नात्याची नाजूकता…

बऱ्याचदा समोरच्या माणसाच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याच्या मनात नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो…..

परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो… आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही……

कधी तरी निवांत बसून आपण आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, अनेकजण ज्यांनी “आपल्याला दुखावलं” म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होत ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच…..

भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसतो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली असतात. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळतच नाही.

नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते…

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला नंतर दिली तरी त्याच दुःख म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं…..

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होत…..

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो…..

भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो…..

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण असायला हवं…चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं…

म्हणून……

कुणाची कितीही मोठी चुक असली तरी ती आयुष्यापेक्षा नात्यापेक्षा मोठी निश्चितच नाही…

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःच असं वेगळं अस्तित्व असतं…….!!