“वेळेआधी पाळी आणि पालकांची धावपळ!!”
त्यादिवशी ऑपरेशन थिएटर च्या बाहेर आले आणि फोन चेक केला तर माझ्या चुलत भावजयीचे एक्दसम पाच मिस्ड कॉल्स दिसले.
एकदम काय झालं म्हणून मी लगेच फोन केला तर रडतच होती फोनवर..!
” अग सानू ची पाळी सुरू झालीय असं वाटतंय मला..आत्ता कुठे आठ वर्षाची आहे ग ती!!असं कसं झालं?काय करू सुचत नाहीये मला..!”
तिला शांत करून लगेच क्लिनिक मध्ये घेऊन यायला सांगितलं.
क्वचित कधीतरी छोट्या मुलींमध्ये योनीमार्गाजवळ काही इजा झालेली असू शकते किंवा लघवीच्या संसर्गामुळे लघवीमध्ये रक्त दिसू शकतं .कोणी या बालिकांना लैंगिक त्रास दिलेला नाही ना हेही तपासून बघावे लागते.
सानू ला व्यवस्थित तपासून झाल्यावर तिची खरंच पाळी सुरू झालीय असं लक्षात आलं.मुलींना खूप कमी वयात पाळी सुरू होण्याची ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे असं दिसतंय .यामुळे पालक हवालदिल होताना दिसतायेत.साहजिकच आहे.इतक्या लहान वयात या मुलींना कोणतीही समज नसते .अगदी सॅनिटरी पॅड कसं लावावं ,त्याची विल्हेवाट कशी लावावी ,शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी या सगळ्या गोष्टी उमजायचं पण हे वय नाही .मग मुलीच्या आईचीच कसोटी लागते.
मुलींच्या पाळीचे वय कमी का होत आहे याबद्दल बरेच संशोधन झाले आहे.यामध्ये मुलींचे वाढलेले वजन,प्राणिजन्य प्रोटीन चे अतिसेवन ,अनुवंशिकता,कौटुंबिक कलह व ताण विशेष करून वेगळे झालेल्या पालकांच्या मुली अशी काही कारणे सापडली आहेत.लहान मुलींच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात सोयाबिन हा सुद्धा एक घटक असू शकतो.रोजच्या जीवनात काही वेळा अपरिहार्य असणारी केमिकल्स आणि कीटकनाशके ही या समस्येला कारणीभूत असू शकतात.मात्र मुख्य कारण व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे वाढलेले वजन हेच असू शकते.
वयात येणाऱ्या मुलींमध्ये लठ्ठपणाचे वाढते प्रमाण ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे.वाढीला लागलेल्या मुलींना जरा जास्त प्रमाणात भूक लागायला लागते .अशावेळी त्यांना कमी कॅलरी असलेला आहार घ्यायची आणि रोज व्यायाम करण्याची सवय लावणे अपरिहार्य आहे.आपल्याकडे मुलांना अति खाण्यापासून थांबवले जात नाही हा पालकांची मोठी चूक होते आहे असं मला वाटतं.शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची सुटलेली पोटे सर्रास बघायला मिळतायत ही शोकांतिका आहे.इतक्या कमी वयात लठ्ठपणाची शिकार झालेली ह्या पिढीला पुढे फार भयंकर आजारांचा सामना करावा लागणार आहे.एकदा अतिखायची सवय लागली की कितीही व्यायाम केला तरी तो अपुराच पडणार आहे .
