#learningdisability
#remedialteaching
#studyskills

अध्ययन अक्षमता – खरी आणि फसवी…

या लेखातील प्रत्येक शब्द एक शालेय मानस तज्ञ आणि शिक्षिका म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि पुरेसे अनुभव घेऊन झाल्यावर लिहीत आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुलांच्या अभ्यास विषयक विशेषतः मार्क विषयक समस्या घेऊन समुपदेशनासाठी येणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या तक्रारी साधारण अशा असतात.

* खूपदा सांगितलं अभ्यास कर.. अभ्यास कर..तरी ऐकतच नाही…

* सारखं मागे लागावं लागतं अभ्यासासाठी

*चौथी – पाचवी पर्यंत हा खूप हुशार होता, चांगले मार्क आणायचा, पण गेल्या एक दोन वर्षांत मार्क खूप कमी पडतात.

*हुशार आहे पण अभ्यासाचा कंटाळा

*गणिताची भीती

*याला लर्निंग disability आहे.

*याला ADHD आहे.

*तोंडी सगळं सांगतो पण लिहायचं म्हणलं की ×××

एक आई आपलं पाच वर्षांचं मूल शाळेत कशातच चमकत नाही म्हणून खूप दुःखी होऊन आली होती, तर दुसरीला आपल्या 3 वर्षांच्या मुलाला ज्युनियर केजी ला ट्युशन लावायची होती.

या पालकांचा बहुधा भर मुलांचे समुपदेशन करा असाच असतो.
समुपदेशकाकडे आल्यावर जादूची कांडी फिरेल आणि मूल अचानक शहाणं होऊन अभ्यासाला लागेल आणि महत्वाचं म्हणजे चांगले मार्क आणेल अशा भाबड्या आशेने येतात, तेव्हा खूप वाईट वाटतं.

एक तर समुपदेशन म्हणजे जादू नाही. बाळाच्या जडण घडणीवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. पहिल्या सत्रात पालकांना अगदी बाळाच्या जन्माच्या वेळेपासूनची हिस्ट्री विचारावी लागते. घरात बोलली जाणारी भाषा, कुटुंबातले सदस्य, त्यांची परस्परांशी नाती, आर्थिक परिस्थिती, घराभोवतीचा परिसर, बाळाची झोप, आहार अशा किती तरी गोष्टी विचाराव्या लागतात.

तुम्हाला समस्या जाणवते तर अध्ययन अक्षमता, ADHD च्या काही टेस्ट केल्या का असे विचारले तर अशी टेस्ट असते हेच कितीकांना माहीत नसते, ऐकीव माहितीवर आधारित, इतर कोणीतरी बोलले म्हणून स्वतःच ठरवून टाकतात की आपल्या मुलाला हे अमुक अमुक आहे. काही पालकांनी बाळाच्या अगदी लहानपणी ही टेस्ट केलेली असते, अगदी कधी केली तेही त्यांना आठवत नसते. टेस्ट करून त्यावर काही उपाय केलेले नसतात, मग मूल 12,13 वर्षांचे होऊन अभ्यासात मागे पडायला लागले की त्यांना counselor ची आठवण होते.

त्यात तारे जमीपर सारखे चित्रपट आले की त्यातल्या ईशान मध्ये पालकांना आपलेच मूल दिसायला लागते, पालक सांगताना पण तसेच सांगतात की हा अगदी त्या तारे जमीपर मधल्या ईशान सारखा आहे.

मुलांशी बोलल्यावर तर काही वेळा अनेक प्रकारची धक्कादायक माहिती समोर येते.

शाळा आणि एकापाठोपाठ असलेले क्लास यात होणारी दमछाक, घरात सतत वादावादी, मुलांना अभ्यासासाठी जागा नसणे, शाळेच्या सूचनांकडे पालकांचे दुर्लक्ष, मार्कांसाठी होणाऱ्या शिक्षा अशा किती तरी गोष्टी समोर येतात.

