कोव्हीड काळात मुलांचे नुकसान झाले का?
कोव्हीड काळात मुलांच्या शिक्षणाची प्रक्रिया बदलली होती. मात्र आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी कोव्हीड च्या आधीचीच शिकण्याची प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे.
कोविडच्या आधीची प्रक्रिया राबवताना, कोविड काळात मुलं खरंच शिकली का? हे मात्र कोव्हीडच्या आधीची मूल्यमापनाची पद्धत वापरून, परिमाणे वापरून तपासले जात आहेत!
कोव्हीड काळात जर आपण शिक्षणाची प्रक्रियाच बदलली होती तर जुनी परिमाणे जसं की पाढे येतात का? वाचन येते का? विज्ञानाचे प्रयोग करता येतात का? लावून त्या मुलाची गुणवत्ता कशी तपासता येईल? अशा प्रकारे गुणवत्ता तपासून आणि सारखं “कोव्हीड काळात मुलांच्या शिक्षणाचं फार नुकसान झालं हो” अशी वाक्य फेकून त्या मुलांचा शिकण्याविषयाचा आत्मविश्वास आपण कसा वाढवू शकू?
सगळ्यात आधी तर कोव्हीड काळात मूल आणि आपण स्वतः सहीसलामत बाहेर पडलो म्हणून समाधान मानले पाहिजे. त्यानंतर कोव्हीड आल्यानंतर घरात बसून राहणे, सतत नकारात्मक बातम्या ऐकणे, सतत अस्थिर व बेभरवशाची परिस्थिती अनुभवाने, ऑनलाईन शिक्षणाची सवय लावून घेणे, कुटुंबात प्रथमच एवढ्या माणसांचा एकत्र सहवास अनुभवणे, मास्क, सॅनिटायझर वापरून, व्यायाम करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, घरात कुणी आजारी पडले तर स्वतःची आणि त्यांची काळजी घेणे, अशा कितीतरी गोष्टी ज्या मुलांनी कधीच केल्या नव्हत्या त्या एवढ्या लहान वयात केल्याचं ना?
या गोष्टींचे मूल्यमापन तुम्ही कसे करणार?
मुलांनी कोव्हीड काळात स्वतःमध्ये केलेल्या या बदलांकडे डोळसपणे बघितलं तर “मुलांचे खूप नुकसान झाले हो” असं न म्हणता “मुलं कोणत्याही परिस्थितीला, बदलांना सामोरे जायला किती छान प्रकारे शिकली हो” असं कुणीही म्हणेल.
जर मुलं बदलांना सामोरे जायला शिकली असतील, त्यांची मानसिक जडणघडण ही बदल स्वीकारण्यासाठी पोषक झाली असेल तर आता पुन्हा “नॉर्मल” होणारा बदल, मुलं सहज स्वीकारणार आहेत. याची खात्री आपल्याला असली पाहिजे.
त्यामुळे मुलांशी बोलताना, तुला हे येत नाही, ते येत नाही, तुझं किती नुकसान झालं असं पालुपद न लावता, “अरे तू एवढ्या कठीण आणि अनोळखी परिस्थितीत मनापासून प्रयत्न करून, एवढ्या सहज तरून गेलास तर ही आत्ताची परिस्थिती तर तू सहज हाताळशील आणि गंमत म्हणजे ही परिस्थिती तर आधीपासून तुझ्या ओळखीची आहे, त्यामुळे तू अगदी मस्त स्वीकारशील. थोडा वेळ लागेल पण हरकत नाही आम्ही तुझ्या बरोबर आहेत” असं आपण म्हणू शकत नाही?
मूल्यमापन हे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असावं त्यांना खच्ची करण्यासाठी नाही, एवढी सोपी गोष्ट जर आपण समजून घेतली तर मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल आपण घडवून आणू.
चेतन एरंडे.