कृष्णमूर्तींनी मला अंतर्मुख केलं ते त्यांच्या शाळाविषयक एका धक्कादायक वाक्याने….शाळांविषयी ते म्हणतात, ‘‘शाळा आणि आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत की जिथे कोणीच स्वत: होऊन जात नाही, तिथे दाखल करावे लागते…’’ हे वाक्य वाचून अक्षरश: आपण हादरून जातो. अरे, हे साधर्म्य आपल्या कसं लक्षात आलं नाही अशीच आपली भावना होते. खरंच शाळेत स्वत: होऊन कुणीच कसं जात नाही… जर पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या इच्छेवर सोडलं… शाळेत येण्याचा आग्रह धरला नाही तर किती मुलं स्वत: होऊन शाळेत टिकतील…. कृष्णजींना तुरुंगाशीच थेट तुलना का करावीशी वाटली असेल…

कोणत्याही शाळेत एक अनुभव हमखास येतो… एरवी शांत असलेली शाळा जेव्हा सुटते तेव्हा प्रचंड गलका होतो आणि मुले आनंदाने ओरडू लागतात… त्यांच्या त्या उत्स्फूर्त गोंगाटाचे रहस्य काय… जेव्हा उद्या शाळेला सुटी आहे, असे शाळेत सांगितले जाते तेव्हाही टाळ्या वाजतात आणि आनंदाचे चित्कार उठतात… ही सारी लक्षणं हेच सांगतात की, शाळेत मुलांना आम्ही डांबून ठेवतो आहोत… आणि रोज शाळा सुटताना ते मुक्तीचा आनंद साजरा करतात. शाळा सुटताना त्यांचा तो गोंगाट काही काळ का होईना त्या सक्तीविरुद्धचे बंड असते. त्यातही मुलं काही ना काही कारण काढून शाळेपासून सुटका करून घेतात ती वेगळीच… एक विदेशी विदुषी म्हणते, ‘‘युद्धात जसा एखादा कुशल सेनापती शत्रूच्या तलवारीचे वार चुकवतो तशी मी बालपणी शाळा चुकवत होते’’ …. किती प्रांजळ आणि प्रातिनिधिक वर्णन आहे हे. मुळात शाळा मुलांना इतक्या नकोशा का वाटत असतील… मुलांना बागेत जायची जितकी ओढ वाटते तितकी ओढ शाळेची का वाटत नसावी? आपले बालपणीचे दिवस जिवंत केले तर वेगळे काय आठवते… स्वत: कृष्णमूर्तींच्या शाळेचे दिवस फारसे आनंददायक नव्हते. ते शिक्षकांचे फारसे प्रिय नव्हते… ते अबोल होते. अनेकदा ते घरात जुनी घड्याळे उचकत आणि पुन्हा जोडण्यात रमत. त्यात ब-याचदा त्यांची शाळाही चुकत असे किंवा तेच चुकवत असत. टागोरांचे बालपण असेच आहे. तिसरीत टागोर शाळा सोडतात.

अण्णाभाऊ साठे हे केवळ 3 दिवस शाळेत जातात आणि शिक्षकांनी मारल्याने शाळा सोडतात… पुढे साहित्यसम्राट होतात… अशा नापास मुलांनीच इतिहास घडवल्याची शेकडो उदाहरणे आहेत… याचा अर्थच असा की, शाळा या प्रतिभा फुलवण्याचे काम अपवादानेच करतात. टागोर जर आमच्या महाविद्यालयापर्यंत शिकले असते तर त्यांची प्रतिभा अशीच फुलली असती का…. असा विचार करून बघावा लागेल….
या प्रकाशात कृष्णमूर्ती म्हणतात ते पटते. आमच्या शाळा मुलांना आकर्षित करत नाहीत. त्या बालककेंद्री नाहीत. तिथली शिस्त ही आमच्या तुरुंगाची आठवण करून देते. या शिस्तीने मारहाणीने हजारो मुलांची शिक्षणातून गळती झाली आहे.

मोठ्या माणसांच्या अहंकार सुखावण्याची केंद्र म्हणजे शाळा झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही… ती मोठ्यांची गरज आहे, मुलांची नाही. औरंगजेबाने त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकले. नंतर त्यालाच बापाची दया आली. त्याने बापाला निरोप पाठवला की, तुला काय हवंय… बाप म्हणाला, ‘‘रोज काही मुलं पाठवत जा. त्यांची शाळा भरवेन. त्यांना कुराण शिकवीन…
रजनीशांचं यावरचं भाष्य फार सुंदर आहे. ते म्हणतात की, तुरुंगात गेला तरी त्याला राजाच व्हायचं होतं. त्याला रोज मुलांचा दरबार भरवून राजेपणाचा गेलेला आनंद मिळवायचा होता. हुकूमत गाजवायची होती… या मोठ्या माणसांना आपल्या अहंकार सुखावण्यासाठी, हुकूमत गाजवण्याची शाळा ही हक्काची जागा वाटते आहे का. याचे हो किंवा नाही उत्तर न देता स्वत:ची पडताळणी करायला हवी. हे पालकांच्या बाबतीतही तितकेच खरे आहे. आमची मुले ही आमच्या अहंकारविस्ताराची, अहंकार गाजवायची ठिकाणे आहेत का हे तपासायला हवे. अशामुळे शाळांइतकीच घरंही मुलांसाठी तुरुंग बनले आहेत. स्वत:च्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन आम्हाला निरपेक्ष प्रेम करावे लागेल. प्रेम हीच घराची आणि शाळेची भाषा बनवावी लागेल. तेव्हाच शाळा आणि तुरुंगातील साहचर्य संपेल. कृष्णमूर्तींना एका वाक्यात इतकं सारं म्हणायचंय.