!! ” साऊ “…!!

पत्र लिहिणे हे आजकाल आपण सारेच विसरत चाललोय. मात्र कधीकाळी पत्र हेच संपर्काचे व सानिध्याचेही माध्यम होते आपल्या समाजात. एक वेळ अशीही होती की , वर्षानुवर्षे पती पत्नी बोलतही नसत की एकमेकांचा हात इतरासमोर हाती देखील घेऊ शकत नसत. अशावेळी पत्र लिहून एकमेकांना आपल्या भावना पोचवल्य जायच्या . ते पण कधी तर दोघांपैकी कुणी एक परगावी जाई तेव्हाच . सावित्री – जोतीराव यांचे सहजीवन एका संपूर्ण पुस्तकाचाच विषय आहे.या सहजीवनात देखील एक बाब आहे की , त्या काळात सावित्रीने जोतीरावांना पत्र लिहिली आहेत. पण उपलब्ध असणारी तीन पत्रे हा खरेतर त्या दोघांच्या सहजीवनाचा कसलाही विषय नसून समाजातील विविध घडामोडींची माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहेत. इतके ” समाजमय गुंतणे ” सावित्री जोतीरावांनी त्यांच्या जीवनात अवलंबले होते. सावित्रीची तीन पत्रे काही वेगळ्या मुल्यमापनातून पाहण्याची गरज आहे.,,.पाहूया.

सावित्रीबाई माहेरी अर्थात नायगावला गेल्या होत्या तेव्हा तेथून त्यांनी पहिले पत्र लिहिला जोतीरावांना. साल होते १९५६. पत्रातील पहिल्याच वाक्यातून स्वतःच्या तब्बेतीची वार्ता सांगून आपण आपल्या भावाच्या सेवेमुळे बरे झाल्याचे नोंदवले आहे. पुढे आपल्या गैरहजेरीमुळे फातिमाबाईंना जास्त काम पडून ताण होत असेल याची काळजी आहेच पण याबाबतीत फातिमा अजिबात कुरकूर करणार नाही असा विश्वास देखील नोंदवलाय. पत्रातूनच सावित्रीने आपल्या भावाने जोतीरावांना व आपल्याला अंत्यज व महारमांगादी अस्पृश्याकरता करत असलेल्या कार्याविषयी नापंसती दाखवल्याचे नमूद केलय. आणि ही नापसंती आपला भाऊ भटांच्या नादी लागल्यामुळे झाली होती असे देखील स्पष्ट सांगितले आहे. ” तुम्ही उभयतांनी जातीरुढीस अनुसरून व भट सांगतील तसे रहावे ” असा सल्ला भावाने दिल्याचे सांगून सावित्रीने आपला जवाब देखील पत्रातूनच नोंदवलाय. सावित्रीने आपल्या भावाला अत्यंत निर्धारने सांगितले की ” तू शेळी , गाय यांना घेऊन कुरवाळतो आणि नागपंचमीला विषारी नाग पकडून त्याला दूध पाजतोस.महारमांग तुझ्यासम मानव असताना त्यांना अस्पृश्य समजायचे कारण काय ? भट लोक सोवळ्यात असताना तुम्हांला अस्पृश्य समजतात आणि विटाळ मानतात तेव्हा तुला काय वाटते ? “. सावित्रीच्या बोलण्याला सावित्रीच्या आईने दुजोरा देत सावित्रीच्या भावाचे डोके ठिकाणावर आणले. याचवेळी सावित्रीने जोतीरावांविषयी आपल्या भावाला सुनावले की , ” माझे स्वामी देवमाणूस आहे.त्याची सर या देशी कुणाला येणार नाही महारमांगानी शिकून माणसाप्रमाणे व्हावे म्हणून आमची चाललेली धडपड ..ब्राम्हणाला अपायकारक होणार. आणि मग हेच ब्राम्हण लोक तुझ्या सारख्याच्या मनात किल्मिष पेरतात “. सावित्रीचे हे उद्गार अत्यंत कडक व योग्य आहेत. जोतीरावांविषयी अत्यंत सार्थ अभिमान तिच्या शब्दांत आहे . यापुढे जाऊन तिने भावाला सुनावले ते तर खूपच क्रांतिकारक वाक्य आहे. सावित्री भावाला म्हणते ” माझा नवरा तुझ्यासारखा वारकरीप्रमाणे नुसते हरिनाम घेत वारी करत नसून प्रत्यक्ष हरीचे काम करत आहे “. या वाक्यात सावित्रीने भागवत धर्माच्या संतपरंपरेशी जोतीरावांच्या कार्याचा संबंध जोडून दाखवलाय. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुन्हा पत्र संपवताना ही घटना सांगून झाल्यावर जोतीरावांना सावित्री म्हणते ” पुण्यात आपल्या विषयी दुष्टावा माजवणारे विदूषक पुष्कळ आहेत.तसेच येथेही आहेत.त्यांना भिऊन हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे ? सदासर्वदा कामात गुंतावे , भविष्यातले यश आपलेच आहे “. सावित्रीच्या या वाक्याने सावित्रीच्या वैचारिक उंचीची ताकद समजते. आपण जे कार्य पत्करले आहे त्यामध्ये दुष्टावा करणारे लोक सगळीकडे असणारच पण त्यांना भिऊन आपण कार्य सोडण्याचे कारण नाही असे जेव्हा सावित्री बोलते तेव्हा कार्याविषयीची तळमळ समोर येतेच याचबरोबर खंबीर निर्धार समोर येतो. ” भविष्य आपलेच असेल ” हा आशावाद प्रत्येक कार्यकर्त्यांना जे परिवर्तनाच्या चळवळीत उभे आहेत त्यांना स्फुर्तीदायी ठरावे असे वाक्य आहे. सावित्रीचे हे पहिले पत्र यामध्ये अत्यंत वेगवेगळ्या मानवी भावना प्रकट होतात. या पहिल्याच पत्रातून सावित्री नावाचै क्रांतिकारक चित्र डोळ्यासमोर उभे राहण्यास मदत होते. हे मूळ पत्र मूळातूनच वाचण्याजोगे आहे.

