मुलांचे ऑनलाईन वाचन
Online Readingमंगोलियात वीस मुलांचा वर्ग असतो. त्यात एकवीसावा मुलगा नवीन येतो, त्याला बसायला बाक नसतो म्हणून खाली चटईवर बसून गणित शिकतो. बाई विचारतात, “किती अधिक किती चार होतात ?” आदल्या दिवशीच शिकविल्यामुळे मुले एक सुरात उत्तर देतात “३+१”. एकवीसावा मुलगा उत्तरतो,”२+२ चार होतात”.

एकदा चित्रकला स्पर्धेत, वर्गातली वीसही मुलं पक्षांची, फुलांची, प्राण्यांची चित्र काढतात. एकवीसावा मुलगा मात्र त्याचे स्वत:चे चित्र ‘मॉन्सटरशी’ हात मिळवतांना काढतो. दोघांनी शस्त्र खाली टाकलेली असतात आणि खाली लिहीलेले असत ‘युध्द वाईट असते’. प्रसंग महत्त्वाचे नाही तर महत्त्वाचे आहे एकवीसाव्या मुलाचे वेगळे विचार करणे, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिने बघणे. ही गोष्ट मंगोलियन भाषेत असून सुध्दा चित्रांच्या सहाय्याने मला सहज वाचता आली.

हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो. आज काळानुसार वाचनाची माध्यमेही बदललेली आहेत, अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील ऑनलाईन वाचनाला नव्या पीढीची सर्वाधिक पसंती आहे. ऑनलाईन वाचन म्हणजे नक्की काय? मुलांनी कुठे, कधी, किती वाचायचे ? इंटरनेटवर वयोगटानुसार बालवाडी (प्रिस्कूल), प्राथमिक गट (एलिमेंट्री), कुमारगट अश्या वर्गवारीनुसार तसेच विषयानुरुप साईटसआहेत. ऑनलाईन किंवा डिजीटल लायब्ररीही नेटवर खूप आहेत. तेथे पुस्तकांची व्यवस्थित सुची केलेली असते. अगदीच अडल्यास, सर्च करता येते.

ही पुस्तके वाचायची असल्यास ‘इंटरनॅशनल चिल्ड्रन डिजीटल लायब्ररी’, http://www.icdlbooks.org ह्या साईटला जरुर भेट द्या. ह्या साईटवर पुस्तकांची वर्गवारी देश, भाषा, वयोगट, पुस्तकांची लांबी, पुस्तकातली पात्र आणि पुस्तकांच्या मुखपृष्टाच्या रंगानुसार केली आहे. त्यामुळे पुस्तकं शोधणे सोपे तर होतच परंतु वेगवेगळ्या भाषेतली ही पुस्तक समजावून घेणं मुलांबरोबरच पालकांनाही आव्हानात्मक आहे. मंगोलियन, अरेबिक, पोर्तुगीज, रशियन, पर्शियन, फारसी, सेर्बियन, स्वाहीली अश्या विविध भाषेतली पुस्तके, जी आपल्याला इतर वेळेला वाचायला मिळण कठीण आहे, ती ऑनलाईन चित्रांसकट बघायला मिळतात. भाषा जरी आपल्याला समजली नाही तरी ब-याचश्या पुस्तकाचा आशय आपल्याला चित्रावरुन समजतो. तसेच प्रत्येक पुस्तकाची भाषा, आशय, प्रकाशनाची माहिती येथे वाचता येते. दुर्दैवाने भारतीय भाषांमधली पुस्तके येथे विशेष आढळली नाही. ‘इंटरनॅशनल चिल्ड्रन डिजीटल लायब्ररी’ ही साईट जगभरातल्या मुलांसाठीचे साहित्य एकत्रित करण्याचा महाकाय प्रकल्प करते आहे. ह्या साईटचा उद्देश साहित्याद्वारा मुलांना विविध संस्कृतींची ओळख करुन मुलांना ग्लोबल कम्यूनिटीचा सदस्य करुन घेणे आहे. त्यांनी म्हटल्या प्रमाणे खरोखरच वेगवेगळ्या देशातली पुस्तके वाचायची असल्यास जगाच्या नकाशावर खंड, देश क्लिक करुन त्या ४२ देशांची ३१ भाषांमधली ८२० ऑनलाईन पुस्तके तुम्ही वाचू शकता.