अशा सर्व पालकांबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून त्यांना हे सांगावे लागते की

अध्ययन अक्षमता, ADHD किंवा कोणतीही disability या पूर्णतः शास्त्रीय terms आहेत. काही मुलांमध्ये खरोखर अशा disabilities असतात. त्यासाठी तज्ञांनी टेस्टिंग करून शिक्कामोर्तब केलेले असले पाहिजे. अशा disabilities ची रेंज मोठी आहे. एकाचा उपाय दुसऱ्याला लागू पडेलच असे नाही. काही वेळा मेडिकेशनची गरज असू शकते. त्याचे तज्ञ डॉक्टर वेगळे असतात. तर अभ्यासासाठी सातत्याने उपचारात्मक अध्यापनाची सत्रे घ्यावी लागतात, पेशन्स लागतो, अपेक्षित परिणाम दिसतोच असे नाही.
काही पालक मनापासून ऐकून घेतात, खरे बोलतात, सहकार्य करतात, तर काही उडवाउडवीची उत्तरे देतात. तर काही पुन्हा येतच नाहीत.

दुसरी बाजू म्हणजे मुलांना काहीही प्रॉब्लेम नसतो, म्हणजे कोणतीही अक्षमता नसते. तर लहानपणी योग्य शैक्षणिक वातावरण, अनुभव न मिळणे, खेळायच्या वयात फार लवकर लेखन वाचन सुरू होणे, पालकांनी अभ्यासासाठी सारखे मागे लागणे, पालकांनीच सतत मुलांना बाहेर फिरायला नेणे, त्यामुळे घरचा अभ्यास झाला नाही तर मुलांना खोटे बोलायला शिकवणे यामुळे मुलांचा अभ्यासातला रस संपतो आणि अभ्यास कौशल्यांचा, अभ्यास करायच्या क्षमतांचाच विकास होत नाही आणि बुद्धिमान असून कोणतीही अक्षमता नसताना मूल अभ्यासात मागे पडते.

काही पालक स्वतःच comfort झोन सोडायला तयार नसतात आणि दहावीच्या परीक्षेतून मुलाला सूट मिळावी म्हणून मुलांना काहीही प्रॉब्लेम नसताना ससून मधून disability सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करतात.

या सगळ्यात अतिशय संवेदनशील आणि नेमकी समस्या समजून सहकार्य करणारे पालकही भेटतात, पण थोडेच!!

गेल्या काही वर्षांपासून मुलांना फार लहान वयात शाळेत घातले जात आहे. त्याची कारणंही खूप वेगवेगळी. कधी आयांना दोन अडीच तास मोकळीक हवी असते, कधी इतर पालकांचंच peer pressure – सगळ्यांची मुलं जातात म्हणून, कधी घरातलं एकुलतं एक मूल बरोबरीच्या मुलांमध्ये मिसळायला शिकावं म्हणून, कधी मुलाचे उपद्व्याप घरात आवरेनासे होतात म्हणून..अशी पुष्कळ कारणे…

पूर्वप्राथमिक – बालवाडी शाळेतल्या शिक्षिका सुजाण असतील तर मुलं सुदैवी.. पंचेंद्रियांना समृद्ध करणारे अनेक अनुभव तिथे मिळतात. मुलं सूचना ऐकायला, पाळायला, संवाद साधायला शिकतात. पण असे नसेल तर आनंद…
काही अपवाद वगळता लेखन, वाचन, क्लासवर्क, होमवर्क, ऍक्टिव्हिटी, प्रोजेक्ट या चक्रात मुलं जी अडकतात ती अडकतातच.

अगदी लहान वयात निरनिराळे रंग, आकार बघणे, आवाज ऐकणे – विशेषतः निसर्गातले, वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण करणे, गोष्टी ऐकणे, गाणी म्हणणे, वस्तूंचे उपयोग कळणे बुद्धीच्या विकासासाठी उपयोगी ठरते, तर पाण्यात – मातीत खेळणे, उड्या मारणे, धावणे, पळणे, निरनिराळ्या आकाराच्या वस्तू हाताळणे शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरते. हे सगळं मिळालं तर खूपशा फसव्या अध्ययन अक्षमता नक्कीच गायब होतील.

अजूनही पुष्कळ लिहिण्यासारखे आहे, पण लेखनसीमा!!

🙏🙏
ज्योती केमकर
शिक्षिका, शालेय मानस तज्ञ, करिअर काऊन्सेलर, पुणे