Back to Top

Category: वाचन कट्टा

प्रश्नपत्रिका

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

“शब्दांचे अर्थ लिहा” म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

“समानार्थी, विरुद्धार्थी शब्द”,
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

“गाळलेल्या जागा भरा”,
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या “जोड्या जुळवा”,
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

“एका वाक्यातल्या उत्तरा”नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी…उत्तराची वाट बघत..

“संदर्भासहीत स्पष्टीकरण” लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

“कवितेच्या ओळी पुर्ण” करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

“निबंध लिहा”, किंवा “गोष्टं लिहा”,
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं “option” ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली…
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

गाथा बलिदानाची 1

गाथा बलिदानाची

महामानव बाबा आमटे
(मुरलीधर देवीदास आमटे)

जन्म : 26 दिसम्बर 1914
हिंगनघाट, वर्धा,ब्रिटिश भारत
(वर्तमान में महाराष्ट्र, भारत)

मृत्यु : 9 फ़रवरी 2008
(वय 94)
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयता : भारतीय
पत्नी : साधना आमटे
अपत्ये : डॉ. विकास आमटे
डॉ. प्रकाश आमटे

मुरलीधर देविदास आमटे यांनाच लोक बाबा आमटे म्हणून ओळखतात. हे महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र असून भारतातील सामाजिक कार्यकर्ता होते. विशेषतः कुष्ठरोग्यांची सेवा व गोरगरीबांची व्यथा ऐकुन त्यांना मदतीचा हात देणारे एक थोर सक्रीय सामाजिक कार्यकर्ता होते. गरीबांच्या कल्याणा साठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली.

💁‍♂ समाजसेवी बाबा आमटे यांचे जीवनचरीत्र

बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.

गरीबांचे दुःख त्यांना असहय व्हायचे. परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे, वयाच्या 14 व्या वर्षी वडीलांनी त्यांना एक बंदुक भेट दिली होती. त्या बंदूकीने बाबा छोटया मोठया जंगली प्राण्यांची शिकार करायचे, जेव्हा ते 18 वर्षाचे झाले त्यांना वडीलांनी एक अॅम्बेसिडर गाडी भेट दिली होती. त्यांना निच्च जातींच्या मूलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नाही. स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायदयाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हां वर्ध्यात सेवाग्राम येथे आले होते तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात याचा फार प्रभाव पडला. पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग दर्शवीला.

त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्विकार केला व खादी कपडेच घालायचे ठरविले. अनेक नेत्यांच्या तुरूंगवासा दरम्यान त्यांची कायदयाची बाजू बाबा सांभाळत. गांधीजींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले होते.

त्याकाळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता. अनेक लोक या रोगामुळे बाधीत झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासुनच नाही तर त्याचे कुटूंबही कुष्ठ रोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती, समाजात त्यांना फारच हिन भावनेचा सामना करावा लागत होता.

बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी 15 आॅगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.

1973 साली गडचिरोली जिल्हयातील माडिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला.

बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासुन रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.
त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलनातही सहभाग घेतला. त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानीत केले.

परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदु घुले ज्यांना ते साधना असे म्हणत त्यांनी फार सोबत केली. नेहमी त्या बाबांच्या पाठीशी राहील्या. त्यांचे दोन मुलं आहेत डाॅ. विकास आमटे व डाॅ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या व्यवसायातुन मोलाचा वेळ काढुन बाबांना मदत केली. बाबांच्या दोन्ही सुना डाॅ. मंदाकिनी आणि डाॅ. भारती हया देखील बाबांच्या कार्यात सहभागी आहेत. डाॅ. प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डाॅ. मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा गावात माडिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हाॅस्पीटल चालवतात.

डाॅ.मंदाकिनी यांनी सरकारी नौकरी सोडून डाॅ. प्रकाश आमटे यांच्या सोबत हेमलकसा येथे स्थायीक झाल्या त्या गोरगरीबांची व जखमी जनावरांची सेवा करतात.

त्यांचे दोन मुले आहेत दिगंत जो डाॅक्टर असुन हेमलकसा येथेच काम करतो दुसरा मुलगा अनिकेत जो एक इंजिनियर आहे ज्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे. 2008 रोजी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना सामाजिक कार्यासाठी मॅगसेसे अवाॅर्ड मिळाला आहे.

बाबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हाॅस्पीटल ची जवाबदारी सांभाळतात.

वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हाॅस्पीटल आहे. तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एक अनाथाश्रम आणि अंध व गोर गरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वसंचालीत आनंदवन आश्रमात जवळपास 5000 लोक राहतात.

महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते.

