशून बरेचदा तुच्छ उद्गार ऐकू येतात. ‘तो हा असाच आहे मठ्ठ’, ‘तिला दोन वेळा समजून सांग, म्हणजे एकदा तरी कळेल’ , ‘किती मंद आहेस तू!’ असं बोलणं मुलांच्या कानावर सतत पडत असतं. हे खूपच साधेसुधे उद्गार इथे लिहिले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटींनी वाईट दूषणं, काही वेळा शिव्या आणि सोबत हाताचा वापरही चालतो. यामुळे वाढत्या वयातल्या मुलां-मुलींच्या मनात ‘आपले पालक जसे म्हणतात, तसाच मी असणार’, यावर विश्वास बसतो. कारण मुलांचं आईबाबांवर अतिशय प्रेम असतं. क्षणिक संतापातून उद्गारलेल्या शब्दातून त्यांच्या मनात केवढी खळबळ माजत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
लहान मुलांच्या मनात तर ‘आई / बाबा म्हणतात म्हणून आपण चांगले’/ ‘ते वाईट म्हणतात म्हणून आपण वाईट’ हे पक्कं होऊन बसतं. या संवादातून, प्रसंगातून त्यांचं मन घडत असतं.
मुलांच्या मनात स्वत:विषयीची प्रतिमा तयार होत असते. आत्मविश्वास निर्माण होण्याचा तो काळ असतो. आपण जसे आहोत, तसे खूप चांगलेच आहोत, याबद्दल त्यांच्या मनात काही दुमत नसतं. स्व-प्रतिमा दृढ होण्याचा हा काळ असतो. अशा वेळी दुसऱ्यांमधले दोष वास्तविक पद्धतीने सांगायला हवेत. अतिगोड किंवा अतिवाईट नव्हे; तर योग्य शब्दात सांगण्याची गरज असते. त्यांना न खचवताही हे काम आई-बाबा चांगल्या पद्धतीने करू शकतात. अभ्यासामुळे तर नात्यात दरी पडायलाच नको; किंवा आधीच दरी निर्माण झाली असेल तर ती रुंदावायला नकोच नको. शिक्षण हे महत्त्वाचं आहेच. शिक्षणाला नाकारून किंवा कमी महत्त्व देऊन चालण्यासारखं नाही. पण अडचणी समजून घ्यायला घेणंही तितकंच गरजेचं आहे. मुलांच्या मेंदूत न्युरॉन्समध्ये नकारात्मक शब्दांच्या जोडण्या तयार करण्याचं काम आसपासच्या माणसांकडून होत असतं. ते व्हायला नको.
आईबाबा जेव्हा शांतपणे, योग्य शब्दात मुलांशी प्रेमाने संवाद साधतात, तेव्हा ऑक्सिटोसिनच्या प्रभावामुळे मुलांच्या मनात आईबाबांबद्दल विश्वास निर्माण होतो. मुलं त्यांच्या सूचनांचा नक्कीच विचार करतात. स्वत:मध्ये असलेल्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण वाईट शब्दांचा सतत भडिमार केला तर त्यांना योग्य मार्ग सापडत तर नाहीच. उलट मानसिक गोंधळ मात्र वाढतो.