कंटोळी (कर्टुल) – रानभाजी
माहिती:
पावसाळयातील पालेभाज्या आणि फुलभाज्यांनंतर ही एक फळभाजी आहे. पावसाळा सुरू झाल्यावर जुन्या वेलीच्या मुळाच्या गाठीपासून किंवा बिया रूजून ह्या वेलींना फुटवा फुटतो. त्याची झपाटय़ाने वाढ होऊन पाच ते सहा पानांवर असतानाच जंगलांत सर्वत्र हया जमिनीलगत वाढलेल्या वेलींवर पिवळी फुले दिसू लागतात. बारा-पंधरा दिवसातर कंटोली धरतात. कंटोळी फळांची भाजी खूपच लोकप्रिय आहे. फळे साधारणत: पाच ते सात से.मी. लांबीची असतात. आकाराने लांबट-गोल असतात व त्यावर मऊ काटे असतात. फळात बीया भरपूर असतात. कोवळ्या फळांची भाजीच चांगली होते. भाजी रूचकर असते पण चिकट असते. विविध प्रकारांनी ही भाजी केली जाते. कारल्याच्या वर्गातील असल्याने औषधात त्याचे कडू गुणधर्म असून ते जठरोतेजक व सारक आहेत.