‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’
#मुलांना_फुलू_द्या
– मनीषा उगले
‘Meaningfully engaging the classroom’ या मुद्द्यावर मनात आलेले काही विचार आपल्यासमोर ठेवते आहे.
मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे exactly काय अपेक्षित असतं आपल्याला?
वर्गात शिक्षक एकतर्फी अध्यापन करत नसतील, मुलांसोबत उत्तम interaction असेल तर तितका वेळ मुलं छान बिझी असतातच.
पण ज्यावेळी शिक्षकांना इतर काम असेल तर शिक्षक मुलांना काहीतरी काम देतात आणि गुंतवून ठेवतात. कारण मुलं रिकामी असली की गोंगाट करतील असं त्यांना वाटतं आणि एखाद्या वर्गातून गोंगाट ऐकू येणं हे शाळेत बेशिस्तपणाचं मानलं जातं.
मुलांना सतत गुंतवून ठेवणं अपेक्षित असल्याने अनेकदा मुलांवर ‘उपक्रमांचा’ मारा सुद्धा केला जातो.
एखाद्या वर्गात वर्गशिक्षक नसले तर ‘पाढे पाठ करा, स्वाध्याय सोडवा, वाचन करा किंवा गणितं सोडवा’ अशी सूचना दुसरे शिक्षक येऊन करतात. पण ‘तुमच्या आवडीचं काम करा, हवा असल्यास आराम करा’ अशी सूचना क्वचितच कोणी करत असेल. किती जपतो मुलांची मनं आपण?
मुलांना बिझी ठेवायचं असेल तर ते का ठेवायचं आहे? हे समजून उमजून आणि मुलांच्या चिकित्सक, सर्जनशील विचारप्रक्रियेला चालना देतील असे उपक्रम आपण डिझाईन करायला हवेत. (उपक्रम शब्दाची मी थोडी धास्ती घेतली आहे. उपक्रमाच्या नावाखाली हल्ली कोणत्या निरर्थक गोष्टीचा आपल्यावर मारा होईल हे सांगता येत नाही.)

लॉकडाऊनच्या काळात पालकांनी मुख्यतः धास्ती घेतली आहे ती मुलं ‘रिकामी’ असल्याची. एरव्ही तर मुलं शाळा, क्लासेस आणि छंदवर्ग यांत इतकी गुंतलेली असतात (म्हणजे त्यांना पालकांनी गुंतवलेलं असतं. मुलांना इतकं बिझी असणं हवंय का आणि झेपतंय का? याचा विचार केला जात नाही.) की पालकांसमोर ती कधी मोकळेपणाने वावरताना दिसत नाहीतच.
मधल्या काळात अचानक हे सगळं बंद झालं तर या मुलांना कसं हँडल करायचं, त्यांच्या मोकळ्या वेळाचं काय करायचं असे भीषण (!) प्रश्न पालकांसमोर निर्माण झाले.
शाळा भरण्याची वेळ सकाळी पावणेअकराची असली तरी बरीच मुलं नऊ वाजल्यापासून शाळेकडे निघालेली असतात. शाळेत त्यांचे मित्र असतात, खेळ असतो आणि अनेक गोष्टी असतात. पण मुलं शाळेत आल्याआल्या त्यांनी शिस्तीत बसून शांतपणे ‘अभ्यास’ करावा अशी काही शिक्षकांची अपेक्षा असते. मुलं खेळताना धडपडतात, मारामारी सारखी प्रकरणं होतात हे ही त्यामागचं कारण असतं. पुन्हा दिवसभर शाळा केली की रात्री पालक ‘हं, आज काय अभ्यास दिला शिक्षकांनी?’ असा धोशा लावतात.
शाळांचं दिवसभराचं वेळापत्रक आपण बघितलं तर एकापाठोपाठ एक अशा भरगच्च तासिका असतात. (प्राथमिक विभागात आम्ही थोडं लवचिकतेने हे वेळापत्रक वापरू शकतो ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.)
मुलांना सतत ‘बिझी’ ठेवणं ही अनेक पालक-शिक्षकांना अवाजवी महत्त्वाची गोष्ट वाटत असते. कशी फ्रेश राहतील मग मुलं?
या सगळ्यात त्यांचं ‘पोरपण’ हरवत चाललेलं असतं हे आपल्या लक्षात येत नाही.
मुलांच्या संपूर्ण वेळेवर आपल्याला अधिकार का हवा असतो?
मुलं रिकामी राहिल्यावर शिकणार नाहीत किंवा त्यांचा वेळ वाया जाईल अशी भीती आपल्याला का वाटते?
