स्मार्ट फोन

#पुणे
#शिक्षणाचेमाहेरघर
#कृतज्ञता

सध्याचा हॉट टॉपिक म्हणजे शाळेत फोन न्यायला परवानगी असणे. तसा हा विषय अगदी नवीन नाही, पूर्वीही शाळेत फोन, विशेषतः स्मार्ट फोन नेऊन मुलांनी अनेक उद्योग केल्याची उदाहरणे घडलेली आहेत. लॉक डाऊन काळात मात्र स्मार्ट फोनवर अवलंबून असणे अपरिहार्य झाले. आता शाळा, क्लास, इतर रुटीन नियमित सुरू झाले, पण फोनची सवय काही सुटत नाही. मुलांचं शाळेत फोन आणण्याचं, गरज नसताना तो वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याचं प्रमाण वाढत आहे. पालकही सोयीसाठी म्हणून मुलांना शाळेत फोन नेऊ देतात. त्याची वेगवेगळी कारणं सांगतात. ती कदाचित पालकांच्या बाजूने योग्यही असतील. काही मुलं पालकांच्या नकळत फोन आणतात. पण मुलांना अजून परिणामांचे गांभीर्य कळले आहे असे वाटत नाही.

स्मार्ट फोन असावा की नसावा, तो मुलांनी वापरावा की न वापरावा हा विषय आता राहिलेला नाही, तो आहे, मुलं वापरणार ही वस्तुस्थिती आहे.
काळजीची गोष्ट ही आहे, की तो शाळेतही वापरणं हा मुलांना हक्क वाटतो आहे. यात सर्वस्वी मुलांना दोष देता येणार नाही. पालक, समाज, शिक्षक, शिक्षणसंस्था सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

कोणतीच शाळा शाळेच्या आवारात, परिसरात मुलांना फोन वापरायला अनेक कारणांनी परवानगी देत नाही. तरीही लपून छपून फोनचा वापर सुरू असतो. मग ज्याचे असे वागणे लक्षात येते त्याचा फोन काढून घेतला जातो. त्याचे समर्थन असते, सगळी मुलं आणतात, मग मी पण आणतो. त्यांचे का नाही काढून घेत?

फोन हे केवळ एक उदाहरण झाले. अनेक बाबतीत शाळेच्या आवारात मुलांचे बेफिकीर वागणे वाढत आहे. दार/ गेट पायाने ढकलून, लाथ मारून उघडणे, बंद करणे/ लाईट, फॅनची बटणे फटाफट चालू बंद करणे, शाळेतले फर्निचर, प्रयोगशाळेतले साहित्य निष्काळजीपणाने हाताळणे, वर्गात, बेंचच्या खाली कचरा करणे, भिंती खराब करणे अशी कितीतरी उदाहरणे…. आणि मुलांना त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. पूर्वीसारखे मुलांनी मान खाली घालून ऐकून घेण्याचे दिवस राहिले नसले तरी विद्यार्थी म्हणून घडताना, भावी नागरिक म्हणून घडताना शाळेच्या नियमांचे पालन करणे, शिस्तीच्या सवयी मुलांना असणे आवश्यक आहे.

अशा वेळी मुलांवर आरडा ओरडा न करता, दोषारोप न करता, कोणतीही शेरेबाजी न करताना अतिशय संयमाने, विश्वासात घेऊन बोलावे लागते.
मी माझ्या अनुभवानुसार काही प्रश्न मुलांना विचारते.

तुम्ही शाळेत का जाता?
तुमची शाळा कोणी सुरू केली?
शाळेचे ब्रीद वाक्य काय?

सुरुवातीला याचा संदर्भ मुलांना समजत नाही. अशा वेळी पुण्याचा शैक्षणिक इतिहास मुलांना सांगावा लागतो.

