#वास

भर दुपारची वेळ. तिने घराचं कुलूप ऊघडून आत पाऊल टाकलं अन् भस्सकन तो वास तिच्या नाकात शिरला. ती वैतागलीच.

कालपासूनच हा वाईट वास तिला त्रास देत होता, पण गंमत म्हणजे घरात बाकी कोणालाच तो येत नव्हता. पण तिला मात्र वासाने अस्वस्थ झालेली पाहून प्रत्येकाने तिची मस्त खिल्ली ऊडवली होती.

आता मात्र तो वास बऱ्यापैकी तीव्र झालेला होता. काल आपली चेष्टा करणाऱ्या प्रत्येकाला ओढत इथे आणून आता तो वास घ्यायला लावावा असं वाटलं खरं. पण मग मात्र आपल्या चरफडण्याचं लगेचच हसू आलं तिला.

आधी स्वैपाकघरात जाऊन तिने सगळे कप्पे, भाजीची टोपली वगैरे धुंडाळले.
छे !! कुठेही शिळे अन्न, खरकटे वगैरे काहीही शिल्लक नव्हते. कुठली भाजी वगैरे पण खराब झाली नव्हती.

मग काय असावं बरं ?
‘बाप रे, उंदीर किंवा पाल वगैरे मेलंय की काय कुठे ? ई ….’
मनातल्या मनात तिने शेजाऱ्यांना शिव्या पण घातल्या. यांनी विषारी औषध घालायचं न् आम्ही निस्तरायचं …

ती आख्खी दुपार स्वैपाकघर साफ करण्यातच गेली. सगळे काने कोपरे साफ झाले. माळ्यांवर पाहिलं. पण काहीच नाही.

मग बाहेरची खोली साफ झाली. नव्हतंच विशेष सामान तर काय … पण छे ! काहीच सापडलं नाही.

संध्याकाळी एकेक मेंबर मात्र घरात शिरले ते नाक वाकडं करतच. तिच्याकडे अपराधी मुद्रेने पहात. नजरेनेच आदल्या दिवशीच्या चेष्टेबद्दल दिलगिरी व्यक्त करत तेही या शोधाशोध उर्फ साफसफाई मोहिमेत सहभागी झाले. बाकीच्या दोन खोल्या, सगळे माळे सगळीकडे पाहिलं. पण व्यर्थच.
शेवटी तळमजल्यावर घर असल्याने बाहेरूनच वास येत असावा यावर सगळ्यांचच एकमत झालं.

दुसरा दिवस ऊजाडला. आता मात्र तो वास चांगलाच असह्य होऊ लागलेला. सगळेजण आपापल्या कामाला रवाना झाले तशी घराबाहेर फेरी मारली तिने. पण बाहेर तर वास येतच नव्हता. घरात शिरल्याबरोबर खात्रीच झाली तिची की याचा ऊगम कुठेतरी घरातच आहे. नाक वेडंवाकडं करून दीर्घ श्वास घेत इकडे-तिकडे फिरून ती वासाचा ऊगम शोधू लागली.

शेवटी त्या एका खोलीतच काहीतरी गडबड आहे याची खात्री झाली. आदल्याच दिवशी पलंगाखालचे काने-कोपरे न माळेसुद्धा साफ केले होते की !!
मग आता कुठे?
हां … खोलीतलं कपाट …
तिने कपाट ऊघडलं मात्र …

एकदम भपकारा आला. ती एकदम मागेच सरकली. तो वास जरा बाहेरच्या हवेत जिरू दिला अन् नाकावर हात धरून ती बारीक नजरेने कपाटाचं निरीक्षण करू लागली.

बघता बघता तिची नजर कपाटातल्या थेट खालच्या कप्प्यात ठेवलेल्या कपड्यांकडे गेली न् तिचे डोळेच विस्फारले. त्यावर एक लालसर काळा ओला डाग दिसत होता.
‘ई गं बाई … रक्त की काय हे ? बंद कपाटात हा ऊंदीर घुसला तरी कसा ?’ असं मनाशीच बडबडत तिने आजूबाजूला पाहिलं. छे! बाई काम ऊरकून गेली होती. घरातलं कुणीही संध्याकाळशिवाय परतणार नव्हतं. कुणाचीही मदत मिळणार नव्हती. तिला एकटीलाच हे काम करावं लागणार होतं.

जीव मुठीत धरून हळूच तिने तो कपडा पहिला. त्याला हात लावून पहिला. थंडगार ओला स्पर्श झाला. शहारत तिने हात मागे घेतला.

मग एका चिमटीत नाक पकडून मनातली किळस दाबत ती सावधपणे एकेक कपडा ओढून काढू लागली. आख्खा कप्पा रिकामा झाला पण काहीच नाही.
सगळ्या घड्या उलगडल्या. काहीच मिळालं नाही. बघता बघता वरचेही चारही कप्पे आवरले.
पण … सगळंच मुसळ केरात.

‘हे काय गौडबंगाल ???’ तिला काहीच कळेना. शेवटी परत कपडे कप्प्यात ठेवण्यासाठी ती कपाटाच्या दारासमोर फतकल मारून बसली आणि एकेक घडी व्यवस्थित ठेवू लागली.

आणि अचानक … टप्प …
कुठूनसा एक लाल-काळसर द्रवाचा ठिपका तिच्या हातावर पडला.
‘ई …..’ … बाहेर पडू पाहणारी किंकाळी कशीबशी दाबून तिने वर पाहिलं. कपाटाच्या दाराला एक पिशवी लटकलेली होती. ती तळाशी ओलसर दिसत होती आणि त्यातूनच तो ठिपका पडला होता.

झटक्यात मांडीवरचे कपडे दूर ढकलून ती ऊभी राहिली न् लांब जाऊन भयचकित नजरेने त्या पिशवीकडे पाहू लागली. ती हलत नाहीये किंवा त्यातून कुठलंही भूत बाहेर येत नाहीये याची खात्री पटल्यावर आधी तिने जाऊन हात खसाखसा धुतले. जरा बाहेर जाऊन निवांत बसली.

हे काम आपल्याला एकटीलाच निपटावे लागणार अशी मनाची तयारी करून, परत एकदा सगळं धैर्य एकवटून ती खोलीत आली. ती पिशवी हुकावरून अलगद सोडवून, ऊघडून न पाहता, ती जराही हलू न देता (जणू त्यात कधीही फुटू पहाणारा बाँबच आहे अशा) सावधगिरीने तिने बाल्कनीत ठेवली आणि बाल्कनीचं दार लावून घेतलं.

कपाटाची स्वच्छता न आवराआवर करून एकदाची ती बाल्कनीत आली. बराच काळ त्या पिशवीकडे एकटक पाहिल्यावर शेवटी मनाचा हिय्या करून तिने शक्यतो बोटाच्या फक्त टोकांनी ती पिशवी ऊचलली आणि सगळं धैर्य एकवटून ती ऊघडून आत डोकावली.
.
.
.
.
.
.
.
कधीकाळी भाजी आणायला ती पिशवी वापरली होती. गडबडीत एक टोमैटो तसाच राहिला होता न् त्यावर पांढरी बुरशी वगैरे येऊन पार सडून तो गळायला लागला होता.
तिला आतूनच वाकुल्या दाखवत होता.