पालक म्हणून आम्ही…
पालकत्वाची चाहूल लागताच काही कार्यशाळा केल्या, बरीचशी पुस्तकं वाचली. उत्तम पालक होण्यासाठी जे जे करता येईल ते केलं. पालकत्व म्हणजे एक जबाबदारी! त्यात चूक होता कामा नये.
योग्य तेच मुलांपर्यंत पोहचलं पाहिजे. चांगल्या सवयी लागल्या पाहिजे इ. इ. अनेक गोष्टींचा ताण असायचा मनावर. वेळेचं व्यवस्थापन, मुलांकडून असलेल्या अपेक्षा, स्वतःकडून मुलांप्रती असलेल्या अपेक्षा या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा व त्याचा परिणाम मुलांशी बोलताना, वागताना व्हायचा.
आपल्या पालकांनी आपल्याला जसं वाढवलं तसच आपणही केलं पाहिजे असं आपसूकच मनात दडलेलं होतं आणि तेच वागणुकीतही उतरत होत. आमचे(नवरा बायकोचे)पालक वेगळे , त्यांच्या मुल वाढवण्याच्या पद्धती वेगळ्या ! यातून निरनिराळे प्रयोग मुलांवर केले जाऊ लागले व या प्रयोगादरम्यान छोटेमोठे स्फोटही(चि व चि सौ कां चे) होऊ लागले. यात कधीकधी मुलंही जखमी होऊ लागली.
हळूहळू अनुभवातून लक्षात आलं की चांगलं पालक व वाईट पालक असं काही नसतं. एखाद्या घटनेवरुन किंवा वागणुकीवरुन लगेच मुलांचं भविष्य ठरवण्यात अर्थ नाही. माणूस म्हणलं की थोडं मागेपुढे होणार. महत्त्वाच आहे तो स्वीकार! स्वतःचा व मुलांचा, जसे आहोत तसा. मुल म्हणजे माझा मालकी हक्क नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे कळलं असलं तरी जेव्हा वळलं तेव्हाच खर्या अर्थाने बदल सुरु झाले. पालकत्वातली गंमत उमगायला लागली. मुलांशी मनमोकळा संवाद साधणं सुरु झालं.
अविवेकाच्या मार्गावरुन विवेकाच्या मार्गावर वाटचाल सुरु झाली.
कितीतरी ‘च’ आपसूकच गळून पडले .
मुलांचही काही मत आहे, त्यांनाही चांगलं वाईट कळतं. निर्णय घेण्यास व त्याच्या परिणामांना पेलण्यास ते समर्थ आहेत हा विश्र्वास बाळगून या प्रवासात त्यांना हवी तेव्हा साथ देण्याइतपत शहाणपण अनुभवातून येत आहे. पालक म्हणून आमची मुलंच आम्हाला घडवत असतात. वेळोवेळी भानावर आणत असतात.
या सगळ्यात एक लक्षात आलं की मुलांसाठी त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांचा स्वीकार करता येणं, समाजात वावरताना कौतुक व टीका योग्य पद्धतीने हाताळता येणं, आत्मविश्वास असणं व स्वतःवर अमर्याद प्रेम असणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
आता हे मुलांपर्यंत पोहचवताना आधी स्वतःमध्ये त्या अनुषंगाने बदल करणं गरजेच वाटलं व तशी सुरुवातही केली. या प्रवासात येणार्या अडथळ्यांविषयीही मुलांशी बोलणं होत असतं. त्यांना स्पर्शरुपाने,नजरेने व इतर पद्धतीने त्यांच्यावर आमचं असलेलं प्रेम पोहचवत असतो. कधी पत्र लिहून तर कधी अनुभव सांगून, तर कधी मनसोक्त गप्पा मारुन त्यांच्या व आमच्या विश्र्वातल्या गंमतीजमतींची, यशापयशाची देवाणघेवाण होत असते. धडपडतो, चुकतो, चुकत चुकत शिकतो. पालकत्वाच्या ह्या प्रवासाचा मनापासून आनंद घेतो.
आपण जितकं वर्तमानकाळात जगू शकू तितकं चांगलं देऊ शकू यावर ठाम विश्वास आहे व त्यावर अंमल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पालकत्वाचं वय वाढेल तशी आणखी समजउमज वाढेल अशी अपेक्षा!
पालकत्वाच्या प्रवासाचं सार सांगायचं तर पालक म्हणून आम्ही खूप समाधानी व आनंदी आहोत.
©योगिनी गांधी