या पहिल्या पत्रातच फातिमाबाईंचा उल्लेख येऊन जातो. पुन्हा कधीही सावित्री जोतीराव वाडःमयात फातिमाबाईंची नोंद नाही .याकरता हे पत्र महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे सावित्रीचा आपल्या पतीविषयीचा सार्थ विश्वास व खात्री समोर येते. शिवाय आणखी एक महत्त्वाचा गुण समोर येतो. ज्या भावाने आपल्या आजारपणात आपली सेवा केली आहे , त्याचे मन भटाब्राम्हणानी कुजवले आहे हे पाहताच व्यक्ती व नात्यापेक्षा कार्य श्रेष्ठ आहे याची जाणीव सावित्री करून जाते. ही अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. १८५६ साली लिहिलेले पत्र आहे एका भारतीय स्त्रीने. याचा संदर्भ घेऊन पाहिल्यास यामधील क्रांतिकारकत्व नजरेत भरते.शिवाय वारकरी होण म्हणजे नेमके काय करायला हवे हे स्पष्ट करून धर्मचिकित्सेची एक महत्त्वाची पायरी सावित्री ओलांडते हे नमूद करणेच भाग आहे. भविष्यातील यशाची खात्री देणारी सावित्री आपण कोणत्या दर्जाचे नेतृत्व देऊ शकतो याचे सूचन करते. कोणत्याही भारतीय स्त्रीने तत्पूर्वी एवढे वेगवेगळे टप्पे ओलांडलेले नाहीत . सावित्रीची योग्य प्रतिमा पहायची असल्यास या पहिल्या पत्राला वाचताना त्याला दृश्यरुप द्या …” एका क्रांतिकारक ज्वालेची भेट ” नक्कीच होईल तुम्हाला .