मुलांसाठी कोडींग – गरज की scam?
(प्रस्तुत लेख हा प्रत्येक पालकाने, पालक होऊ पाहणाऱ्याने आणि पालकांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने वाचावा आणि शेयर करावा अशी अपेक्षा आहे, वेळ निघून जाण्याआधी.. का ते लेख वाचल्यावर कळेलच:)
– ©सुमित चव्हाण
आज बबलूचे शेजारी फार अचंबित झाले होते. उच्चभ्रू असे वाटणारे निरनिराळ्या वयाचे परदेशी लोक(ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघेही होते) बबलूच्या घराबाहेर सकाळीच जमा झाले होते आणि एकमेकांशी लाथ-बुक्क्यांनी मारामारी करत होते. आणि त्यांना थांबवायचं सोडून बबलूचे आईवडील घराच्या अंगणात निवांतपणे चहा पित बसले होते. शेजारच्या काकांनी न राहवून त्यांना विचारलं, ‘हे काय चाललंय तरी काय?’
बबलूची आई सांगू लागली, “आमच्या बबलूने ट्रेन मध्ये मिळणारं ‘एकवीस दिवसात डॉक्टर बना’ पुस्तक वाचलं, कोरोनाची लस बनवली, आणि आता त्याच्या लशीमध्ये गुंतवणूक करायला दुनियाभरचे आरोग्य विभागाचे अधिकारी आले आहेत.”

काका काही बोलण्याच्या आधीच आतून बबलू बाहेर आला. जेमतेम ७ वर्षांच्या बबलूला पाहून काकांना भोवळ यायचीच बाकी होती.
एव्हाना मी कोणत्या जाहिरातीबद्दल बोलत आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच. प्रस्तुत उदाहरण देताना कोडींग आणि आरोग्य या दोन क्षेत्रांची तुलना करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता, आपल्याला प्रकरणाचं गांभीर्य समजावं हा एकच उद्देश. दिवसरात्र IPL च्या ब्रेकमध्ये, आपल्या फेसबुक वर धुमाकूळ घालणाऱ्या या ‘मुलांना कोडींग’ शिकविण्याचा धंदा करणाऱ्या जाहिराती आपल्याला जे स्वप्न विकू पाहत आहेत, ते किती चुकीचं, बिनबुडाचं आणि त्याहूनही वाईट म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किती हानिकारक आहे हे आपल्याला वेळीच समजायला हवं, यासाठीच हा खटाटोप.
©सुमित चव्हाण
ह्या जाहिराती आपल्याला सांगतात, की आपल्या मुलाला coding शिकवलं तर तो स्टिव्ह जॉब्स बनेल. प्रत्यक्षात ते आपल्यापासून लपवत आहेत की स्टिव्ह जॉब्सने स्वतः कधीच कोडींग केली नाही. खरंतर तो एक अभियंता सुद्धा नव्हता, तर होता एक व्यावसायिक. दुसरं उदाहरण दिलं जातं ते मार्क झुकेरबर्गचं, जो एक चांगला कोडर आहेच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो एक खूप हुशार आणि धूर्त असा माणूस आहे. फेसबुकची मूळ कल्पना ही त्याने दुसऱ्याकडून त्याला न सांगता वापरून फेसबुक उभारले आहे. आजही त्याच्या कंपनीवर लोकांच्या खाजगी माहिती चोरीचे वारंवार आरोप होत असतात. अर्थात याने त्याचं कोडर म्हणून महत्व कमी होत नसलं तरी आपल्या मुलांसमोर हे आदर्श ठेवत असताना प्रत्येक पालकाने सर्व बाजूंनी विचार हा नक्कीच करायला हवा. हे कोर्सेस विकणारे तर आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना घेऊन, ‘मुलांनो कोडींग शिका, देशाला नावलौकिक मिळवून द्या.’ हे स्वतः त्याचं गांभीर्य न जाणून घेता, फक्त पैश्यांसाठी बोलायला लावत आहेत.

