दाल बाफले चुरमा.

(बाफले हे बाटीपेक्षा वेगळे असतात. बाटी ओव्हनमध्ये किंवा तव्यावर भाजतात तर बाफले आधी पाण्यात शिजवून मग तुपात तळतात.)

साहित्य :-

डाळीसाठी:-
सालीची मूग डाळ अर्धा कप
चणाडाळ १ टेबलस्पून
हळद १ टीस्पून
साजूक तूप २ टेबलस्पून
लसूण ८–१० पाकळ्या बारीक चिरून
हिंग पाव टीस्पून
जिरं अर्धा टीस्पून
आलं १ इंच बारीक चिरून
हिरव्या मिरच्या २ बारीक चिरून
कांदा १ मध्यम – बारीक चिरून
टोमॅटो १ मध्यम – बारीक चिरून
काश्मिरी लाल तिखट १ टीस्पून
धने पूड १ टीस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
गरम मसाला पाव टीस्पून
मीठ चवीनुसार

बाफले साठी:-
जाडसर कणिक २ कप
मीठ अर्धा टीस्पून
धने जाडसर कुटून अर्धा टीस्पून
ओवा पाव टीस्पून
साजूक तूप ४ टेबलस्पून (सामान्य तापमानात ठेवलेलं)
बेकिंग सोडा १ चिमूट
तूप तळण्यासाठी

चुरम्यासाठी:-
वेलची पूड पाव टीस्पून

सुक्या मेव्याचे तुकडे २ टेबलस्पून

पिठीसाखर अंदाजे पाव कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

साजूक तूप २ टेबलस्पून

कृती:-
डाळीची कृती:-
१. दोन्ही डाळी एकत्र धुवून ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा.

२. एका मोठ्या पातेल्यात पुरेसं पाणी घालून त्यात डाळी घाला; अर्धा टीस्पून हळद घाला. मिश्रणाला उकळी आली की गॅस बारीक करून पातेल्यावर झाकण ठेवून डाळी शिजवून घ्या.

३. पातेल्यात मीठ घाला आणि मिश्रण रवीने / डावाने घुसळून एकजीव करून घ्या.

४. दुसऱ्या पातेल्यात साजूक तूप गरम करून त्यात लसणीचे तुकडे गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात हिंग, जिरं घाला. जिरं तडतडलं की हिरवी मिरची आणि आलं घाला. मिश्रण परतून घ्या.

५. कांदा घालून पारदर्शक होईपर्यंत परता. टोमॅटो घालून २–३ मिनिटं परता. काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, धने पूड आणि थोडं मीठ घाला (आपण डाळीत मीठ घातलंय ते लक्षात ठेवा). टोमॅटो नरम होईपर्यंत मिश्रण शिजवा.

६. शिजलेल्या डाळी घाला. थोडं पाणी घालून मिश्रण उकळून घ्या. ही डाळ दाट असते.

७. गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. चवदार डाळ तयार आहे.

बाफलेची कृती

१. तळणीचे तूप वगळून सर्व साहित्य एका परातीत एकत्र करा. हाताने एकजीव करून घ्या. थोडं पीठ मुठीत घेऊन मूठ दाबून बंद करा. पिठाचा मुठीचा आकार तसाच राहिला तर मोहन बरोबर आहे असं समजावं. नाहीतर अजून थोडं मोहन घालावं.

२. थोडं थोडं कोमट पाणी घालून घट्ट पीठ भिजवा. १०–१५ मिनिटं झाकून ठेवा.

३. एका मोठ्या पातेल्यात २ लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवा.

४. पीठ ३–४ मिनिटं मळून घ्या आणि मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा – १२–१४ गोळे होतील. प्रत्येक गोळ्याला हाताच्या बोटाने एक खाच करून घ्या.

५. तयार गोळे (बाफले) उकळत्या पाण्यात सोडा. गॅस मध्यम करा. सुरुवातीला बाफले पातेल्याच्या तळाशी जातील. शिजल्यावर बाफले पाण्यात तरंगताना दिसतील. सर्व बाफले पाण्यात तरंगायला लागले की आणखी १० मिनिटं शिजवा. शिजलेले बाफले हलके होतात आणि त्यावर छोटे छोटे ठिपके दिसतात. शिजलेले बाफले एका ताटलीत काढून गार करून घ्या.

६. प्रत्येक बाफल्याचे दोन तुकडे करा.

७. एका कढईत तूप गरम करून बाफल्याचे तुकडे मध्यम आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. खमंग खुसखशीत बाफले तयार आहेत.

चुरम्याची कृती

१. बाफल्याचे तळलेले तुकडे गार झाले की ८–१० तुकडे हाताने कुस्करून घ्या. मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.

२. एका कढईत २ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात वाटलेले बाफले घालून मंद आचेवर हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्या. एका वाडग्यात काढून थंड करून घ्या.

३. वेलची पूड आणि सुक्या मेव्याचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करा.

४. मिश्रण पूर्ण गार झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून एकजीव करा. स्वादिष्ट चुरमा तयार आहे.

खाताना बाफले हाताने चुरडून त्यावर डाळ घाला. आवडत असल्यास थोडं साजूक तूप घाला. चवदार डाळ बाफले आणि चुरम्याचा आस्वाद घ्या.