सर्जनशील पालकांच्या समूहात मागच्यावेळी एक पोस्ट वाचनात आली होती आणि त्यात लहान मुलांना खेळू द्या त्यांना अडवू नका अशा आशयाची काही पोस्ट होती. आणि त्यावर मी अगदी सहमत होतो. एक उदाहरण देखील त्यात की दिलं होतं. मुलांना खेळू द्या त्यांच्या खेळातून त्यांना काय साध्य होतंय हे त्यांनाही कळत नाही.
आमच्या येथील सहा-सात मुलामुलींनी एकत्र येऊन ग्रुप बनवला. आणि पार्टी करण्याचे नियोजन ठरवले. साधारण वयोगट त्यांनी चार ते दहा असा ठेवला होता. पार्टीसाठी येणाऱ्यांना वीस रुपये प्रवेश फी होती आणि शिवाय पालकांची परवानगीसुद्धा. प्रवेश फी भरल्याची नोंद म्हणून त्यांना एक हस्तलिखित तिकीटही दिलं होतं. त्यावर सहभागी होणाऱ्याचे नाव आणि पत्ता होता. तसेच पार्टीची एकूण वेळ आणि सही. जो हे तिकीट दाखवेल त्यालाच पार्टीत प्रवेश मिळेल. असा एकूण नियम होता.
बिल्डिंगच्या गार्डनमध्ये एक छोटेसे हाऊस टाईप उभारले आहे. ते ठिकाण मुलांनी निवडले. उन्हाळा सुरू असल्यामुळे लहान मुलांनी लिंबू सरबत करण्याचे ठरविले पण त्यांनी याबाबतीत घरच्या व्यक्तीचा सल्ला घेतला. त्यामुळे लिंबू सरबत सोडून दुसऱ्या खाऊचे प्रयोजन केले. पाच रुपयाचे वेफर्स पाकीट आणि कुरकुरे पाकीट तसेच दहा रुपयांची लीचीचा ज्यूस असलेली बॉटल. हे वीस रुपयांत बसवलं. दोन तासांच्या कार्यक्रमात हे नेमकं काय करणार आहेत कळेना. पण त्याचं हे नियोजन मला छान वाटलं.
कार्यक्रमात त्यांनी गप्पा मारल्या. छोटमोठे खेळ खेळले. त्यांचा मूळ उद्देश होता की आम्ही सगळे जण बोअर झालो आहोत म्हणून एकत्र येऊन छोट्या पार्टीचे आयोजन करू जेणेकरून आम्ही एका ठिकाणी बसून गप्पा करू वगैरे. कार्यक्रम नियोजन आणि त्याची मांडणीची जबाबदारी अक्षरा महाजनने घेतली. एका कागदावर हिशोब मांडून ते साहित्य आणलं. त्यांच्या या कार्यक्रमात आम्ही मुद्दाम सहभागी झालो नाही. जर झालो असतो तर कदाचित ते आम्हाला बघून लाजले असते किंवा त्यांनी ते थोडक्यात आटोपलं असतं. संपूर्ण कार्यक्रम संपल्यावर हिशोबाचा खर्च दाखवत कार्यक्रमाची सांगता केली.
या सगळ्यांतून मुलांना वेगळी मजा आली शिवाय अशा छोट्या पार्टीचे नियोजन आणि गणिती आकडेमोड, दुकानातील व्यवहार, वेळेचे बंधन अशा अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. शिकण्याचं हे अनोखं माध्यम चांगलं वाटलं.
© शैलेश दिनकर पाटील