🎖 पद्मश्री बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार सन् 1971
रमण मॅगसेसे पुरस्कार 1985
पद्म विभूषण 1986
मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार 1988
गांधी शांती पुरस्कार 1999
राष्ट्रीय भूषण 1978
जमनालाल बजाज अवार्ड 1979
एन.डी. दीवान अवाॅर्ड 1980
रामशास्त्री अवार्ड 1993 ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड 1985
राजा राममोहन राॅय अवार्ड 1986 दिल्ली सरकार
फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड 1987
जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड 1987
आदिवासी सेवक अवार्ड 1991 भारत सरकार
मानव सेवा अवार्ड 1997 यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
सारथी अवाॅर्ड 1997 नागपुर
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड 1997 नागपुर
कुमार गंधर्व पुरस्कार 1998
सावित्रीबाई फुले अवाॅर्ड 1998 भारत सरकार
फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर आॅफ काॅमर्स अॅंण्ड इंडस्ट्रिी अवार्ड 1988
आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार 1998
महाराष्ट्र भुषण अवार्ड 2004 महाराष्ट्र सरकार

🏵 सन्मानीत पदव्या

डी.लिट – टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
डी.लिट – 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
डी लिट – 1985 – 86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
देसिकोत्तमा 1988 – सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, भारत

💎 बाबा आमटे यांचे सुविचार

“मी एक महान नेता बनण्यासाठी काम करीत नाही तर मी गरजु गोरगरीबांची मदत करू ईच्छितो.”
– बाबा आमटे

“या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात, असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत.”
– बाबा आमटे

बाबा आमटे यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले त्यांची आदिवासींविषयी आदरभाव व उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते त्यांचे कुष्ठरोगींसाठीचे कार्य जागतीक आरोग्य संघटनेव्दाराही प्रशंसीत आहे. संयुक्तराष्ट्राच्या आरोग्य संघटनेत बाबा आमटेंविषयी एक छोटा लघुपट दाखवण्यात आला होता. जी आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र पुत्र असल्यामुळे आपण सर्व महाराष्ट्रीयांसाठी ते प्रेरणेचे सागर आहेत.

दोन चोरांची गोष्ट

दोन चोरांची गोष्ट

चोर १ –

अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.

एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं .

चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.

त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला!

वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.

लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.
मुलाखत खुप रंगली,

मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”

“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.

“हो, हो!” एकच गलका झाला.

“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.”

सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.

“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

चोर २ –

१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला.

कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!

नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,

शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले.

ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.

पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले.

कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.

तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले.

विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा.

तात्पर्य

– आपली अंगभुत कला न
ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.

– ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.

– ती व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.

– तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही.

– आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.

स्वतः मधील टॅलेंट ओळखा

समिधा

समिधा

सकाळी फिरायला निघालो होतो. बरोबर कोणीही नव्हतं. मला अनेकवेळा ही परिस्थिती आवडते. एकटा असलो म्हणजे आजूबाजूला बघत, वेगवेगळ्या गोष्टींची मनाशी नोंद करत जाता येतं. अनेक आवाज, वाद, संवाद कानावर पडतात. एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. आता ही गुरुजी मंडळी सुद्धा खूप ‘हायटेक’ झाली आहेत. गाड्या वापरतात, मोबाईल वापरतात, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी उत्तम उपयोग करून घेतात. पण व्यावसायिक गप्पा त्याच विषयाभोवती फिरतात. तर त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते की, ‘अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं…’

बस्स एव्हढंच? ह्या पलीकडे त्या समिधांच्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही. खरं तर ह्या अशा अनेक समिधा आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत. विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं.

पहिलीच आठवली ती उर्मिला. लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला. रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं. पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तेही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही. मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका समिधेची आहुती अशीच पडून गेली.

मग आठवतात त्या काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी. शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन, सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण बाकीच्या पाच? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? अफझलखान येतोय म्हणल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हणल्यावर यांचा जीवही सैरभैर झाला नसेल? निश्चितच झाला असणार. पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच समिधा तशाच जळून गेल्या.

बहुतेक सर्व समिधा ह्या स्त्रियाच. कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू. गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला, आनंदीबाईला, डॉक्टर करण्यासाठी स्वतः समिधा झाला. काही थोड्याफार समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या. पण बाकीच्या? टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. या आणि अशा अनेक.

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या समिधेनं दार उघडलं. मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं चोवीस वर्षांचं यशस्वी करीअर सहजपणे सोडून देणाऱ्या त्या समिधेला पाहून मला एकदम भरून आलं. घरोघरी अशा समिधा रोज आहुती देत असतात. घर उभं धरत असतात, सावरत असतात. माझं घर हा काही अपवाद नव्हे. मात्र यापुढे या समिधांची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे.

आज नव्या वर्षाच्या, नव्या दशकाच्या आव्हानांना भिडण्याची तयारी करताना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या समिधेला एक सलाम तो ‘बनता है….’