पालकसभा म्हंटलं की , इतर पालकांना भीती वाटते पण अन्वयच्या शाळेची पालकसभा असली की आम्हाला उत्साह येतो. कारण आमच्या पालकसभेत आम्ही मुलांसारखे खेळ खेळतो , सोबत गातो आणि नाचतो सुद्धा ! प्रत्येक पालकाला परत एकदा मूल होण्याची संधी देणारी आणि त्यातून आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी तयार करणारी ही आगळी वेगळी पालकसभा आणि तशीच आगळी वेगळी अन्वयची शाळा – डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा , गोरेगाव . – मराठी माध्यम .
या पालकसभेत आम्हा सर्वांसाठी वेगवेगळ्या वर्गात खेळ मांडून ठेवले होते. जे मुलं रोज करतात ते आम्हाला करायचं होतं . आम्ही इंग्रजीचे शब्द बनवले , सोंगट्या वापरून गणितं सोडवली , घुंगरू घालून नाचलो , मातीकाम केलं , टायरमधून उड्या मारल्या , भोवरा – दोरीच्या उडया , ठोकळे रचणे , चित्र काढणे .. अशी सगळी धम्माल केली. शाळेत असताना करायचो तसा टवाळपणा पण केला. काही गोष्टी करायचा कंटाळा पण केला . आणि मग मनाशीच आपण मुलांकडून सगळं शिस्तीने झालं पाहिजे अश्या अपेक्षा करतो त्याचा विचार ही केला.
या पालकसभेत सर्व पालकांना पाव किलो गवारीची भाजी घेऊन बोलावलं होतं . नवरा बायकोने मिळून गवार निवडायची असा एक टास्क होता – त्यातून घरी कोण किती काम करतं . मुलांकडे लक्ष देणं ही फक्त आईचीच जबाबदारी आहे का ? यासारख्या खूप महत्वाच्या गप्पा पण झाल्या.
अश्या पालकसभा पालक म्हणून खूप आनंद देऊन जातात . आपलं मूल एका छान शाळेत जातंय . तिथे ते फक्त रट्टा मारण्यासाठी तयार न होता माणूस म्हणून वाढणार आहे हा विश्वास वाटतो . सर्व मुलांना अशी आनंदी शाळा मिळो आणि सगळ्या पालकांना अश्या नाचता गाता येणाऱ्या पालकसभा मिळोत !