बंडू आणि रघु, दोघांनाही दूध आवडत नाही.
पण रोज अर्धाकप दूध घेणं दोघांना अनिवार्य आहे.
बंडू दूध घेताना खूप कटकट करतो, त्रास देतो, दोन तास लावतो.
रघुला हा त्रासदायक क्षण लवकरात लवकर संपवून टाकायचा आहे, तो एका घोटात दूध संपवून मोकळा होतो.
बंडू घरातील सर्वात लाडका असेल तर घरातले सगळे बंडूच्या पुढे पुढे करतात, बंडू आपले महत्व वाढवून घेतो, बंडू घरातल्यांनाही निगोशिएट करायला सुरुवात करतो, पुढे जाऊन त्याचे व्यक्तिमत्व नकारात्मक घडू शकते.
बंडूच्या घरच्यांनी बंडू कडे दुर्लक्ष केले तर बंडू स्वयंनिर्णय घेणारा होऊ शकतो, तो परिपूर्ण व्यक्ती होऊ शकतो.
रघुच्या घरचे समंजस असतील, तर ते रघुच्या या वृत्तीचा वापर करून घेऊन त्याला अभ्यासू बनवू शकतात, व्यायामासारख्या त्याला उपयुक्त गोष्टींच्या त्याला सवयी लावू शकतात आणि तो एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व बनू शकतो.
रघु आपले ऐकतो, हे समजल्यावर रघुच्या घरच्यांनी नुसत्या आपल्या अपेक्षाच त्याच्यावर लादायला सुरुवात केली तर रघु हिप्पोक्रॅट बनू शकतो.
रघुला अनेकदा कौतुकाचे आमिष दाखवून पालक त्याच्याकडून प्रसिद्धी मिळविणारी कामं करून घेतात आणि स्वतःची टिमकी मिरवतात. पुढे काम करून प्रसिद्धी मिळाली नाही तर रघु कामाचा कंटाळा करू लागतो.
रघुकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले तर रघु इतरांच्याकडे बघून शिकतो आणि आपली दिशा स्वतःहून निश्चित करू शकतो, तो स्वयंनिर्णयी आणि हुषार होऊ शकतो.
दोन प्रकारची व्यक्तिमत्व निसर्गाने तयार केलेली, पण कुटुंब आणि समाज आपल्या ताकतीमुळे त्यांचे व्यक्तिमत्व बिघडवू शकते.
सुनेला घरच्या चालीरीती शिकविण्याचे समाधान, मुलाला आपल्यावरच अवलंबून ठेवल्याचे समाधान, कुटुंबातील सगळेजण माझ्यावरच अवलंबून असल्याने सर्वांना मार्गाला लावल्याचा मला असलेला अहंकार, या सर्व गोष्टी माणूस फक्त समाजात वाहवा मिळविण्यासाठी करतो.
हे करून माणूस आपल्या मुलांना सामाजिक सुरक्षितता देण्याच्या बदल्यात आपला अहंकार सुखावून घेतो.
हे अप्रगत समाजाचे लक्षण आहे.
कट्टरता हे सुद्धा सामाजिक बंधनच आहे, ते सुद्धा अप्रगत समाजाचेच लक्षण आहे.
सामाजिक सुरक्षिततेचा उपयोग अंगभूत गुणांच्या विकासासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी करून घेणे हा सामाजिक बंधनांचा प्रगतीशील वापर असे म्हणता येईल.
समाजिक बंधनांचा प्रगतीशील वापर करून घेण्यास शिकणे याचा अर्थ समाजसुधारणा असा मी घेतो.
सामाजिक सुरक्षिततेच्या बदल्यात, एखाद्या व्यक्तीचे कट्टरीकरण होण्यात आडकाठी आणणे किंवा त्याच्या व्यक्तिमत्व विकासात बाधा येऊ न देणे यासाठी पालकांचे प्रशिक्षण कोर्सेस डिझाईन करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
तसे झाल्यास, माणूसही फुलं पक्षी आणि प्राण्यांप्रमाणे आपले नैसर्गिक आणि स्वच्छंदी आयुष्य जगू शकतील असे माझे मत आहे.
~ विनय भालेराव.