🧠 मनोवेध 🧠

🎯 सुप्त मनातील विचार

आपल्या शरीरात सतत काहीतरी घडत असते. आतडी हालचाल करीत असतात, हृदयाची गती कमीजास्त होत असते. आपल्या जागृत मनाला हे काहीच जाणवत नसते. मेंदूचा एक भाग ‘अमायग्डला’ मात्र हे सतत जाणत असते. शरीरातील या संवेदना सुप्त मनाचा भाग आहेत असे आपण म्हणू शकतो. भावना निर्माण होतात त्या वेळी शरीरात बदल होतात. त्यामुळे या संवेदना अधिक तीव्र होतात. असे असून देखील भीती वगळता अन्य भावनांच्या संवेदना आपल्याला फारशा जाणवत नाहीत. याचे कारण या संवेदनांची जाणीव आपल्या जागृत मनाला करून देणारा इन्सुला नावाचा मेंदूतील भाग सक्रिय नसतो. आपण शरीरावर लक्ष देऊन संवेदना जाणण्याचा सराव करतो त्यामुळे हा इन्सुला सक्रिय होतो. मग काम, क्रोध, भय या भावनांच्या संवेदना जाणवू लागतात. त्यांचा स्वीकार करू लागलो की या भावनांची तीव्रता कमी होते.

सिग्मंड फ्रॉइड यांनी सुप्त मन हा शब्द वापरला त्यावेळी त्यांनी हा संवेदनांचा अनुभव घेतला होता का हे माहीत नाही. मात्र माणसाच्या कामवासना सुप्तमनात दडपलेल्या असतात आणि त्यांचा विपरीत परिणाम म्हणून मानसिक त्रास होतात. या त्यांच्या सिद्धांताला त्याकाळी खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. शैशवावस्थेत मुलीला पित्याविषयी आणि मुलाला मातेविषयी लैंगिक आकर्षण असते हा त्यांचा सिद्धान्त संशोधनात खरा ठरला नाही, त्यांच्या अनेक शिष्यांनी तो अमान्य केला. जीवसातत्य आणि वंशसातत्य या नैसर्गिक मूळ प्रेरणांचा परिणाम म्हणून भीती, राग आणि कामभाव या आदिम भावना जन्म घेत असतात. फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार या सुप्तमनातील ‘इड’ चा भाग असतात. कामभाव मनात येणे हे पाप आहे असे ‘सुपरइगो’ सांगत असेल तर या संघर्षांतून मानसिक विकार होतात. सध्या तुलनेने मोकळे वातावरण असूनही मनात लैंगिक विचार येतात म्हणून स्वत:ची घृणा करणारी पौगंडावस्थेतील मुले आढळतात. त्यामुळे दीडशे वर्षांपूर्वी हे प्रमाण अधिक असू शकते. मनातील विचारांशी आपण झगडतो, त्यांना नाकारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्यांना अधिक महत्त्व देत असतो. त्याऐवजी असे विचार येणे हा निसर्ग आहे ‘ऑल थॉटस् आर ओके, ऑल बिहेविअर इज नॉट ओके’ हे समजून घेतले तर घृणा कमी होते. मनातील विचार साक्षीभावाने पाहू लागलो की हे शक्य होते.