माणसाचे वेगळेपण
वर्तन चिकित्सा ही संशोधनावर आधारित चिकित्सापद्धती आहे मात्र हे संशोधन प्रामुख्याने प्राण्यांवर केले जात असे. प्रयोगशाळेत वर्तन पाहता येते, मोजता येते त्यामुळे संशोधनात त्यालाच महत्त्व दिले जाऊ लागले. भावना आणि विचार हे दाखवता येत नसल्याने ते नाकारले जाऊ लागले. मात्र त्यामुळे माणसाची इच्छा, प्रेरणा यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. नवीन कल्पना कशा सुचतात, माणूस त्याग का करतो, कष्ट सहन करीत कठोर परिश्रम का करतो याची उत्तरे वर्तन चिकित्सा देत नाही.
त्यामुळे १९४०मध्ये कार्ल रॉजर्स यांनी मानवकेंद्रित मानसशास्त्र आणि समुपदेशन यांचा पाया घातला. आत्मभान, सर्जनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य अशा मानवी संकल्पनांना महत्त्व देत अब्राहम मास्लो यांनी या शाखेचा विस्तार केला. त्यांनी सांगितलेला गरजांचा पिरामिड आजही व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. याच परंपरेतील व्हिक्टर फ्रांक यांनी स्वत:च्या उदाहरणातून हे दाखवून दिले की माणसाचे वर्तन हे अन्य प्राण्यांसारखे चाकोरीबद्ध नसते. अन्य प्राण्यांची प्रतिक्रिया ही ठरलेली असते. माणूस मात्र अंध प्रतिक्रिया न देता वेगवेगळा प्रतिसाद निवडू शकतो.
व्हिक्टर फ्रांक यांना नाझींनी तुरुंगात ठेवले होते. तेथे त्यांना खूप त्रास दिला जात होता. ‘तुम्ही मला त्रास देऊ शकता, पण दुखी करू शकत नाही, दुखी व्हायचे की नाही हा माझा निर्णय असेल’ असे म्हणत ते शांत राहिले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी याच सिद्धांतावर आधारित ‘लोगो थेरपी’ विकसित केली.
हा सिद्धांत सामान्य माणसांना आचरणात आणणे शक्य होण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्यावे लागते. अन्यथा माणसाचा मेंदूदेखील अन्य प्राण्यांसारखा अंध प्रतिक्रिया देत राहतो. त्याची प्रतिक्रिया करण्याची सवय ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’ने, म्हणजेच ‘साक्षीध्याना’ने बदलता येते.
स्वतच्या शरीर मनाकडे साक्षी भाव ठेवून पाहता येणे हे मानवी मेंदूचे इनबिल्ट फंक्शन आहे. अन्य प्राण्यांच्या मेंदूत हे कार्य नाही कारण त्यांचा प्रीफ्रन्टल कॉर्टेक्स विकसित नसतो.माणसाच्या मेंदूत हे कार्य अंगभूत (इनबिल्ट) असले तरी ते सक्रिय करण्यासाठी त्याला प्रशिक्षण आवश्यक असते. हे प्रशिक्षण म्हणजेच शरीरात आणि मनात जे काही जाणवते त्याला कोणतीही प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करणे.. म्हणजेच ‘साक्षीध्यान’!
🖋 डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com