बहुतेक वेळेला आपल्या मुलांना काय वाचायला द्यायचे हा यक्ष प्रश्न पालकांसमोर असतो. बाल गटासाठी आणि तरुणांसाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहे. खरी पंचाईत होते ती कुमार गटाची (वयवर्षे साधारण ९ ते १६), त्यांना लहान मुलांची पुस्तके वाचण्यात अजिबात रस नसतो आणि मोठयांची ‘मोठी’ पुस्तके वाचू दिली जात नाहीत. कुमारांसाठी http://www.awesomelibrary.org/Classroom/English/Literature/Elementary_Li… ह्या साईटवर रुडयार्ड किपलींगच्या ‘जंगल बुक’ पासून ते चार्ल डिकन्सच्या ‘ए क्रिस्मस कॅरल’ पर्यंत ऑनलाईन पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. मराठी आणि हिंदीत हा प्रश्न सोडविला आहे आयुकाच्या श्री. अरविंद गुप्ता ह्यांनी. त्यांची http://www.arvindguptatoys.com ही साईट म्हणजे खजिना आहे. येथे हिंदी, मराठी आणि इंग्रजीची ऑनलाईन पुस्तकं, खेळणी आणि डॉक्यूमेंट्रीज उपलब्ध आहेत. खास भारतीय संदर्भ आणि पात्र असणा-या कथा वाचायच्या असल्यास
http://www.pitara.com,
www.indiaparenting.com/stories,
http://www.indif.com/kids/hindi_stories,
http://www.4to40.com/story ह्या साईटना भेट द्यायला हवी. मराठी आणि हिंदीत खास मुलांसाठी फारसे काहीच नसल्यामुळे ह्या साईट्सचे प्रयत्न नक्कीच प्रशंसनिय आहेत.

इंटरनेट पब्लिक लायब्ररीच्या (ipl) साईटवर बच्चे कंपनींसाठी खास वेगळा विभाग आहे. http://www.ipl.org/div/kidspace ह्या लिंकवर तुम्ही गेलात की इतिहास, भूगोल, कला, साहित्य, गाणी, गोष्टी असे वेगळे विभाग आहे. प्रत्येक विभागात आणखीन वेगळे उपविभाग आहेत आणि ह्या आणखीन पुढे गेल्यावर तुम्हाला त्या विषयाच्या ‘रिसोर्स लिंक्स’ सापडतील. ‘रिसोर्स लिंक्स’ म्हणजे विषयानुरुप इतर साईट्सवरची माहिती आणि त्या साईटचा पत्ता (URL) येथे एकत्र केला आहे. त्यामुळे बालवाचकांची सोय झाली आहे. प्रत्येक मुल आपल्या आवडीनुसार वाचन करु शकते. येथे अगदी नॅन्सी ड्रयू पासून हॅरी पॉटरपर्यंत, गोष्टींपासून ते चित्रांच्या पुस्तकापर्यंत, लेखकांपासून ते वयोगटापर्यंत पुस्तकाची वर्गवारी केली आहे. http://www.awesomelibrary.org ही कलरफूल साईट आहे. येथेही मुलांसाठी वेगळा विभाग त्यातही विषयानुसार वर्गीकरण आहे व त्यानुसार ‘रिसोर्स लिंक्स’ची यादी आपल्याला पाहायला मिळते.

१९९६ साली अमेरिकेतल्या रोझेटा ह्यांनी मुलांसाठी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करुन द्यायला सुरुवात गेली. आजच्या घडीला http://www.childrensbooksonline.org ह्या साईटने चांगलेच बाळसे धरले आहे. ह्या साईटवर वयोगटानुसार वर्गीकरण केले आहे अगदी पाळण्यातल्या तान्हयापासून ते तरुणांपर्यंत. गोष्टींच्या शिर्षकावर क्लिक केल्यावर चित्रांसकट गोष्टी वाचायला मिळतात. प्रत्येक वयानुसार भरपूर गोष्टी वाचनासाठी उपलब्ध आहेत. http://www.storyplace.org ही स्पॅनिश आणि इंग्रजीत असणारी लायब्ररी रंगसंगतीमुळे मुलांना आकर्षित करेल अशीच आहे. येथे गोष्टी तर आहेतच पण मुलांसाठी विविध उपक्रमही दिले आहेत.

ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवर बालविभाग http://www.britishcouncil.org/kids अत्यंत वाचनिय आणि माहितीपूर्ण आहे. येथे ही गोष्टी, परीकथा, गाणी, खेळ तर आहेतच परंतु महिन्याला प्रत्येक विषयाला धरुन माहिती, प्रश्न मुलांना विचारले जातात. ह्या महिन्याचा विषय पर्यावरण आहे. How green are you? ह्या लिंकवर गेल्यावर तुम्हाला घरातल्या सगळ्या खोल्यांचे चित्र दाखवले जाते. प्रत्येक खोलीत, वीज आणि पाणी वाचविण्यासाठी त्यावर मजेदार प्रश्न विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न भारतीय मुलांना थोडे ‘आऊट ऑफ वर्ल्ड’ वाटू शकतात जसे की कपडे धुतल्यावर पूर्ण ड्रायर न वापरता वाळत घालणे, एसी चालू असतांना खिडक्या न उघडणे परंतु झपाटयाने वाढणारया ग्लोबलायझेशनच्या जमान्यात ‘लाईफ स्टाईल’ फरक टिपण्या इतकी मुले नक्कीच हुशार आहेत. खेळ, चित्र आणि ऑडीयोच्या अप्रतिम वापरामुळे ह्या साईटवर मुले अधिक वेळ रेंगाळतील ह्यात शंकाच नाही. जगप्रसिध्द एनसायक्लोपिडीया ऑफ ब्रिटानिकाचीही ऑनलाईन लायब्ररीची http://library.eb.com साईट आहे. परंतु ह्या साईटवर सभासद असल्या शिवाय पुस्तके, माहिती चाळता येत नाही.

स्कॉलॅस्टिक प्रकाशन हे जगातील प्रतिष्ठीत प्रकाशनांपैकी आहे. त्यांनी खास मुलांकरीता http://scholastic.com/kids ह्या साईटवर त्यांच्या प्रकाशनाची काही पुस्तके तसेच काही पुस्तकांमधला भाग ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध करुन दिला आहे. क्लिफर्ड हा लाल मोठा कुत्रा बच्चे कंपनीच्या परिचयाचा आहे. त्याच्या गोष्टी, खेळ, चित्र रंगवणे, कोडी सोडवणे करायचे असल्यास http://www.scholastic.com/clifford ह्या साईटला भेट द्यायलाच हवी. इतर कार्टून पात्रांच्या गमतीजमतीही आपल्याला ह्या साईटवर वाचायला मिळतात. ही साईट तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत आणि नेटकी आहे. भारतीय बालप्रकाशकांच्या
http://www.nbtindia.org.in,
http://www.ack-media.com,
http://www.prathambooks.org,
http://www.tulikabooks.com,
http://www.katha.org,
http://www.childrensbooktrust.com, ह्या साईट्सवर त्यांनी नवीन पुस्तकं बघायला मिळता तसेच ऑनलाईन खरेदीची सोयही ह्या साईट्सवर आहे.

एक छान गोष्ट वाचण्यात आली – अफ्रिकेतल्या जंगलात, अफ्रिकन डान्स चाललेला असतो. सिंह महाराज ‘टॅंगो’ करण्यात दंग असतात, माकड करत असते ‘चा-चा-चा’ तर अस्वल करत असते ‘रॉक ऍंड रोल’. जेराल्ड जिराफलाही नाच करावासा वाटतो. तो तसा प्रयत्नही करतो, पण नाचता न आल्यामुळे सारे प्राणी त्याची खिल्ली उडवतात. शेवटी जेराल्ड हिरमुसला होऊन नाचणे सोडून देतो. इतरांच्या हसण्यामुळे स्वतःचा आनंद कायमचा हरवून बसतो. अमेरिकेत राहणारया तीन वर्षाच्या आपल्या मुलीचे ‘सेल्फ एस्टीम’ वाढविण्यासाठी ही गोष्ट तिच्या आईने तिला सांगितलीच परंतु ब्लॉग द्वारे सर्वांना खुली करुन दिली. परदेशातल्या भारतीय तरुण आयांनी एकत्र येऊन http://www.saffrontree.http://www.saffrontree.org
लहान मुलांना काय वाचायला द्यावे ह्यावर भाष्य करणारा ब्लॉग दोन वर्षांपासून सुरु केला आहे. ‘उत्कृष्ट ब्लॉग’ म्हणून वाखाणला गेलेला हा ब्लॉग माहितीपूर्ण तर आहेच परंतु अत्यंत ‘प्रोफेशनल’ आहे. ह्या ब्लॉगवर आपल्याला नवीन पुस्तकांचे परिक्षण, आयांचे-मुलांचे वाचनाचे अनुभव, पुस्तकाच्या मुखपृष्ठासकट पाहायला मिळते. त्यामुळे ही सगळी पुस्तकं आपल्याला वाचायला नाही मिळाली तरी त्यातला आशय नक्कीच समजतो.

लहान मुलांच्या साईट्स भरपूर आहेत परंतु बरेच वेळा नेटवरच्या वाचनाची तुलना पुस्तक वाचनाशी केली जाते. दोन्ही माध्यमे वेगळी आहेत आणि त्यातल्या वाचनाचा आनंदही वेगवेगळा आहे. नेटवरच्या वाचनाने आपल्या मुलांना एक व्यापक दृष्टी मिळेल ह्यात शंकाच नाही.