हे सर्व पाहिल्यावर मला आठवतात ते आपल्या लहानपणी घरी येणारे पाहुणे, जे फक्त पाढे अगर परीक्षेतील गुण विचारून मुलांना त्रास देत असत, किंवा आपल्या महाविद्यालयीन काळात viva घेताना असे काही परीक्षक असत जे syllabus च्या बाहेरचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना स्वतःचीच हुशारी (?) दाखवण्यात धन्यता मानत. असं काय होतं यांच्यामध्ये ज्यामुळे मुलं त्यांचा एवढा द्वेष करत? – ‘तुलना करण्याची वृत्ती’. जिच्यामुळे जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टींची यादी ही अनावश्यकरित्या वाढत जाते. याची परिणीती ‘तुला हे नाही येत, मग काय उपयोग?’, ‘तुला साधं हे पण नाही माहिती, इतका कसा रे बुद्धू तू’ यामध्ये होते. मुलांना कोडींग शिकविण्याचा अट्टाहास हा याच वृत्तीला खतपाणी देणारा आहे. दर काही वर्षांनी एक नवीन ट्रेंड येतो, जो आपल्या मुलांबद्दल मिरवण्यासाठी आईवडिलांना काहीतरी कारण देऊन जातो, आधी इंजिनीरिंग आलं, मग IIT-JEE आलं – पाचवीपासून IIT JEE चे क्लासेस लावणारे पालक याच ट्रेंड ने जन्माला घातले, MPSC-UPSC झालं – ज्याने यशस्वी मुलांची उदाहरणं पाहून कसलाही बॅकअप प्लॅन न ठेवता आयुष्याची महत्वाची बरीच वर्षे त्यात खर्ची करण्याची रिस्क घेणारे दाखवले, क्रिकेट मध्ये पैसा आहे म्हणून प्रत्येक मुलाला सरसकट क्रिकेट कोचिंगला पाठवणं आलं, सो-कॉल्ड हिरो-हिरवीन बनवण्यासाठी मुलांना acting च्या summer camps ना पाठवणं झालं आणि आता कोडींग सुद्धा तसाच एक नवीन ट्रेंड घेऊन येऊ पाहतोय. मुलांनी आवड म्हणून कोडींग शिकण्याच्या मी विरोधात नाही परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता ‘अमुक अमुक कोर्स केला की आमचा मुलगा Microsoft चा CEO होईल बघा’ यामध्येच त्याची परिणती होणार आहे. आपल्या देशाची नवी पिढी जर खऱ्या अर्थाने जपायची असेल, तर आधी असे स्वतःची झोळी भरण्यासाठी पालकांच्या डोळ्यांची झापडं बंद करणाऱ्या ट्रेंड्स चा समाचार घ्यायला हवा. IT क्षेत्रात स्वतः ८ वर्षं काढल्यानंतर एक गोष्ट मी निक्षून सांगू शकतो, की IT industry ही फक्त कोडिंगवर आधारित नाही, किंबहुना फार कमी लोक हे best coders म्हणावे असे लागतात इथे. जसं सिनेमा क्षेत्रात कार्यरत असणारा प्रत्येकजण हा काही अभिनेता नसतो तसंच हे. काही आठवड्यांपूर्वी ‘चीनचे गेम्स ऍप आहेत आपले सॉफ्टवेअर डेव्हलपर्स काय फक्त रस्त्यावरची ट्रॅफिक वाढवतात का?’ अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. खरंतर Snapchat चा राग येऊन आपल्या मोबाइल मधून Snapdeal अनइन्स्टॉल करणारे आणि Surf Excel वरून Ms Excel ला शिव्या घालणारे यांच्याकडून Pubg सारख्या गेम्सचे डेव्हलपर्स आणि इतर सॉफ्टवेअर अभियंता यांमध्ये गल्लत होणे यात नवल ते काय.. त्यातही आपण एका लोकप्रिय मराठी चित्रपटात एका मुलीला काहीही बॅकग्राऊंड नसताना नामांकित कॉलेजची website हॅक करताना ही पाहिले आहे, ह्या असल्या गोष्टी आपण हसून सोडून जरी दिल्या तरी असे चुकीचे समज जेव्हा समाजाची मानसिकता बनतात, तेव्हा त्यांवर वेळीच प्रतिबंध घालणे ही सर्वांचीच जबाबदारी बनते. जाहिरातीमध्ये मुलाने बनवलेल्या साध्या static app मध्ये गुंतवणूक करायला दुनियाभरातले investors आलेले दाखवत असताना, पुरेश्या आर्थिक पाठबळाअभावी आज आपल्याच देशातील कित्येक स्टार्टअप्स दिवसेंदिवस बंद पडत असल्याची तरी जाणीव ठेवायला हवी होती. त्या स्टार्टअप्सच्या कल्पना ह्या बौद्धिक आणि मेहनतीच्या पातळीवर कितीतरी पटीने जास्त वरचढ असतात हेदेखील कुणीही नाकारणार नाही. मग ही असली धूळफेक कशासाठी?

