धीर धरी रे……..

अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा परिसर त्यादिवशी अगदी गजबजलेला होता. एका आगळ्या वेगळ्या प्रयोगासाठी अनेक छोट्या मुलामुलींना आमंत्रित केले गेले होते. चार ते सहा वयोगटातील ही मुले आपल्या पालकांबरोबर तिथे जमली होती. प्रयोगासाठी संशोधक तयार होते. जिथे प्रयोग होणार होते, ते हाॅल, वर्ग छुप्या कॅमे-यांनी सज्ज होते. मुलांना आत बोलावले गेले. त्यांच्यासमोर छानश्या प्लेटमध्ये त्यांची आवडती मिठाई…. ‘मार्शमेलो’ ठेवली होती. सगळा बालचमू अगदी खूष! पण………
प्रयोगाची एक अट सांगण्यात आली. “जी मुले हा खाऊ 20 मिनिटे न खाता तसाच ठेवतील, त्यांना बक्षीस म्हणून दोन मार्शमेलो मिळतील!”
म्हटलं तर अट अगदी सोपी होती. पण म्हटलं तर अतिशय अवघड!! अत्यंत आवडती वस्तू समोर असूनही त्याचा आस्वाद न घेता नुसतं पहात रहायचं? कसं शक्य होईल? आणि मुलांची वयं तरी काय? चार ते सहा वर्षे! मुलांच्या हालचालींचे, हावभावांचे पूर्ण चित्रीकरण करण्यात येत होते. बरीच मुले नाही थोपवू शकली स्वतःला! काहींनी भरपूर प्रयत्न केला; पण अगदी शेवटी शेवटी त्यांचा संयम संपला. पण काहींनी, अगदी मोजक्या मुलांनी दोन मार्शमेलो मिळवले!!! जिंकले ते!!
पण, मानसशास्त्रज्ञ, संशोधक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे बरीच वर्षे या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीचा मागोवा घेतला. या सर्व मुलांच्या संपर्कात राहिले संशोधक! आणि त्यांना असे आढळून आले की, जी मुले स्वतःवर संयम ठेवू शकली, धीर धरू शकली; ती मुले पुढील आयुष्यात बाकी मुलांपेक्षा जास्त यशस्वी झाली.
या प्रयोगाने मानसशास्त्राच्या विश्वात एक वेगळा ठसा उमटवला. आजही अनेक वर्षांनंतरही ही चाचणी एक मापदंड म्हणून ओळखली जाते आणि यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून ‘स्व-संयम’ हा गुण वाखाणला जातो.
मंडळी, पाश्चात्य संस्कृतीचा उदोउदो करणारे आपण; हे मात्र विसरतो की, आपली लोकसंस्कृती कितीतरी वर्षांपूर्वी आपल्याला हेच शिकवून गेली आहे……. “धीर धरी रे धीरापोटी __असती फळे रसाळ, गोमटी!” धीर, संयम, स्वनियंत्रण हे सगळे साधारण समानार्थी शब्द म्हणायला हरकत नाही.
धीर धरणं, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करणं, वाट पाहणं; अपयश पचवून पुन्हा उसळी मारून उभं रहाणं; ही सगळी यशस्वी जीवनासाठीची नैतिक मूल्यं आहेत, असं म्हणता येईल. पण त्यासाठी मनाच्या ताकदीचा अगदी कस लागतो. या सगळ्या तत्वांमधून मनाच्या ताकदीचे अनुमान लावता येते. अर्थात ही ताकद काहीजणांना उपजत असते, तर काहीजणांना कमवावी लागते आणि ही ताकद कमावण्यासाठी बालपण आणि कुमारावस्था हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. पौगंडावस्था हा तसा परीक्षेचा काळ म्हणायला हरकत नाही.
आणि म्हणून, पालक मित्र मैत्रिणींनो, जागे व्हा! पालकत्व ही एक जागरुकतेने आणि विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे; याची जाणीव ठेवणे, हे अतिशय महत्वाचे सूत्र आहे आयुष्यातले! आपण मुलांना कसं वाढवतो आहोत, याचं आत्मपरीक्षण करा!