पुण्याला पूर्वेकडचे ऑक्सफर्ड म्हणतात. आज नावाजल्या जाणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था मुख्यतः भारताच्या पारतंत्र्याच्या काळात सुरू झाल्या. समाजाच्या सहकार्याने सुरू झाल्या. कोणी जागा दिल्या, कोणी देणग्या दिल्या, कोणी विना मोबदला तर कोणी अत्यल्प मोबदला घेऊन तिथे शिकवले. मदत करणारे सगळेच काही उत्तम आर्थिक स्थितीत नव्हते. काही जण स्वतः अर्धपोटी राहून ही मदत करत होते. काही जण शिकणाऱ्या मुलांना घरी वार लावून जेवायला घालून मदत करत होते आणि आपापल्या परीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत होते. सर्व जाती धर्माच्या लोकांचा यात सहभाग होता. ध्येय एकच ही मुले चांगली शिकून मोठी झाली पाहिजेत.

परगावातून येणारे, शिक्षणासाठी घरची आर्थिक मदत नसलेले, आई वडिलांचे, इतर नातेवाईकांचे छत्र नसलेले विद्यार्थी पुणे विद्यार्थीगृहात राहून, इतरांच्या घरी वाराने जेवून आपले शिक्षण पूर्ण करत होते. नोकऱ्या मिळवून कुटुंबाची जबाबदारी उचलत होते. एकुणात प्रतिकूल परिस्थितीशी सगळेच झगडत होते.

अर्थात पूर्वीच्या काळी प्रत्येक गावात शिक्षणसंस्था अशाच उभ्या राहिल्या आहेत. पण सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था एकाच ठिकाणी आहेत हे मात्र पुण्यातच आहे.

अशा पुण्यात अनेक व्यक्तींच्या दानशूरतेमुळे, निःस्वार्थी कामामुळे, ध्येयासाठी झपाटून जाऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे अनेक शाळा, महाविद्यालये, कृषी, संशोधन, गायन, वादन, नृत्य, नाट्य, संरक्षण, चित्रपट, चित्र, शिल्प, अर्थकारण, राजकारण, फॅशन, हॉटेल मॅनेजमेंट, क्रीडा, नेतृत्व, पत्रकारिता आणि इतरही अनेक क्षेत्रातले शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण झाल्या, टिकल्या आणि वाढल्या. सगळ्यांनाच आर्थिक चणचण होती असे नाही, असं वागायला त्यांना कुणी सांगितलं नव्हतं. त्यांचे ते सुखात, आरामात राहूच शकले असते. पण ध्येयाने झपाटून स्वतः शिकण्याची, काम करण्याची सर्वांची वृत्ती होती. त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या त्यामुळे, त्यांच्या अथक परिश्रमांमुळे, आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आधुनिक सोयी मिळाव्यात, त्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावे, एक उत्तम माणूस, नागरिक घडावा या त्यांच्या ध्यासामुळे अनेक उत्तमोत्तम सुविधा आजच्या विद्यार्थ्यांना मिळताहेत.

पूर्वीच्या पुण्यात प्रत्येक घरात शिक्षण क्षेत्राशी/ संस्थेशी संबंधित एकतरी व्यक्ती होती असे म्हणले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

अशा पुण्यात राहून तुम्हाला शिकायला मिळते हे तुमचे भाग्य आहे हे मुलांना सांगावे लागते.

पूर्वी विद्यार्थी अर्धपोटी राहिले, वार लावून जेवले म्हणजे आताच्या मुलांनी तसे वागावे असे नक्कीच नाही. पण आपण जिथे शिकतो, ती वास्तू, संस्था काही लोकांच्या निःस्वार्थी वागण्यामुळे, त्यागामुळे उभी राहिली आहे, आणि त्यांच्या अफाट कष्टांमुळे आजच्या सुविधा आपल्याला मिळताहेत हे नक्कीच लक्षात ठेवावे आणि आपल्या बेफिकीर वागण्याला आवर घालावा! इतके मोठे वय त्यांचे नक्कीच आहे!

इतके सगळे ऐकल्यावर फोन ही गरज आहे, सोय आहे की चैन आहे असे विचारल्यावर मुलं किमान अंतर्मुख होतात. पुढचे ठरवणे त्यांच्याच हातात!! आपण अधून मधून आठवण करून देत रहायचे!!!

ज्योती केमकर
शिक्षिका, शालेय मानस तज्ज्ञ, करिअर काऊन्सेलर
पुणे