©सुमित चव्हाण
थोडा वेगळा विचार केला असता, कोडींग साठी लागणारी जी मानसिक, बौद्धिक जडणघडण लागते, ती विकसित होण्याआधीच लहान मुलांवर कोडींगचा भार टाकणे हे सर्व दृष्टीने चिंताजनक आहे. खरंतर कोडींग हे सतत बदल होत राहणारं क्षेत्र आहे जिथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत की त्या सर्वांची नावे कोणत्याच डेव्हलपरला सांगता येणार नाहीत. त्यातही तुमच्या मुलाने आज शिकलेली गोष्ट ही त्याचा उपयोग होईपर्यंत मार्केट मधून पूर्णपणे हद्दपार झालेली असू शकते आणि त्याला सर्व पहिल्यापासून सुरू करण्याची गरज पडू शकते. याच कारणासाठी IT मध्ये काम करणारा प्रत्येकजण हा सतत एका तणावाखाली, दडपलेला, असा भासतो. त्याला कधी विचारून पहा, ‘work-life balance’च्या कल्पनांना त्याने केव्हाच दिलेली तिलांजली त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसेल. सतत काहीतरी नवीन शिकत राहणे ही कल्पना कितीही रोमांचक वगैरे वाटली तरी काही वर्षांनंतर, स्थिर नोकरी/व्यवसाय असणे, आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देता येणे हे प्रत्येकाचीच सुप्त इच्छा, नव्हे हक्कच आहे. आणि एखाद्या क्षेत्राचा उदोउदो करून त्यातच सर्वांनी घुसायचं म्हटलं तर इतर क्षेत्रांमध्ये निर्माण होणारी कमतरता आणि त्या एकाच क्षेत्रात प्रचंड उपलब्धतेमुळे वाढलेली अनावश्यक स्पर्धा, दोन्हीही घातकच आहेत. उद्या जर आपली सगळी मुलं खरंच कोडिंग शिकली तर त्या जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे त्यांच्या घराबाहेर investors नाही, तर ते मुलंच स्वतः मर्यादित नोकऱ्यांच्या शोधात एकमेकांशी मारामारी करताना दिसतील. आधीच आपण करिअर च्या नसत्या कल्पना बिंबवून बऱ्याच मुलांना डिप्रेशन मध्ये टाकलं आहे. कालच वाचनात आलं होतं, ‘जर आईवडिलांनी आपल्या मुलांवर करिअरसाठी इतका अनाठायी भार टाकला नसता, तर आज ‘तारें जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’ पाहताना एक अख्खी पिढी रडली नसती.’
अर्थात IT सोडून इतर क्षेत्रांमध्येदेखील कोडींग चा उपयोग होऊच शकतो, परंतु त्याचं प्रमाण सरसकट सर्वांनी ते शिकावं (त्यातही नक्की काय आणि काय-काय शिकणार हा मोठा प्रश्न आहेच) इतकं नक्कीच नाही आणि तेवढ्यासाठी इतक्या लहान वयापासून ते सुरू करावं हे तार्किक वाटत नाही. तसं पाहिलं तर कोडींग म्हणजे काय, तर संगणकाला सूचना देण्यासाठी, एखादं ठराविक कार्य करवून घेण्यासाठी लिहिलेल्या, त्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर.. आणि त्यासाठी लागतं काय, तर गणिताचं अधिष्ठान असणारी विचारप्रणाली (mathematical analytical skills), विविध समस्या सोडवू शकण्याची कौशल्ये (problem solving skills) आणि हा पाया भक्कम होण्यासाठीचं शिक्षण, आणि ते आपल्या मुलांमध्ये निर्माण करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी. त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन, की पुढील आयुष्यात हे सर्व समर्थपणे पेलायला आपण आपल्या मुलांमध्ये मैदानी खेळ, सांघिक वृत्ती, प्रत्येक गोष्टीचा मुळाशी जाऊन शोध घेण्याची जिज्ञासा, हे सर्व कसं विकसित होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे कोडींग म्हणजे संगणकाला आपल्या गरजेप्रमाणे त्याच्या भाषेत सूचना देणे असल्यामुळे, ते शिकण्याचा अट्टाहास करताना आपण आपल्या मुलांनाच तर यंत्र बनवत नाही आहोत ना, याचीच मला जास्त धास्ती वाटते.
– ©सुमित चव्हाण