कंटोळी (कर्टुल) – रानभाजी

माहिती:
पावसाळयातील पालेभाज्या आणि फुलभाज्यांनंतर ही एक फळभाजी आहे. पावसाळा सुरू झाल्यावर जुन्या वेलीच्या मुळाच्या गाठीपासून किंवा बिया रूजून ह्या वेलींना फुटवा फुटतो. त्याची झपाटय़ाने वाढ होऊन पाच ते सहा पानांवर असतानाच जंगलांत सर्वत्र हया जमिनीलगत वाढलेल्या वेलींवर पिवळी फुले दिसू लागतात. बारा-पंधरा दिवसातर कंटोली धरतात. कंटोळी फळांची भाजी खूपच लोकप्रिय आहे. फळे साधारणत: पाच ते सात से.मी. लांबीची असतात. आकाराने लांबट-गोल असतात व त्यावर मऊ काटे असतात. फळात बीया भरपूर असतात. कोवळ्या फळांची भाजीच चांगली होते. भाजी रूचकर असते पण चिकट असते. विविध प्रकारांनी ही भाजी केली जाते. कारल्याच्या वर्गातील असल्याने औषधात त्याचे कडू गुणधर्म असून ते जठरोतेजक व सारक आहेत.

साहित्य:
• ४ जुड्या कंटोळी (धुवुन आणि उभी चिरुन घ्यावी)
• २ कांदे
• १ टोमॅटो
• अर्धा चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
• पाव चमचा हळद
• थोडे हिंग
• पाव वाटी खवून घेतलेलं ओलं खोबरं
• १ ते २ चमचे मसाला
• २ चमचे तेल
• फोडणी – राई, जिर, कढीपत्ता
• चवीपुरते मीठ

कृती:
• प्रथम कडईमध्ये तेल टाकून त्यात वरील फोडणी घालावी नंतर त्यात कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतवा.
• कांदा शिजला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालावी.
• थोडं परतून घ्यावे आणि त्यात हिंग, हळद, मसाला घाला.
• सर्व एकत्र परतवून त्यात चिरलेली कंटोळी घालावीत. परतवून ही भाजी वाफेवर (झाकणावर पाणी ठेवून) शिजवावी.
• भाजी शिजली की त्यात टोमॅटो चिरुन घाला आणि मीठ घाला. परत थोडावेळ शिजत ठेवा.
• भाजी शिजली की त्यात ओलं खोबरं घालून परतवून गॅस बंद करा.
• कंटोळयाची भाजी तयार आहे.

टिपा:
ह्या भाजीत बटाटा ही घालता येतो. तसच कंटोळी कडधान्यात घालता येतात. आमटीत घालता येतात. पिवळी कंटोळी जुन असतात. जर आतुन लालसर झाली असतील तर घेउ नये.

औषधी गुणधर्म:-
• करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात.
• रक्तार्शांत कंदाचे चूर्ण देतात. कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहात देतात. डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात.
• करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे. पाने कामोत्तेजक व कृमिनाशक असून, त्रिदोष, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्‍वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यात गुणकारी आहेत.
• करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक, दीपक आणि थोडे विरेचक आहे. वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत.
• अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. रक्तरोग, डोळ्यांचे रोग, धावरे या विकारांत करटोलीचा वापर करतात. वाळवलेल्या फळाचे चूर्ण किंवा फांट नाकपुडीत घातल्यास विपुल स्रावासाठी उत्तेजक आहे. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.
• करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते.
• ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते. ज्यांच्या मूळव्याधीतून वरचेवर रक्तस्राव होतो; वेदना, ठणका असताे, अशांसाठी ही भाजी अत्यंत हितकारक आहे.
• सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे.
• त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्‍य खावी.