बाप माझा कधी जगलाच नाही

जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं,
बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आलं नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही…

शाळेत पाठवून कर्तव्य केलं,आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं,
कामाच्या ओझ्याखाली ईच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

प्रत्येक आनंदाला आईचे हास्य पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो,
पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप मला कधी दिसला नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही

माझ्या आजारपणात आई कायम जवळ बसून रडत होती तिला मी विसरू शकलो नाही,
पण बाहेर डॉक्टर ला भेटून उपचारासाठी खस्ता खाणारा बाप मला कधी दिसलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

नोकरीसाठी आईने केलेली प्रार्थना बघून हळवा झालो,
पण बापाने चार ठिकाणी टाकलेल्या शब्दाची किंमत कधी कळलीच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

लग्न लावून सुखाने संसार करा म्हणणाऱ्या आईचे प्रेम आटलेले कधीच जाणवले नाही,
पण डोळ्यात सुख आणि आनंदाच्या पाणावलेल्या कडा जपून खर्चाचे हफ्ते भरणारा बाप कधी दिसलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी,
मृत्यू झाल्यावर अर्धी संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधी कळलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

कोणी लिहले माहीत नाही
पण खूप अर्थपूर्ण लिहले आहे.