इतकं काय ‘शिकवायचं’ आहे मुलांना? आणि इतकी धावपळ करून नेमकं कुठे पोहोचायचं आहे आपल्याला?
बरं आयुष्य ही अशी गोष्ट आहे की आपण कालचा शिळा सिलॅबस घोकून तयारी करतो आणि भविष्य दरवेळी नवीन प्रश्नपत्रिका हाती ठेवतं.
मुलांचा सगळा वेळ आपण खाऊन टाकणार असलो तर मुलं म्हणजे ‘projected product’ होतील की काय अशी मला भीती वाटते.
मुलांना सगळा अल्गोरिदम फीड करण्याची पालक शिक्षकांना वाटणारी निकड मला कधीकधी भीतीदायक वाटते. ‘बिझी’ असणं हा आपल्या काळातला सर्वात मोठा मानसिक आजार आहे की काय असंही वाटू लागतं.
मुलांना जर स्वतःचा पुरेसा वेळ दिला नाही तर ते स्वतःचा मूलभूत विचार कधी करायला शिकतील? आपण त्यांना पुरेशी सवड दिली नाही तर ते जीवनाबद्दल आणि जगाबद्दल चिकित्सक विचार कधी करतील? नव्या काहीतरी ‘स्वतःच्या’ गोष्टी ते कसे काय explore करू शकतील?
आपल्या लहानपणी खेळण्यांचा फारसा सुकाळ नव्हता, तेव्हा हाती येईल त्या वस्तूतून खेळणं बनवण्याचं कसब आपल्याला अवगत होतं. आपण खेळण्यासाठी रंग हाताने बनवायचो, पतंग सुद्धा घरीच तयार करायचो! निरर्थकपणे परिसरात भटकणं, एका जागी गप्प बसून राहणं अशा कृतींतून सुद्धा खूप गोष्टी शिकत होतो आपण. मुद्दा स्मरणरंजनाचा नसून, मुलांसमोर सगळ्या गोष्टी रेडिमेड ठेवल्याने होणाऱ्या नुकसानाचा आहे. त्यांचा आहार, अभ्यास, त्यांनी काय खेळायचं, सुट्टीत कोणत्या कॅम्पला जायचं… सगळं आपणच ठरवतो आहोत. मुलं कुठे आहेत निर्णयप्रक्रियेत?
‘अळणी मुलं’ निर्माण करतो आहोत आपण असं नाही का वाटत तुम्हाला?
लॉकडाऊननंतर उघडणाऱ्या शाळेसाठी मी विशेष उत्सुक आहे. सहा महिन्यांतून अधिक काळ मुलं शाळेबाहेर असली तरी ते या काळात परिसर आणि कुटुंबातून खूप नाविन्यपूर्ण गोष्टी शिकलेले असणार आहेत, त्यांची समज वेगळ्या प्रकारे वाढलेली असणार आहे. ते सगळं समजून घ्यायला मजा येणार आहे.
मुलांचा सगळा वेळ आपण खाऊन टाकण्यापेक्षा quality time interactions वर जास्त लक्ष केंद्रित करणं आणि मुलांना स्वतःच्या गोष्टी शोधण्यासाठी स्वतःचा पुरेसा मोकळा वेळ वापरू देणं या गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात.
वर्गात एखाद्या घटकाचा अभ्यास झाल्यानंतर मी मुलांना जरावेळ विश्रांती देत असते. किमान दहा मिनिटे तरी. त्या वेळात मुलांनी स्वतःच्या आवडीचं काम करावं, हवं तर गप्पा माराव्यात किंवा अगदी वाटलं तर छान डुलकी सुद्धा घ्यावी.(वर्गात सतरंजीचा आग्रह मी त्यासाठीच धरत असते.)
मुलांना ‘रिकामं’ ठेवण्याचा हा ब्रेक त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरत आला आहे.
एवढ्या रिकाम्या वेळात एखादं मूल इतर मित्रांना एखादं कागदकाम शिकवतं, चित्र काढतं, गाणं गुणगुणतं, गोष्ट वाचतं, एखादी गंमत सांगतं किंवा गप्प बसून आपापला काहीतरी विचार सुद्धा करतं.
आपण कोणी फार ‘जाणते’ आहोत आणि मुलांच्या भल्याचं सगळं काय ते आपल्यालाच कळतं या भ्रमातून आपण मोठी माणसं जितक्या लवकर बाहेर येऊ तितकं चांगलं. मुलं म्हणजे मातीचे गोळे नसतात अहो! खूप साऱ्या गोष्टी समजतात त्यांना.
तुम्हाला काय वाटतं याबद्दल?