रामराम

रामराम ही अभिवादनाची पुरातन रीत आहे. खेड्यापाड्यांत अजूनही रामराम करणारी अनेक मंडळी आढळतात. प्रत्येक प्रहराला बदलते अभिवादन ही इंग्लिश लोकांची रीत आहे. गुड मॉर्निंग ते गुडनाईट असा हा त्यांचा सदिच्छा प्रवास असतो.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री. अरविंद इनामदार प्रत्येक वेळी रामराम म्हणतात. गेल्या वीस वर्षात त्यांच्या मुखातून अभिवादनाचा अन्य कोणता शब्द त्यांनी उधारल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

कुसुमाग्रजांच्या तोंडून अगदी अभावितपणे बाहेर पडणारा श्रीराम हा स्वगत उद्गार आणि अरविंद इनामदारांचा, रामराम ही वाणीभूषणे होत.

तुकाराम महाराजांनी एका अभंगात लोकांचा निरोप घेताना म्हटले होते, आम्ही जातो आमच्या गावा। आमचा राम राम घ्यावा।।
रामराम या शब्दावे महिमान असे की दिवसाच्या कोणत्याही प्रहरी आणि प्रसंगी त्याचा उधार करता येतो.

समर्थ रामदासांनी सर्व पातळीवर रामभक्तीचा प्रसार केला. त्यांनी लोकनीतीच्या व लोकरीतीच्या सर्व कक्षांना स्पर्श करणारा रामराम रूढ केला.
श्रीराम हे त्यांच्या आराध्य दैवताचे नाव होते. जय जय रघुवीर समर्थ ही जयजयकारवाचक घोषणा होती.
रामराम हे अभिवादन होते.
मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी परस्परांना रामराम करावा, हा समर्थांचा आग्रह होता.

नमस्कार हा केला जातो. तो करताना हात जोडले जातात. रामराम हा उच्चारला जातो. मौखिक अभिवादन या दृष्टीने रामराम हा अधिक सुलभ आणि स्वाभाविक आहे.
करावा तो नमस्कार म्हणावा तो रामराम.
रामराम म्हटल्याने नमस्कार केल्याचे समाधान मिळते. त्यात करणे येऊन जाते. यामुळे आम्ही रामराम केला असे म्हटले जाते. आकाशवाणीवरून कधी कधी राम राम मंडळी हे शब्द ऐकायला मिळतात. बहुतेक ग्रामीण कार्यक्रमांच्या आरंभी आणि शेवटी हा रामराम घडत असावा.

समर्थ रामदासांनी सांगितलेल्या उपदेशपर सूत्रात म्हटले आहे, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।।
राम हा चिंतनाचा, ध्यानाचा, नमनाचा विषय आहे. राम नामाच्या उच्चारामुळे अस्तित्वात येणारी मानसिकता रामराम केल्यामुळे वाढीस लागेल. यात कसली अंधश्रद्धा नाही, भाबडेपणा नाही. राम ही आता सत्त्वसूचक संज्ञा झाली आहे. यात काही राम नाही, असा अभिप्राय व्यक्त केला जातो. तेव्हा संबंधित विषयाची सत्त्वशून्यता सूचित केली जाते. आपले जीवन बदलत चालले. नमस्काराची जागा, हॅलो, हाऽय, गुडमॉर्निंग, बायबाय यांनी घेतली आहे. पण सर्वांनी गंमत म्हणून रामराम असे ऐटित म्हणायचे ठरविले तर काय होईल? प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? सहर्ष स्वागतापेक्षा रामराम सोपा नाही का? मुळात हल्ली माणसांचे परस्परांकडे फारसे लक्ष नसते. सगळेच बोलणे चालणे वरवरचे असते. या वरपांगी संवादात राम नसतो. त्याला रामराम ठोकणे बरे.

एखादी अप्रिय किंवा निषिद्ध गोष्ट आपण कटाक्षाने जेव्हा टाळतो, तेव्हा तिला राम राम ठोकला असे म्हणतात. शुभ आणि अशुभ यांना लीलया सामावून घेणारा राम राम हा विलक्षण अभिवादन प्रकार आहे. काही संप्रदायनिष्ठ पारमार्थिक राम हा रामदासांपुरता मर्यादित मानतात. तुकाराम महाराजांना त्यापासून दूर ठेवतात. पण हे लोक विसरतात की दोघांच्या नावातच राम आहे. तुकाराम आणि रामदास या दोन्ही नावांत आरंभी किंवा अंती राम आहे. एकमेकांना क्षणभर भेटणे, आनंदाने परस्परांना अभिवादन करून मार्गस्थ होणे, जाता जाता रामराम म्हणणे आनंददायक नाही का?

कधी कधी सवयीमुळे संवेदना बदलतात. सवयी लागतात आणि सुटतात, त्या लावून घेता येतात सोडूनही देता येतात. त्या सोडताना थोडे सायास पडतात. पण सायासानंतर त्या सुटतात. काळाच्या ओघात नव्या सवयी लागू शकतात. भारतीय लोकजीवनातून लोप पावलेला रामराम परत आला तर काय होईल? आपल्या राष्ट्रीयत्यावर एक शब्दालंकार चढेल.

परदेशात परस्परांना भेटणाऱ्या दोन भारतीयांना रामराम म्हणताना किती आनंद होईल अमेरिकन डॉलरवर लिहिलेले दिसते वुई ट्रस्ट इन गॉड. चंद्रापर्यंत भरारी घेणाऱ्या विज्ञाननिष्ठांना डॉलरवर गॉड हा शब्द छापताना संकोच वाटत नाही. मग आपण रामराम म्हणताना अवघडून का जाये? फक्त एवढेच करावे की रामाला राजकारणात ओढू नये व त्याला वनवास घडवू नये.
रामराम या भावपूर्ण अभिवादनाला आपल्या जीवनात स्थान व स्थैर्य प्राप्त झाले तर माणसे परस्परांशी जोडली जातील. वाड्याखेड्यातून आणि नगरोपनगरांतून नांदत आलेला समाज नकळत एकात्म होईल.