तानसेन यांनी दाखवून दिला,
स्वार्थ आणि परमार्थ यातला फरक!
~~~~~~~~~~~
अकबर बादशहाच्या दरबारात नवरत्नांची खाण होती. त्यातलेच एक अनमोल रत्न म्हणजे गायक तानसेन. त्यांच्या गायनात एवढी ताकद होती,
की मल्हार रागाचे सूर आळवताच आभाळ दाटून येई आणि दीप राग गायल्यावर दीप प्रज्वलित होई, असे म्हणतात. तानसेनाचं दैवी गाणं ऐकून जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा, तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगत, माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही.अकबर बादशहाला कुतूहल वाटे, तानसेनचे गाणे एवढे मंत्रमुग्ध करते, तर त्याच्या गुरुंचे गाणे किती श्रेष्ठ असेल. तानसेनच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गुरूंच्या गायनापुढे तानसेनचे गायन म्हणजे सूर्यापुढे पणती.
एवढे कौतुक ऐकल्यावर अकबर बादशहाने सांगितले,
तानसेन, आता मला तुझ्या गुरुंचे गायन ऐकायची तीव्र इच्छा आहे. तुझ्या गुरूंची जी काही बिदागी असेल, ती आपण देऊ. पण काहीही करून एकदा तरी त्यांना आपल्या दरबारात गायन सादर करण्यासाठी आमंत्रित कर.’

यावर तानसेन म्हणाला,
‘जहाँपनाह,
माझे गुरु मैफली सजवत नाहीत. त्यांचे गाणे स्वच्छंदी आहे. मुक्त आहे. स्वान्तसुखाय आहे. आपल्या बोलावण्याने ते गाणे सादर करतील, असे वाटत नाही.’
अकबर म्हणाला, ‘मग त्यांची जी काही गाण्याची वेळ असेल, त्यावेळी जाऊन आपण गाणे ऐकू.’
तानसेन म्हणाला, त्यांची अशी ठराविक वेळ नसते. त्यांना वाटलं की ते गातात. ते कोणाहीसाठी गात नाहीत.
अकबराने विचारले, मग त्यांचं गाणं ऐकायचं तरी कसं?

बादशहाची तीव्र इच्छा पाहून एक दिवस तानसेन बादशहाला घेऊन गुरुदेवांच्या झोपडीजवळ गेला. दिवसभर दोघेही तिथे मुक्काम ठोकून होते. गुरुजींच्या नकळत गाणे ऐकता यावे, यासाठी लपून बसले होते. संपूर्ण दिवस गेला, परंतु गुरुजींचे सूर कानावर पडले नाहीत. बादशहा अस्वस्थ झाला. तानसेनाने त्यांना आणखी काही काळ थांबण्याची विनंती केली. अपेक्षेप्रमाणे गुरुजींनी मध्यरात्रीच्या प्रहरातल्या रागाचे सूर आळवले. ते दैवी गाणे ऐकताना बादशहा आणि तानसेन यांचे भान हरपले.पहाटे पर्यंत गुरुजींचे गाणे सुरू होते. आणि ते जेव्हा थांबले, तेव्हा अकबर जणू वेगळ्याच विश्वातून जमिनीवर परत आला. आकंठ तृप्त मनाने दोघेही एकमेकांशी चकार शब्द न बोलता राजवाडयापर्यंत आले.गुरुजींचे गाणे मनात काठोकाठ व्यापले होते. अकबराने तानसेनाला विचारले, तूही गातोस. तेही गातात. तुझं गाणं अद्वितीय आहे. पण, त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. हा फरक कशामुळे?
तानसेन म्हणाला, मी काहीतरी मिळावे म्हणून गातो. ते काहीतरी मिळाले आहे, ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही, म्हणून गातात. माझे गाणे स्वार्थाचे आहे, तर गुरुजींचे गाणे परमार्थाचे आहे. हाच दोघामधील मूलभूत फरक आहे.