म्हणून तुझे तूच शिकायला जा!
……….
अभ्यास शिकायला
तू शाळेत जाऊ नको राई,
तिथे खेळायला सवंगडी मिळतात
म्हणून जा.
माणसे शिकायला जा.
ओळखपाळख नसलेल्यांशी दोस्ती करायला जा.
दोन घ्यायला आणि दोन द्यायला जा.
दुसर्याला सहन करायला जा.
विचार करणे शिकायला जा.
लिहिता-वाचता येण्याइतके विचार करणे सोपे नसते बाळा.
प्रतिज्ञा पाठ म्हणायला जाऊ नको राई,
सारे भारतीय माझे बांधव आहेत हे जगायला जा.
स्पर्धेत तू भाग घ्यायला जाऊ नको राई,
शिकायची प्रेरणा तिथे शोधू नको राई.
सायकल शिकताना फक्त मजा होती ना,
तशी शिकण्यातली मजा अनुभवायला जा.
तू इतरांपेक्षा किती हुशार हे महत्त्वाचे नाही राई,
सगळेच हुशार कसे होतील हे शिकायला जा.
सोबत तुझ्या कोणी उपाशी असेल,
तर त्याला तुझे बिस्कीट द्यायला जा.
दुसर्याची भूक जाणवायला शिकणे सोपे नसते बाळा.
शाळेत सांगितलेले सगळेच खरे नसते राई,
म्हणून निवडायची कला शिकायला जा.
चारचौघे वेगळे बोलताना ठाम राहणे सोपे नसते बाळा,
म्हणून न पटलेल्या गोष्टीला ठाम नाकारायचे कसे, हे शिकायला जा.
शिस्त शिक.
सामूहिक जीवन सुकर करण्यासाठी शिस्त शिक!
शिस्तीचा उद्देश समजून घे.
पण अधिकाऱ्यांच्या मूर्ख आज्ञा पळणे म्हणजे शिस्त नव्हे.
चंद्र सिंग गढवालीला लक्षात ठेव!
आणि हो, शाळेत न गेलेल्यांविषयी आदर बाळगायला विसरू नको.
जनी, मुक्ता, बहीणा शाळेत गेल्या नव्हत्या हे लक्षात ठेव!
हे तुला कोणी फळा खडूने शिकवणार नाही राई.
म्हणून तुझे तूच शिकायला जा.
– Rupesh Patkar