दोन मुले दूरच्या प्रवासाला निघाली. एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चव्वड बांधून दिली. तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याचे सर्व साहित्य दिले. आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता.
दोन-तीन दिवस ज्याची तयार शिदोरी होती तो मजेत होता. पण काही दिवसच. पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली. तसतसा त्याचा आनंदही कमी होत गेला. दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खात होता. मजेत, आनंदात प्रवास करत होता. तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणं म्हणजे शिक्षण होय.
संपत्ती गोळा करताना हा विचार अवश्य करा की आपल्या मुलांना आयतं काही देण्यापेक्षा, त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवुन समाज आणि देशाच्या कार्यासाठी कसे उपयोगात आणू शकतील. ह्याने देश,समाज आणि आपल्या मुलांचाही विकास होईल.