शाही गुलकंद लाडू

हा एक सोपा लाडूचा प्रकार सातूचं पीठ, कणिक आणि गुलकंद वापरून केला आहे . अतिशय स्वादिष्ट आणि वेगळे असे हे लाडू तुमची स्पेशल स्वीट डिश म्हणून बनवू शकता किंवा सणाच्या दिवशी प्रसाद म्हणून बनवू शकता. सगळ्यांना नक्की आवडेल.

सातूचं पीठ २ प्रकारचं असतं. १. फक्त चण्याचं आणि २. चणा आणि गव्हाचं. मी आणलेलं पीठ फक्त चण्याचं होतं. म्हणून चिकटपणासाठी कणिक घालावी लागली. तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं पीठ मिळालं तर कणिक घालायची गरज नाही. फक्त सातूचं पीठच सव्वा दोन कप घ्या. आणि अर्धा कप तुपात भाजा.

साहित्य

आवरणासाठी
सातूचं पीठ दीड कप
कणिक अर्धा कप
साजूक तूप अर्धा कप (अंदाजे)
दुधाची पावडर ५ मोठे चमचे
पिठीसाखर ६ मोठे चमचे
वेलची पूड पाव चमचा
सुक्या मेव्याची पावडर लाडू घोळवायला (ऐच्छिक)

सारणासाठी
गुलकंद ५ मोठे चमचे
सुक्या मेव्याची पावडर ३ मोठे चमचे (किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरू शकता )

कृती :-
१. सुक्या मेव्याची पावडर करण्यासाठी बदाम, काजू, पिस्ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. मिक्सर पल्स मोड मध्ये चालवा. एकदम जास्त वेळ मिक्सर चालवला तर पावडर तेलकट होते. सुका मेवा भाजायची जरूर नाही.

२. एका पातेल्यात पाव कप तूप घालून सातूचं पीठ मंद आचेवर ३-४ मिनिटं भाजून घ्या. सातू भाजलेलंच असतं त्यामुळे जास्त भाजावं लागत नाही. पीठ एका बाउल मध्ये काढून घ्या.

३. त्याच पातेल्यात पाव कप तूप घालून कणिक मंद आचेवर खमंग भाजून घ्या. सातूच्या पिठाच्या बाउल मध्ये काढा.

४. पिठं थंड झाली की त्यात दुधाची पावडर, पिठीसाखर आणि वेलची पूड मिक्स करा. आणि मध्यम घट्ट गोळा बनवा. जरूर पडल्यास थोडं तूप घाला पण जास्त घालू नका. नाहीतर लाडू गोल रहाणार नाहीत.

५. सारणासाठी गुलकंद आणि सुक्या मेव्याची पावडर मिक्स करा. मिश्रण फार ओलं नको. असेल तर आणखी थोडी सुक्या मेव्याची पावडर घाला.

६. पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी बनवा. त्यात सारण भरून लाडू सगळ्या बाजूनी बंद करून घ्या. आवडत असेल तर सुक्या मेव्याच्या पावडर मध्ये घोळवा.

७. स्वादिष्ट शाही गुलकंद लाडू तयार आहेत.

८. हे लाडू फ्रिज मध्ये ठेवू नका. फ्रिज बाहेर १ आठवडा चांगले राहतात.