शेपूचे पराठे आणि थालिपीठ

शेपू ह्या पालेभाजीमध्ये भरपूर पोषणमूल्ये असल्याचे आहारतज्ञ आग्रहाने सांगतात. पण शेपूला जो एक विशिष्ट वास येतो तो इतर अनेकांप्रमाणे आम्हालाही आवडत नाही. मग ह्या शेपूचं करायचं तरी काय ? 🤗
काल भाजीवाल्याकडे ताज्या हिरव्यागार शेपूच्या जुड्या दिसल्या. त्यातली एक जुडी घरी घेऊन आले. त्यातली अर्धी जुडी बाजूला काढून, सारखी करून, धुवून, बारीक चिरून रात्री पराठे केले. पोळ्या करायला घेतो तशाच प्रमाणात कणीक घेऊन त्यामध्ये घरातली दोन तीन पीठे – तांदुळाचे पीठ, मुगाचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी प्रत्येकी एकेक टी स्पून घातली. त्यात शेपू आणि नेहमीचे यशस्वी कलाकार – हिंग, हळद, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने जिरे पावडर आणि थोडासा ओवा घातला. आणि कणीक मळून पराठे केले. खुसखुशीत पराठा, त्यावर Utterly Butterly Delicious अमूल बटर, तोंडी लावायला टोमॅटो केचप आणि घरी केलेला सफरचंदाचा मुरांबा. (फोटू काढायचा राहिला.) शनिवारची निवांत रात सुफळ संपूर्ण व्हायला आणखी काय पाहिजे! 😊

आज सकाळी उरलेल्या अर्ध्या जुडीची थालिपीठे लावली. तोंडी लावायला घरी विरजलेलं घट्टमुट्ट गोड दही.