टाकळ्याची भाजी रानभाजी

पाककृती –
कृती १- फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत.
साहित्य – कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद, गूळ इ.
कृती – पाने स्वच्छ धुऊन, पाणी गळून जाऊ द्यावे. कढईत तेल टाकून कांदा परतून घ्यावा, मग त्यात ओली मिरची व हळद टाकावी. नंतर त्यावर बारीक चिरलेली भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली, की त्यात थोडा गूळ आणि मीठ घालावे. त्यावर ओले खोबरे घालावे. या भाजीत भिजवलेली तूरडाळ किंवा फणसाच्या आठळ्यांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चवदार बनते.

कृती २
साहित्य – दीड वाटी टाकळा पाला (कोवळा पाला देठे काढून चिरावा), अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, मीठ, तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.
कृती – जरा जास्त तेलावर कांदा, लसूण परतावे, त्यावर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. तिखट, मीठ, गूळ घालून शिजवून घ्यावे.

कृती ३टाकळ्याचे रायते –
साहित्य – एक वाटी टाकळ्याची पाने, चिंचेचा कोळ व गूळ, हिरवी मिरची, मोहरी पूड, पाणी, मीठ इ.
कृती – पाने व मिरच्या सोबत वाटावे. त्यात गूळ, चिंचेचा कोळ, मीठ घालावे. मोहरी पूड पाण्यात फेसून घालावी.

कृती ४टाकळ्याची तंबळी
साहित्य- एक वाटी टाकळ्याची पाने, एक वाटी ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दीड वाटी ताक, चिंच, मिरे, जिरे, तूप, मीठ इ.
कृती – कढईत तुपावर मिरची व पाने परतावीत. त्यात मिरे, जिरे घालून दोन मिनिटे परतावे. मग अन्य साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटावे आणि नंतर ताकात मिसळावे. पोटाच्या विकारासाठी तंबळी उपयुक्त आहे.