अढी…

 

आईचं दिवसकार्य झालं आणि नातेवाईकांनी घरचा रस्ता धरला. उषानेही आपले कपडे बॅगेत भरायला सुरूवात केली.
रत्ना, तिची वहिनी म्हणाली, “उषा, तू पण लगेच निघणार? राहिली असतीस जरा…” पण दोघींनाही त्यातला पोकळपणा माहित होता.
आई असतानाही उषा क्वचितच माहेरी रहायला आली होती. आई दवाखान्यात अ‍ॅडमिट असताना, तिने कर्तव्य म्हणून सगळं केलं, पण आपल्या घरून येऊन – जाऊन. तिचा नवरा, महेशही सकाळी म्हणाला, “तुला रहायचं असेल तर माझी काही हरकत नाही. मी आणि आई दोघे जातो. तू तुझ्या मनाप्रमाणे ठरव.” पण उषा बॅग भरून त्यांच्याबरोबर निघालीच.
गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला महेश पुढे बसला होता आणि ती आणि सासूबाई मागे. गाडीत बसताक्षणी उषाने डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यांना धार लागली.
सासूबाईंनी तिला जवळ घेतलं आणि थोपटलं. “अगं, आईचं जाणं सहन करणं कठिणच ग! पण वयोमानानुसार हे व्हायचंच. ते स्वीकारायला हवं. आज त्या, उद्या – परवा आमचाही नंबर लागणारच. तू शांत झोप बरं आता डोळे मिटून. खूप दगदग झालीय तुला.” त्यांच्या या बोलण्याने उषाला आणखीनच भरून आलं.
संजय, उषा आणि सविता ही तिघं भावंडं, त्यात उषा मधली. आई-बाबा आणि ही तीन मुलं, तसं आटोपशीर कुटुंब. आई गृहिणी आणि बाबा बँकेत नोकरीला. त्यामुळे खाऊन – पिऊन सुखी होतं सामंत कुटुंब!
कुडाळला वडिलोपार्जित घर, थोडी भात-शेती आणि नारळ-सुपारीची बाग! आजी- आजोबा तिकडेच राहायचे. कामाला गडी-माणसं होतीच, शेती आणि बागेची व्यवस्था बघायला.
उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर पोरं आजोळीच असायची. बाबा पोचवायला यायचे आणि मग सुट्टी संपताना आई-बाबा घ्यायला यायचे. दोन दिवस राहून मग सगळे टिटवाळ्याला, आपल्या घरी परतायचे.
कुडाळला राहायला आई मात्र फारशी खूष नसायची, असं उषाला नेहमी जाणवायचं.
याउलट उषाला आजोळ सोडून घरी परतायला अगदी नकोसं वाटायचं. त्याला कारणही तसंच होतं. आजी-आजोबा भरपूर लाड करायचे.
घरी मात्र आईच्या वागण्यात उषाला कोरडेपणा जाणवायचा. म्हणजे तसं जेवण – खाणं वेळेवर मिळायचं, पण का कोण जाणे त्यात आईच्या प्रेमाचा ओलावा कधी दिसला नाही तिला. एखादं कर्तव्य पार पाडण्याचा भाग असावा, असं आईचं वागणं असायचं.

उषा तशी लहानपणापासून शांतच होती स्वभावाने. कोणत्याही गोष्टीसाठी तिचा हट्ट नसायचा. संजय मुलगा म्हणून त्याचे जास्त लाड व्हायचेच. शिवाय तो आक्रस्ताळेपणा करून, आपल्या मनासारखं करायलाच लावायचा आईला. सविता जन्मापासून अशक्तच होती. तिची तब्येत नाजूक असल्याने साहजिकच आईला तिची जास्त काळजी घ्यायला लागायची.
उषा समजूतदारही होती आणि तब्येतीनंही धडधाकट. बऱ्याचदा शिळंपाकं तिच्याच वाट्याला यायचं. बाबा मात्र सगळ्यांचे सारखेच लाड करायचे. खाऊ, खेळणी, कपडे तिघांनाही आणायचे ते.
