चिमणीसाठी विकतचे घरटे नको!

हल्ली विविध ठिकाणी आपल्याला पक्ष्यांकरिता घरटी विकत मिळू लागली आहेत. अनेकदा ती घरटी सजवलेली अगदी प्लायवूडने सुशोभित केलेली असतात. त्या घरटय़ांच्या किमतीही भन्नाट असतात. सहज म्हणून ती घरटी विकत घेणाऱ्यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांच्या बोलण्यात अभिमान होता, त्यांना वाटत होते की ते निसर्गाची सेवा करत आहेत.

चिमण्या हरवत आहेत. आपल्या परिसरातील चिमण्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. चिमण्या अदृश्य होण्याची अनेक कारणे आहेत. चिमण्यांना मिळणारे अन्नकण कमी झाले आहेत. पूर्वी इतस्तत पडलेले धान्य निवांतपणे टिपायला चिमण्या यायच्या. आता इतस्तत: पडलेले अन्नकण कमी झाले आहेत आणि निवांत टिपायला घराला अंगण राहिले नाही. चिमण्यांना मिळणाऱ्या अन्नकणांत म्हणजे टिपायच्या दाण्यांमध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्ह व विष इतके असते की कित्येक चिमण्या ते खाऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. चिमण्या झुरळ व इतर उपद्रवी कीटकही खातात, परंतु आज या सर्व कीटकांना विष घालून मारले जाते. मग ते खाऊन चिमण्यांना मरावे लागते.

आपण बांधलेल्या सिमेंटच्या इमारतीमध्ये चिमण्यांना घरटे बांधायला जागा नाही. जागा असेल तरी घरटे बांधायचे साहित्य चिमण्यांना परिसरात उपलब्ध नाही. त्यामुळे बेघर होणाऱ्या चिमण्यांना मदत करण्यासाठी भूतदयेने किंवा पर्यावरणीय पक्षीप्रेमातून आपण ही घरटी विकत घेऊन, आपल्या घराच्या दर्शनी भागावर लावून आपले पर्यावरणप्रेम जाहीर करतो.

चिमणीसारख्या पक्ष्यांच्या जीवनक्रमात जन्म- जीवनसंघर्ष – पुनरुत्पादन हे सर्व नैसर्गिकप्रशिक्षण असते. त्यांना आपल्या अन्नाकरिता परिश्रम करावे लागतात. त्यांना हे अन्न सहज मिळू लागले तर तो संघर्ष चिमणी विसरेल. सकाळी उठून इतस्तत: उडून आपल्याला आवश्यक अन्न मिळवणे हे त्यांचे जीवनकार्य आहे.

जीवनसंघर्षांत चिमण्यांना योग्य अन्न शोधायची कला शिकावी लागेल. तसेच पर्यायी घरटय़ाचे साहित्य शोधावे लागेल. घरटय़ाच्या रचनेत बदल होईल, कदाचित अजून काही वेगळा बदल होईल. पण सर्वस्वी तो बदल त्या पक्ष्यांच्या अंतप्रेरणेतून होईल. आणि तो बदल शाश्वत असेल. आपण कृत्रिम घरटे पुरवून त्यांना अनैसर्गिकपर्याय पुरवत आहोत.

🖊 विद्याधर वालावलकर
office@mavipamumbai.org