नासलेलं दूध टाकून न देता असा करा वापर, बनवा स्वादिष्ट पदार्थ

 

1. खवा बनवण्यासाठी –

रात्री दूध फ्रीजमध्ये ठेवण्यास विसरल्यामुळे ते जर नासले असेल तर तुम्ही त्यापासून मस्त खवा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नासलेले दूध तोपर्यंत गरम करायचे आहे जोपर्यंत त्यातील सर्व पाणी आटत नाही. त्यानंतर घट्ट झालेल्या दूधात थोडी साखर मिसळा आणि मस्त घरच्या घरी खवा बनवा. हा खवा तुम्ही कोणत्याही मिठाईसाठी, खव्याची पोळी बनवण्यासाठी वापरू शकता.

2. पनीर बनवण्यासाठी –
नासलेल्या दुधाचे पनीर खूप चांगले बनू शकते. कारण पनीर बनवण्यासाठी तुम्हाला आधी दूध फाडावे लागते. तुमच्याकडे तर तयार फाटलेले दूध आहे. आता त्यामध्ये आणखी थोडे व्हिनेगर टाकून ते उकळून घ्या. ज्यामुळे पाण्यापासून पनीर वेगळे निघेल. घट्ट झालेला पनीरचा भाग गाळून घेण्यासाठी एका मलमलच्या कापडात पनीर घट्ट पिळून घ्या आणि थोडावेळ टांगून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला तयार पनीर मिळेल. या पनीरचा वापर तुम्ही पनीर भुर्जी, पनीर पकोडा, रसमलाई, रसगुल्ला अशा पदार्थांसाठी करू शकता.

3. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी –
फाटलेले दूध तुम्ही तुमच्या एखाद्या भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरू शकता. यासाठी नासलेलं दूध भाजी शिजल्यावर शेवटी टाका आणि दोन ते तीन मिनीटे उकळून गॅस बंद करा. ज्यामुळे तुमच्या भाजीची ग्रेव्ही तर घट्ट होईलच शिवाय तुमच्या भाजीचा स्वादही वाढेल.

4. कणीक मळण्यासाठी –
कणीक मळण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करण्याऐवजी नासलेले दूध वापरू शकता. ज्यामुळे तुमची कणीक अतिशय मऊसूत आणि स्वादिष्ट होईल. दुधामध्ये असलेले कॅल्शिअम आणि प्रोटिन्स तुमच्या पीठात मिक्स झाल्यामुळे या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या जास्त चविष्ट आणि पौष्टिक होतील.

5. भात शिजवण्यासाठी –
घरात जर जास्त प्रमाणात दूध खराब झाले असेल तर तुम्ही त्याचा वापर स्वयंपाकात नक्कीच करू शकता. भात शिजताना त्यामध्ये नासलेले दूध मिसळले तर त्यामुळे भाताची चव आणि पोषकतत्त्व नक्कीच वाढतील. यासाठी नासलेले दूध गाळून घ्या आणि ते पाणी भात शिजवताना वापरा. तुम्ही हे पाणी भाताप्रमाणेच न्यूडल्स अथवा पास्ता बनवण्यासाठीदेखील वापरू शकता.