एक वाढदिवस सोडला, तर तिच्यासाठी असं विशेष काही घरात बनत नसे. त्यादिवशी बाबा सुट्टी घ्यायचे आणि तिचे सगळे लाड पुरवायचे. त्यामुळे नकळत आईबद्दल तिच्या मनात एक अढी निर्माण झाली होती. एव्हाना आजी-आजोबा दोघंही देवाघरी गेल्यामुळे, आजोळही संपलं होतं.
बी. काॅम. ची परिक्षा झाली आणि तिचं लग्न ठरलं. महेश मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला होता. आई आणि लग्न झालेली मोठी बहीण, अशी मोजकीच माणसं. वडिल नुकतेच वारले होते, म्हणून एक वर्षाच्या आत लग्न करण्याची घाई होती. नाव ठेवण्यासारखं काही नव्हतंच. त्यामुळे लवकरच उषा जाधवांच्या घरची सून झाली.
सासूबाईंच्या प्रेमळ वागण्यामुळे, आईच्या वागण्यातला कोरडेपणा तिला प्रत्येक क्षणी प्रकर्षाने जाणवू लागला. तिच्या लग्नानंतर दोन वर्षांनी बाबा पण गेले, हार्ट-अ‍ॅटॅक येऊन. मग तिचं माहेरी जाणं जवळजवळ बंदच झालं.
संजयच्या लग्नाच्या वेळी तिचा ओम जेमतेम दोन महिन्यांचा होता. त्यामुळे फक्त लग्नाच्या दिवशी ती हाॅलवरच गेली होती. सवितानी रजिस्टर मॅरेज केल्यामुळे, तेव्हाही फक्त हजेरी लावून ती परतली होती. ओमची शाळा – अभ्यास – परिक्षा आणि संसारचक्रात ती गुरफटून गेली.
दोन वर्षांपूर्वी आईला आतड्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि मग वारंवार मुंबईत हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायला लागलं. तिचं घर दादरला, त्यामुळे आईसाठी डबे नेणं-आणणं, भाऊ-भावजयीची सोय पहाणं, सारं तिनं केलं. महेशची, सासूबाईंची मदतही होतीच.
पण तेरा दिवसांपूर्वी आई गेली. त्यादिवशी नेमका महेश हैद्राबादला होता. ती आणि सासूबाई आईचे अंत्यसंस्कार झाल्यावर घरी परतल्या. दहाव्याला आल्यावर मात्र ती तेराव्यापर्यंत टिटवाळ्यालाच घरी थांबली होती.
तिथेच मामींशी बोलताना, तिला आईच्या वागण्याचा उलगडा झाला होता आणि तिची अवस्था आणखीनच विचित्र झाली होती. हे सगळं महेशला आणि सासूबाईंना कसं सांगावं /की सांगूच नये, हेही तिला कळत नव्हतं.
तिच्या बाबांना एक मोठी बहिण होती, हेही तिला कालपर्यंत माहीत नव्हतं. मामी, आईची खास मैत्रिण, म्हणून आईनी तिलाच फक्त हे सांगितलेलं. बाबांच्या बहिणीनी परजातीतल्या मुलाशी लग्न केलं होतं, घरातून पळून जाऊन!
त्यामुळे सामंत कुटुंबानी तिचं नावच टाकलं होतं. तिचा ठावठिकाणाही त्यांना माहित नव्हता.
गौरी-गणपतीसाठी उषाचे आई-बाबा, दोन वर्षांच्या संजयला घेऊन कुडाळला आले होते. गौरी यायच्या दिवशी एक आक्रित झालं. आजीनं पहाटे पाच वाजता उठून परसदारी जाण्यासाठी दार उघडलं आणि बघते तर काय… पायरीवर टोपलीत एक तान्हं बाळ ठेवलेलं होतं. जेमतेम तीन-चार दिवसांचं.