आजच्या instantच्या जमान्यात ‘धीर, संयम’ हे शब्दही मुलांच्या शब्दकोशातून हद्दपार व्हायला लागले आहेत. तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत त्याची पूर्तता करण्यासाठी पालकांची चढाओढ लागलेली दिसते आहे. “जेवढ्या तत्परतेने आम्ही मुलांच्या इच्छा पूर्ण करू, तेवढे आम्ही उत्कृष्ट पालक!” असा एक भ्रम आजच्या नवीन पालकपिढीत होताना दिसत आहे. न देऊ शकलेल्या वेळाची भरपाई म्हणून वस्तूंचा वर्षाव करणे, मागणीपेक्षा जास्त पुरवठा करत रहाणे आणि मुलांना काहीही कष्ट पडू नयेत, कमी पडू नये म्हणून आयुष्य वेचणारे पालक आज घरोघरी दिसत आहेत.
पण परिणामांचा विचार कधी आणि कोण करणार? आपणच आपल्या मुलांना अधू, अपंग बनवत आहोत; याची समज कधी येणार? Instant Gratification… तात्काळ इच्छापूर्तीची सवय लागलेली ही मुलं आयुष्यात आव्हानांना तोंड कशी देणार? कष्ट करून मिळवलेल्या यशाचा आनंद यांना कसा चाखायला मिळणार? याचा विचार करणं, ही खरी काळाची गरज आहे. प्रसंगी थोडं कठोर व्हावं लागलं तरी चालेल, पण मुलांमध्ये ‘श्रम संस्कार’ रूजवा; असं सांगणारी वडीलधारी मंडळी आज का दिसत नाहीयेत?
बटन दाबलं की पंखा सुरू होतो, तसं मनात इच्छा आली की ती पूर्ण झाली पाहिजे आणि मग एखाद्या वेळी अपयश आलं, वाट पहावी लागली की, मग आयुष्याचे प्रयोजन संपल्याप्रमाणे ही पिढी नैराश्याच्या गर्तेत जाताना दिसते, आत्महत्या करताना दिसते; नाही तर मग व्यसनांचा आधार आहेच! गुगलने माहितीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती केली आहे, हे जरी खरे असले, तरी लोकांना अपंग बनवले आहे. अभ्यास करताना एखादा मुद्दा अडला, प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले की, Google हा instant, विनासायास उपाय आहे आणि त्यामुळे संदर्भ ग्र॔थ, अवांतर वाचन, सखोल ज्ञान मिळवण्याची जिद्द जवळजवळ संपुष्टात आली आहे. तात्पुरते, कामचलाऊ उत्तर मिळाले ना? बास आता!! हा अभ्यासाचा पॅटर्न बनत चालला आहे!
सुपरफास्ट स्पीडचं वेड लागलेल्या या जगात प्रत्येकजण धावतोय, धावतोय! “वाट पहायला वेळ आहे कुणाकडे?” असा प्रश्न ही पिढी विचारतेय! पण धावण्याच्या या शर्यतीत आयुष्याची, जगण्याची उमेद संपून जातेय. मिळालेल्या यशाचा आनंद उपभोगायलाही वेळ नाही आणि जेव्हा कधीतरी वेळ मिळेल तेव्हा शरीर देत नाही. ही सध्याची जीवनकहाणी !
मंडळी, लहानपणापासूनच, संस्कारक्षम वयातच मुलांना Delayed Gratification चे धडे कृतीतून देणे; slow but steady wins the race या गोष्टी सांगणे; ही मुलांना दिलेली अत्यंत मोलाची देणगी आहे.
काय गंमत होते पहा हं, आपल्याला एकदम उर्मी आलेली असते __ एखादी वस्तू खरेदी करण्याची! आत्ताच्या आत्ता जाऊन ती वस्तू आणूयातच! पण काहीतरी कारणं घडतात आणि ती खरेदी लांबते. पण हा लांबलेला वेळ, आपला मेंदू सत्कारणी लावतो. त्या गोष्टीवर साधकबाधक विचार केला जातो आणि अखेरीस आपण ठरवलेल्या वस्तूपेक्षा चांगली वस्तू खरेदी करतो, किंवा, ती खरेदी टाळून अनाठायी खर्च वाचविला जातो. भावनेच्या भरात, आवेशात घेतलेले निर्णय योग्य ठरतातच असे नाही आणि म्हणूनच निर्णय घेण्यासाठी वेळ देणे, वैचारिक मेंदू Thinking Brain चे ऐकणे, हे खूप महत्वाचे! तरच घेतलेला निर्णय योग्य ठरतो आणि त्याची फलप्राप्ती चांगली होते…..