राईस पकोडा

बाहेर मस्त भुरभुरणारा किंवा रिमझिम बरसणारा पाऊस आणि घरामध्ये गरमागरम भजी, पकोडे आणि चहा यांचा आस्वाद घेणारे चहाप्रेमी… हे चित्र थोड्या फार फरकाने सगळीकडेच दिसतं. पाऊस पडायला लागला की काहीतरी गरमागरम, क्रिस्पी, क्रंची आणि तळलेलं खाण्याची इच्छा होतेच. खरंतर पाऊस नसला तरी असे चटकदार पदार्थ एरवीही खायला सगळ्यांना आवडतातच.. म्हणूनच तर घरात भात उरला असेल तर हा एक मस्त पदार्थ करून बघा. उरलेल्या भाताला फोडणी देणं किंवा त्याचा शेजवान राईस, फ्राईड राईस करणं, हे तर नेहमीचंच. यावेळी हा नवा आणि एकदम सोपा पदार्थ ट्राय करा.

राईस पकोडा करण्यासाठी खूप शिळा भात वापरू नका. सकाळचा उरलेला भात रात्री अशा पद्धतीने खाणे चांगले.

साहित्य :

उरलेला भात,
बारीक चिरलेला कांदा,
बारीक चिरलेली कोथिंबीर,
मिरचीचे तुकडे किंवा पेस्ट,
दही, बेसन, हिंग, हळद, ओवा
आणि चवीनुसार मीठ.

कृती :

– राईस पकोडा करण्यासाठी सगळ्यात आधी उरलेला भात एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि हातानेच थोडा मोकळा करून घ्या.

– साधारण दोन वाट्या भात असेल तर त्यात अर्धी वाटी चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकावी. तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार मिरचीचे तुकडे टाकावेत.

– यानंतर यात २ टेबलस्पून बेसन टाकावे आणि तेवढेच दही टाकावे.

– चिमुटभर हिंग, हळद आणि ओवा घालावा. आवडीनुसार जिरेपूड, धनेपूड घातली तरी चालते.

– आता हे सगळे मिश्रण एकत्र करून कालवून घ्या. हे मिश्रण खूप जास्त घट्ट भिजवू नका तसेच अगदी पातळही करू नका. चमच्याने टाकलं की कढईत सरकन पडलं पाहिजे, अशा स्वरुपाचं मिश्रण असावं.

– हे मिश्रण भिजविण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करू नका. फक्त दहीच वापरा.

– आता एका कढईत तेल तापायला ठेवा आणि तेल तापलं की त्यात आपण केलेल्या मिश्रणाचे पकोडे तळून घ्या.

– पकोडे तळून झाल्यावर त्यावर वरतून थोडा चाट मसाला टाका. गरमागरम पकोडे टोमॅटो सॉस किंवा मग चिंच – पुदिना चटणीसोबत खाता येतात