तिनं घरात येऊन आजोबांना उठवलं. त्यांनी आजूबाजूला कोणी दिसतं का पाहिलं, पण व्यर्थ! टोपलीतलं बाळ रडायला लागलं, म्हणून आजी त्याला उचलायला गेली, तर दुपट्याखाली एक चिठ्ठी होती.
‘मी मंदा, तुमची मुलगी, हे जग सोडून जात आहे. मी तुमच्या मनाविरुद्ध लग्न करून तुम्हाला खूप दुःख दिलं आहे. पण मी ज्याच्यासाठी हे केलं, त्यानंही माझी फसवणूक केली. त्याला सर्व प्रकारच्या वाईट सवयी आहेत. त्याला सुधारण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यात या मुलीच्या जन्माची भर. माझ्यातल्या आईनी मला तिला संपवू दिलं नाही. पण माझ्याबरोबर राहून तिची आणि माझीही फरपटच होणार हे सत्य नाकारता येत नाही. म्हणून तिला तुमच्या पायाशी ठेवलं आहे, तिची काहीतरी व्यवस्था लावण्यासाठी. तेवढा तुमच्यावर विश्वास आहे. जमलं तर मला माफ करा.’
आजी-आजोबांनी ते मुटकुळं घरात आणलं. आई-बाबांना उठवलं. लेकीच्या आठवणीनी आजीचे डोळे भरून वाहात होते. काही झालं तरी ती त्यांची मुलगी होती. लेकीबद्दल राग असला तरी तिच्या मुलीला अनाथाश्रमात ठेवणं आजोबांनाही पटत नव्हतं.
बाबाही भावूक झाले होते. आणि… आणि… त्यांनी या मुलीला, आपली मुलगी म्हणून
वाढवण्याचं ठरवलं. आईला त्यांनी काही बोलूच दिलं नाही. ही गोष्ट इतर कोणालाही न सांगण्याची शपथच घातली तिला.
कुडाळमध्ये फारसं कोणी विचारलं नसतं, कारण मुंबईच्या मुलाबद्दल एवढी सखोल माहिती कोणाला नव्हती. ‘गौरीच्या दिवशी सुनेला मुलगी झाली, गौराईच घरी आली’, असं आजीनं तोंडभरून सगळ्यांना सांगून टाकलं.
टिटवाळ्याला गेल्यावर लोकं चौकश्या करतील, म्हणून सात-आठ महिने आई आणि संजयला कुडाळलाच ठेवलं. ‘आजीची तब्येत बिघडली, म्हणून आईला तिकडेच ठेवलंय’, असंच सगळ्यांना सांगितलं. तीन महिन्यांनी मुलगी झाल्याचं सांगून, ‘उषा’ च्या नावाचे पेढे वाटले टिटवाळ्याला.
आईचे आई-वडील तिच्या लग्नाआधीच देवाघरी गेले होते. भाऊ- भावजय नाशिकला. त्यांनाही मुलगी झाल्याचं पत्रानं कळवलं. नणंदेनं ‘आधी काहीच कसं सांगितलं नाही’, असं भावजयीच्या मनात आलंच. कारण दोघी खास मैत्रिणी होत्या लहानपणापासून!
मग कधीतरी आईनं तिला हे सांगितलं, गुपित राखण्याची शपथ घालून. आणि काल आईच्या तेराव्याच्या दिवशी उषाला हे कळलं होतं, मामीनंही ती एकटी असताना आणि कुणालाही न सांगण्याच वचन घेऊन, तिला हे सांगितलं होतं.
आईबद्दलची अढी त्याचक्षणी नाहिशी झाली होती. उलट आपला सांभाळ करून आपल्याला पोरकेपणाच्या दुःखापासून, परिणामांपासून दूर ठेवून, चांगलं सुरक्षित आयुष्य दिल्याबद्दल, कृतज्ञताच तिच्या मनात दाटून आली होती. नकळत का होईना, आपण तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला, याचं उषाला वाईट वाटत होतं. आणि….. पोरकेपणाची जाणीव अधिक तीव्रतेने तिच्या डोळ्यांतून कोसळायला लागली.
© प्रणिता खंडकर