परिक्षा व निकाल, तणावाचं वातावरण, मुलांपेक्षा आई बापालाच टेंशन जास्त. पण एवढ्यात क्लास, इंटर्नल मार्कस् मुळे गुणांची टक्केवारी वधारली असली तरी सर्वांच्या चांगल्या गुणांमुळे पुढील प्रवेशांसाठी स्पर्धा ही वाढली आहे व हे पालकांसाठी एक अजून टेंशन देणारं होत आहे. आता ही ‘कहानी घर घर की’ झाली आहे. पण यात ही आनंद आहेच. याच आनंदाचा नमुना, घरातील प्रेमाचा उमाळा, निर्मळ आनंद, यांचा प्रत्यय आज सामायिक करीत असलेल्या कथेत वाचायला मिळतो. ज्यांच्या घरात दहावी, बारावी होती त्यांनी ही अनुभवला असेलच.

–🌼–
“समाधानाचे पेढे”

लेखक – योगिया

या वर्षी आमच्याकडे एकाची १०वी आणि दुसऱ्याची १२वी आहे. १२ वी वाला HSC ला आणि १०वी वाला CBSE ला. १२ वीचा रिझल्ट लागून आता त्याच्या JEE, CET आणि बाकी इंजिनिअरिंग कॉलेज च्या एंट्रन्स चालू आहेत.
आज त्याला दुपारी त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर जेवायला जायचं होतं. आमचं म्हणणं, आता पुढच्या आठवड्यात २-३ परीक्षा आहेत, लोकांना सर्दी-खोकले होता आहेत. आत्ता नाही गेलं तर काही बिघडणार नाही.
मग त्यावर व्हायचा तो सुखसंवाद झाला. (१८ वर्षाच्या मुलाला एकदा सगळं समजावून सांगावं. pros -cons सांगावे आणि मग त्याचं त्याला ठरवू द्यावं.. असं माझं म्हणणं, पण हे माझ्या बायकोला काही पटत नाही… तिला अजून मुलं लहानच वाटतात.. असो, तो वेगळा विषय आहे) आणि तो बाहेर जेवायला गेला, १२.३० ला जावून २.३० ला नक्की परत यायचं या बोलीवर ठरलं.
तो जेवायला गेला. मी ऑफिस ला होतो आणि १ वाजण्याच्या सुमाराला अचानक कळलं कि CBSE नी १०वी चा रिझल्ट लावला. मग नेहमीची धावपळ. कुठली साईट.. चालत नाहीये. शाळेकडे आलाय का? डिजिलॉकर मध्ये अपलोड केलाय वाटतं…. इ.इ. आणि रिझल्ट कळला. छान ९२%- ९४% मार्क्स मिळाले होते. सब खुश.
बायकोचा फोन आला. म्हंटलं छोटू कुठे आहे… “अरे तो दादाला फोन लावतोय.. दादाला कधी रिझल्ट सांगतो असं झालंय त्याला.” मग पुढचा तास भर फोनाफोनीत गेला. आणि अचानक बायकोच्या लक्षात आलं बरोबर २. ३० च्या आत घरी येणारा दादू ३ वाजून गेले तरी अवतारला नाही आहे. आईने जरा चिडूनच फोन लावला..
“कुठे आहेस”?
“कर्वे नगरच्या चितळे बंधू मध्ये.”
“अरे नळ स्टॉप ला जेवून तू सरळ कोथरूड ला घरी येणार होतास ना? मग वाटेत हे कर्वेनगर कुठून आलं?” (कुठल्या तरी मित्राला सोडायला गेला असणार हाच डाऊट.)
“अंग आई ..छोटूचा छान रिझल्ट लागला म्हणून म्हंटलं पेढे घेऊन जावं” (आईच्या डोळ्यात नक्की पाणी आलं असणार).
बायकोचा फोन आला.. “ऑफिसमधून येताना पेढे घेऊन येऊ नकोस. आधी सरळ घरी ये.”
घरी आलो तेव्हा दोघे क्लास ला गेले होते. चहा घेताना बायकोने हे सांगितलं. चहाच्या घोटाबरोबर आवंढा पण गिळला. गंमत वाटली कि बाकी वेळा कशावरूनही कुत्र्या- मांजरासारखे भांडत असतात. काहीही पुरतं.. “मी आधी आंघोळीला जाणार होतो” , “मला का पाय लावलास??- चुकून लागला”, “अरे दादाचा पण कप उचलून ठेव – मी का ठेवू, तो कधी ठेवतो का माझा” “अरे ती डायनींग टेबलवरची पुस्तकं उचलायला सांगितली ना मग ती चार का पडली आहेत तिथे – ती माझी नाही.. छोटूची आहेत” असं काहीही पुरतं भांडायला, पण मग आज छोटूला पहिला फोन दादूला का करावासा वाटला? दादुने दिलेल्या ३०० रुपयातले १०० वाचवून पेढे का आणावेत?
आम्ही आज ठरवून पेढे आणले नाहीत. आजच्या पेढ्यांचा मान बंधूंचा होता. अशा अवीट गोडीचे पेढे आम्ही आधी कधीच खाल्ले नव्हते.
आज छान मार्क पडल्याचा आनंद तर होताच पण दोघा भावांच्यातल्या बॉण्ड चं समाधानही होतं.
आनंद आणि समाधान एकदम देणारे प्रसंग फार क्वचित येतात. आम्हा दोघांच्या डोळ्यात आपणच उत्तीर्ण झाल्याचा आनंद आणि समाधान होतं.
©योगेश गोखले (योगिया)