एकदा पाळी सुरू झाली की मुलींच्या उंची वाढण्यावर मर्यादा येतात .मुलींची उंची निदान त्यांच्या आईएवढी तरी होणे अपेक्षित असते. त्यामुळे सुद्धा फार लवकर पाळी सुरू होणे हा चिंतेचा विषय होतो.मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल आणि तिची उंची आईपेक्षा खूपच कमी असेल तर कधी कधी या केसेस मध्ये सविस्तर तपासण्या करून एन्डोक्रिनोलॉजिस्ट च्या सल्ल्याने पाळी तात्पुरती बंद करण्याची इंजेक्शन्स देण्याचा निर्णय घेतला जातो .मात्र हा निर्णय खूप विचार आणि तपासण्या करून मगच घेतला जातो.योग्य तपासण्या आणि सल्ला घेऊन ही इंजेक्शन्स घेतल्यास दोन ते तीन वर्षे पाळी पुढे ढकलता येऊ शकते आणि त्या दरम्यान मुलीची उंची आणि इतर वाढ व्यवस्थित होऊ शकते.त्यामुळे खूप लवकर पाळी सुरू झालेल्या मुलींच्या पालकांनी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.हा सल्ला वेळीच घेतला तरच फायद्याचा ठरतो .पाळी सुरू होऊन काही महिने लोटले तर उपचारांचा फायदा होण्याची शक्यता कमी होते.
पाळी सुरू होण्याच्या एक दीड वर्षे आधीपासूनच काखेत,योनीमार्गाजवळ केस येणे,स्तनांची वाढ सुरू होणे अशी लक्षणे आढळतात.ही लक्षणे फार लवकर दिसायला लागली तर तत्काळ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
लवकर पाळी सुरू झालेल्या मुलींची भावनिक जपणूक अत्यंत महत्वाची आहे .सर्वात आधी तिची पाळी लवकर आलीये यात तिचा काहीच दोष नाही हे घरच्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे .तिला तिचं नेहेमीचं आयुष्य ,खेळ इत्यादी तसंच चालू ठेवता येणं अत्यावश्यक आहे .खूप घरांमध्ये पाळी सुरू झाल्यावर काही कारण नसताना मुलींचे खेळ,छंद बंद केले जातात आणि त्यांच्या चालण्याफिरण्यावर बंधने आणली जातात .हे चुकीचे ,अन्यायकारक आणि मागासलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.एखादया कोवळ्या पाखराला उडता येण्याआधीच त्याने पंख कापण्यासारखे आहे.त्यांना वैयक्तिक स्वच्छता,सॅनिटरी पॅड वापरणे,त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे या गोष्टी नीट शिकवणे ही आईची जबाबदारी आहेच पण त्यापलिकडे जाऊन तिचा आत्मविश्वास कमी न होऊ देता सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला उत्तेजन देणे हे दोन्ही पालकांचं कर्तव्य आहे.पाळी सुरू झाली म्हणून खेळ,नृत्य इत्यादी छंद चालू ठेवण्यात काहीच अडचण येण्याचे कारण नाही.
पाळी सुरू झाल्यावर पहिली एक दोन वर्षे ती अनियमित असणे नॉर्मल आहे.परंतु एकवीस दिवसांच्या आत पाळी येणे,सात दिवसांच्या पलीकडे रक्तस्राव होत राहणे,खूप जास्त रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा .या मुलींच्या हिमोग्लोबिन कडे लक्ष असणे आवश्यक आहे .तसंच त्याचा आहार चौरस असावा.भात,बटाटा,साखर,मैदा याचे प्रमाण कमी असावे.खरंतर हे प्रमाण प्रत्येक भारतीयांच्या आहारात कमी असणे आजकाल आवश्यक आहे.
तर या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह झाल्यावर आम्ही सानू साठी एन्डोक्रिनोलॉजिस्ट चा सल्ला घेतला .आणि तिची शारीरिक वाढ नीट होण्यासाठी इंजेक्शन्स घेऊन पाळी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला .या दोन वर्षात सानू ने भरपूर खेळायचंय,व्यायाम करायचाय आणि योग्य आहार घ्यायचाय.
मग एकदा पंख मजबूत झाले की आपली ही पाखरं ऊंचच उंच आकाशात विहरतील आनंदानं …हो ना?
डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ
कोथरूड
पुणे