आनंदाचे डोही …..
मध्यंतरी एकदा मैत्रिणीने तिच्याही नकळत एक कानमंत्र दिला. ‘हॅपीनेस इज अ हॅबिट’ आनंदी असणे ही एक सवय आहे असा मी लगेच शब्दश: अर्थही काढला मराठीत. पण मग हळुहळू त्या वाक्यातून आणखी काय काय गवसत गेलं. असे कित्येकदा होतेच नाही का? म्हणजे आत्ता जे आकलन झालेय त्यातले गहिरेपण कालांतराने अधिकाधिक नजरेस पडू लागते.

कितीतरी लोक व्यापून असतात दिवसभर आपल्याला. आपण कित्येकांना भेटतो. अगदी सकाळचा दूध, किंवा पेपरवाला असो की, मग बाजारातल्या भाजीवाल्या. शेजारी, आप्त, स्नेही…यांव्यतिरिक्त ज्यांना आपण ओळखतही नाही असे कितीतरी बस, ऑटोरिक्षेत, रस्त्यांवर आपल्याला दिसतातच. मनुष्यस्वभावानुसार आपण त्यांची निरीक्षणेही करीत जातो. पण काही चेहरे बघताच प्रसन्न वाटते. काहींच्या चेहऱ्यावर कायम बाराच वाजले असतात. त्यांना ‘सकाळी पेपर आला नाही’पासून ‘भारताला शत्रूराष्ट्रांकडून असलेला धोका’ इथपर्यंत सर्व काळज्या असल्यासारख्या वाटतात. तर काहींना कितीतरी विवंचना असतात, पण त्यांचे चेहरे कायम हसत असतात. ते स्वत: तर आनंदी असतातच, मात्र संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला हसवतात. ही माणसे आनंद शोधत नाहीत, कारण तो त्यांच्यात मुरलेला असतो. जितक्या सहज सवयी मुरल्या असतात ना आपल्यात तितक्याच सहज. मग आपल्याला कळतो अर्थ ‘हॅपीनेस इज ए हॅबिट’ हे का म्हटलेय ते!

गुलजारसाब त्यांच्या कवितेच्या एका ओळीत म्हणाले होते, ‘अरे कोई खुश है कही? चलो ढूँडो .. आओ उसे गले लगाये….’ हा तो आनंद ! तो कुठे असतो? त्याचा पत्ता काय? तर तो असतो सर्वत्रच. बारक्या बारक्या गोष्टीत असतो. मानला तर आणि नाहीच दिसणार म्हटलं तर दिसत नाहीच. भल्या सकाळी, पाखरं चिवचिवली की आनंद होतो. घरातली लेकरं भिंतीवरच्या कोवळ्या उन्हाच्या कवडश्यांना हात लावून बघू लागली की हसू येतं चेहऱ्यावर. ध्यानी मनी नसताना रेडिओवर अकस्मात आपलं लाडकं गाणं लागलं तरी आनंद होतो. काहीवेळ गाण्यातच रमतो आपण. अहो, इतकंच काय पण कपाटातली वस्तू फ्रीजमध्ये शोधायला जातो ना आपण तेव्हा आपल्याच मूर्खपणावर मोठ्यांदा हसतोच की ! फार छोटे छोटे क्षण दिसले पाहिजेत आणि साऱ्या काळज्यांना डोक्यावरून उतरवून ठेवत घटकाभर जगताही आले पाहिजेच.

आपला आनंद सामावला आहे अशी आपली माणसेही असतातच ना? ज्यांच्या नुसत्या असण्यानेही सुखावतो आपण..ज्यांच्या नुसत्या एखाद्या निरोपाने हर्षित होतो किंवा आपल्या दुखऱ्या मनावर ज्यांच्या अलवार फुंकरीने सुख वाटून डोळे भरून येतात..हा ही आनंदच नाही का?

अहो, पण घ्यायचा तसा द्यायचा देखील आनंद. दिला नाही तर तो वाढेल कसा? पसरेल कसा? तर साधे सरळ आहे. आपल्यात ही आनंदीपणाची बीजं असतील तर तिचा प्रसार सर्वत्र होतोच. या आनंदाचा विचार करते तेव्हा मला दूरदर्शनवर पूर्वी दाखवत ते ‘बजे सरगम’ आठवते. त्यात नाही का शेवटी ती मुले आपल्या मेणबत्तीने दुसरी पेटवतात आणि सर्वत्र उजेड दिसतो..? आनंदही तसाच आहे! एकातून दुसऱ्याकडे जातो तो! आणि त्या आनंदाच्या डोही सर्व डुंबत असतात…!